उशिरा, पण अखेर शहाणपण सुचले!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Dec-2021   
Total Views |

nashik_1  H x W
 
 
नाशिक (प्रवर देशपांडे) : नाशिक येथे पार पडलेल्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोप कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांकडून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या नावांचा जयघोष करण्यात आल्याचे रविवारी पाहायला मिळाले. यावेळी कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच स्वातंत्र्यवीर सावरकर हे वंदनीय, महनीय असल्याचे उद्गार काढले. आमच्या मनात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कार्याबाबत आणि त्यागाबाबत कोणताही दुजाभाव किंवा आकस नसल्याचा उल्लेख आपल्या भाषणात आवर्जून करत सावरकर यांचे कार्य व त्याग हे अतुलनीय असल्याची एक प्रकारची कबुलीच दिली.
 
 
फेब्रुवारीमध्ये ज्यावेळी नाशिकमध्ये साहित्य संमेलन व्हावे, असा विचार समोर आला त्यावेळीपासून ते अगदी संमेलनाच्या उद्घाटनापर्यंत म्हणजे दि. ३ डिसेंबरपर्यंत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या नावाचा साधा उल्लेखही टाळणारे, संमेलनाच्या ठिकाणी सावरकरांचे नाव नेमके कुठे द्यावे, याबाबत शेवटपर्यंत संभ्रम ठेवणारे, संमेलनाच्या गीतात सावकरांचा स्पष्ट नामोल्लेख न करणारे आयोजक समारोपाच्या कार्यक्रमात मात्र, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा गुणगान करताना दिसून आले. महाराष्ट्रातील स्वातंत्र्यवीर सावरकरप्रेमींनी एक प्रकारे उभी केलेली चळवळ विरोधी पक्षांनी याबाबत घेतलेली भूमिका विशेषत: दै. ‘मुंबई तरुण भारत’ने सातत्याने उचित सन्मानाचा लावून धरलेला विषय याचाच परिपाक म्हणजे संमेलनाच्या समारोप कार्यक्रमात शरद पवार व छगन भुजबळ यांना स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा उल्लेख वारंवार करावा लागला, असेच चित्र एकप्रकारे यावेळी दिसून आले.
 
 
गर्दीने सर्वच शंकांना उत्तर दिले
 
यावेळी बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, “फेब्रुवारीपासून सुरू झालेली संमेलन होणार असल्याची चर्चा ही मागील २० ते २५ दिवसांपूर्वी अंतिम झाली. अत्यंत कमी वेळात संमेलनाची तयारी आम्ही केली. सफाई कर्मचारी यांनी उत्तम काम करत सफाई ठेवली. त्यांचे काम हे बहुमोल आहे. नाशिक महानगरपालिका यांचे मोलाचे सहकार्य लाभले,” असे ते म्हणाले. यावेळी भुजबळ यांनी शासकीय संस्था, लोकप्रतिनिधी यांचे आभार मानले.
 
 
“साहित्य संमेलनाबाबत माध्यमांमध्ये अनेक उलटसुलट चर्चा झाल्या. मात्र, येथील गर्दीने सर्वच शंकांना उत्तरे दिले. संमेलनात ९४३ कवींच्या कविता वाचनाचा विक्रम या संमेलनाच्या नावे नोंदविला गेला. मार्चमध्येच संमेलन स्थळाला कुसुमाग्रज यांचे नाव देण्याचे ठरले होते. त्यांच्या नावाला विरोध का झाला हे समजले नाही. स्वा. सावरकर हे महनीय आहेत, हे आम्हीदेखील मानतो. स्वा. सावरकर यांचा कोणताही अपमान झाला नाही. काही लोकांना द्राक्ष आंबटच लागतात. द्राक्षात आता ‘शरद सीडलेस’ आला असून तो खूप गोड आहे. हे टीकाकरांनी समजून घेणे आवश्यक आहे,” असे ते म्हणाले.
 
 
भुजबळांना करावा लागला स्वा. सावरकर यांचा उच्चार
 
 
संमेलनाच्या आयोजनापासून स्वा. सावरकर यांचा उल्लेख कसा टाळता येईल, यावरच कटाक्ष ठेवण्यात आला होता. मात्र, नाशिककर नागरिक व स्वा. सावरकरप्रेमी व वृत्तपत्रात आलेल्या बातम्या यांमुळे किमान समारोपाच्या भाषणात छगन भुजबळ यांना स्वा. सावरकर यांचा महनीय व्यक्ती असा उल्लेख करावा लागला.
 
 
स्वा. सावरकर यांच्या कार्याची व त्यागाची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही
 
 
यावेळी शरद पवार म्हणाले की, “स्वा.सावरकर यांनी याच भूमीतून क्रांतिज्योती पेटवली. त्यांच्या ऐतिहासिक भूमीत साहित्य संमेलनाचे सूप वाजत आहे, याचा आनंद आहे. येथील संमेलन हे कविवर्य कुसुमाग्रज यांना वाहण्यात आलेली आदरांजली आहे,” अशी भावना यावेळी पवार यांनी यावेळी व्यक्त केली. साहित्य संमेलन आणि वाद हे समीकरण झाले आहे का? असे सांगत स्वा. सावरकर यांच्या कार्याची व त्यागाची तुलना कोणाशीही होऊ शकत नसल्याची भावना यावेळी शरद पवार यांनी व्यक्त केली.“एक वैज्ञानिक लेखक हा साहित्य संमेलनाचा अध्यक्ष आहे, याचा आनंद आहे. स्वा.सावरकर हे एक विज्ञानवादी लेखक होते. त्यांनी अनेक वैज्ञानिक पैलू मांडले,” असे सांगत शरद पवार यांनी स्वा. सावरकर यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्यावर स्तुतिसुमने उधळली.
 
 
कुसुमाग्रज यांना ज्ञानपीठ देताना उपस्थित राहण्याचे भाग्य लाभले असल्याचे यावेळी पवार यांनी यावेळी आवर्जून सांगितले. यावेळी त्यांनी भारतीय इतिहास व भारतावर झालेली विविध आक्रमणे यांचा मागोवा घेत संस्कृतसह मराठी भाषेचा झालेल्या विकासाचा मागोवा घेतला. यावेळी त्यांनी शिवरायांच्या ऐतिहासिक कार्याचे स्मरण करताना ‘राज्यव्यवहार कोष’ हा मराठीत असावा, यासाठी कसा आग्रह धरला याबाबत उपस्थितांना माहिती दिली. यावेळी शरद पवार यांनी लोकमान्य टिळक हे मराठी भाषा शुद्ध लेखनासाठी कसे आग्रही असत याची सोदाहरण मांडणी यावेळी केली. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, महादेव रानडे, गोखले, आगरकर, वि. दा. सावरकर, डॉ. आंबेडकर अशा अनेकांनी मराठी भाषेची सेवा केली,” असे ते यावेळी म्हणाले.
 
 
राज्यकारभारात मराठी आली असली तरी, दुर्दैवाने आजही न्यायालयीन निवाडे हे सामान्य माणसांसाठी दुर्बोध असल्याचे पवार यावेळी म्हणाले. यावेळी विद्यापीठात मराठी विभाग व अभ्यासक्रम सुरू होण्याचा प्रवास विशद करताना यशवंतराव चव्हाण यांनी केलेल्या कार्याचे स्मरण पवार यांनी केले. मराठी भाषेच्या सर्वांगीण विकासाठी राज्यशासनाने कार्यक्रम हाती घेणे आवश्यक असल्याचे पवार यांनी यावेळी सांगितले. यासाठी आपण लवकरच भूमिका घेणार असल्याचे पवार यांनी यावेळी सांगितले.पाठ्यपुस्तक रचनेत आधुनिकता आणणे, पदवीनंतरच्या विज्ञान, वाणिज्य व इतर शिक्षण हे मराठीतून देण्यात यावे, अशी सूचना यावेळी पवार यांनी मांडली.
 
 
...तोपर्यंत मराठीचा विकास होणे शक्य नाही
 
 
समारोप कार्यक्रमात यावेळी माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर म्हणाले की, “कवी गोविंद, स्वा. सावरकर, कवी कुसुमाग्रज हे नाशिकची मुख्य ओळख आहे. मराठीकडे लक्ष देताना आपण हे लक्षात घ्यायला हवे की, आपल्याला मातृभाषेत विचार करण्याचे स्वातंत्र्य हे राज्यघटनेने दिले आहे. शिक्षण मातृभाषेत उपलब्ध करून देण्याचादेखील अधिकार राज्यघटनेने दिला आहे. याची जाणीव प्रत्येकाने ठेवल्यशिवाय मराठीचा विकास होणे शक्य नाही,” असे ते यावेळी म्हणाले. इंग्रजी व सेमी इंग्रजी यावर फटकारे ओढताना न्या. चपळगावकर म्हणले की, “मराठीत कायदा यांची पुस्तके उपलब्ध आहेत. आपल्याकडे केवळ चर्चा होतात, कृती हवी त्या गतीने होत नाही. पाठपुस्तक मंडळ उत्तम काम करत होते. मात्र, इतके चांगले काम आपण का करावे, म्हणून कदाचित सरकारने तो विभाग अडगळीत टाकला,” असेही न्या. चपळगावकर यावेळी म्हणाले.“गोवा स्वतंत्र झाल्यावर मराठी व कोकणीमध्ये शासकीय दस्तावेज होत असत. कर्नाटकमध्ये सर्व पाट्या या कन्नडमध्ये आहे. मात्र, आपल्या राज्यात सरकार नेमकी काय भूमिका घेत आहे, हे समजणे आवश्यक आहे. सरकारने किमान कर्नाटक सीमा भागातील नागरिकांसाठी का होईना, दिल्लीत जाऊन भूमिका घ्यावी,” अशी अपेक्षा यावेळी न्या. चपळगावकर यांनी व्यक्त केली. “नागरिकांनी दैनंदिन व्यवहारात मराठीचा वापर केल्यास मराठी भाषा मोठी होण्यास नक्कीच चालना मिळेल. यशवंतराव चव्हाण यांनी साहित्य सांस्कृतिक मंडळ, मराठी राजभाषा आणि मराठीतील उत्तम पुस्तके यांसाठी मोठे काम केले. त्यांच्या काळात मराठीसाठी काम होऊ शकले. कारण, सरकार पाठीशी होते. त्यामुळे मराठीचा विकास होण्यासाठी, मराठी शाळा टिकण्यासाठी शासन व समाज स्तरावर व्यापक प्रयत्न होणे आवश्यक आहे. बोली भाषा व मराठी भाषा यांचा समतोल विकास साधणे आवश्यक आहे,” असे ते म्हणाले.
 
 
लेखकांच्या स्वातंत्र्याबाबत बोलताना न्या. चपळगावकर म्हणाले की, “लेखकांना त्यांच्या निर्मितीक्षम मनातील भवनाच्या प्रकटीकरणासाठी आवश्यक आहे. स्वातंत्र्य हे मिळत नसते, तर ते मिळवावे लागते, तेव्हाच त्याची किंमत असते. राज्यकर्ते हे धुंदीत असतात, आमच्या हातून चुका होतात, तेव्हा आमच्या चुकांची जाणीव करून देणे हे बुद्धिवंताचे काम आहे असे पंडित नेहरू म्हणाले,” असे सांगताना “लेखकांनी आपली भूमिका ठोस बजवावी,” असे मत यावेळी न्या.चपळगावकर यांनी यावेळी मांडले. “लेखन व व्यक्तिस्वातंत्र्यावर बंधने घालत नाही, तर केवळ झुंडशाही असे कृत्य करते,” असेही ते यावेळी सांगायला विसरले नाहीत. यावेळी न्या. चपळगावकर यांनी बाबाराव सावरकर यांच्या कार्याचादेखील गौरव केला. तसेच देशातील विविध राज्य हे त्यांच्या प्रादेशिक भाषेसाठी कशी आग्रही आहेत, याची सोदाहरण मांडणी यावेळी न्या. चपळगावकर यांनी केली.
 
 
समतेची, संतांची परंपरा ही नाशिकमध्ये आजही प्रवाही
 
 
यावेळी बोलताना राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, “समतेची सुरुवात नाशिकमधून झाली याचा आनंद आहे. तसेच, समतेची, संतांची परंपरा ही नाशिकमध्ये आजही प्रवाही आहे,” असे मत मांडले. यावेळी थोरात यांनी महाराष्ट्रातील संतपरंपरेचा इतिहासाचे विविध पट उपस्थितांसमोर उलगडले. “भारतीय राज्यघटनेत संतपरंपरेची शिकवण दिसून येत आहे. स्वातंत्र्य हे भीक आहे हे म्हणणे व त्याला वृद्ध अभिनेत्याने दुजोरा दिला, हे अत्यंत क्लेशदायक आहे. आणीबाणीच्या कालखंडात दुर्गा भागवत यांनी मोठे आघात केले. त्या त्यावेळी म्हणाल्या की, लेखकांना काय लिहावे हे सांगणे हास्यास्पद आहे. मात्र, नाशिक येथील संमेलनात कंगना रानवात यांच्या वाक्याचा कोणत्याही साहित्यिकाने समाचार घेतला नाही याची खंत वाटते,” असे थोरात यावेळी म्हणाले. राजकीय, सामाजिक चळवळीला धार देण्याचे काम साहित्यिक करत असतात. भारतात जर काही चुकीचे घडत असेल, तर आपण बोलायला हवे. उद्या कंगना राणावत राज्यघटनेबद्दल बोलल्या, तर तुम्ही गप्प बसणार का,” असा सवाल यावेळी थोरात यांनी केला.“कोणी बुद्धिभेद करत असेल, तर त्याचा विरोध राजकारणी म्हणून आम्ही नक्कीच करू,” असेदेखील थोरात यावेळी म्हणाले.
 
 
९५ वे मराठी साहित्य संमेलन मराठवाड्याच्या उदगीर मध्ये ९५ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन मराठवाड्यातील उदगीर, लातूर येथे पुढील चार महिन्यांच्या आत घेतले जाणार असल्याची महत्त्वाची घोषणा अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी रविवारी केली.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@