कीलक स्तोत्र पठणाचे फळ

    09-Oct-2025
Total Views |


आई जगदंबेच्या स्तवनाचे नानाविध प्रकार आहेत. त्यापैकी एक म्हणजे चंडी पाठ होय! या चंडी पाठाच्या पठणाचे असंख्य लाभ अनुभवणारे साधक आज समाजात आहेत. या चंडी पाठाचे लाभ मिळवण्यासाठी कीलक स्तोत्र पठणाची भूमिका महत्त्वाची ठरते. त्यामुळे कीलक स्तोत्राचे महत्त्व काय, त्याचा नेमका अभिप्रेत असलेला अर्थ काय या सर्वांचा घेतलेला आढावा...

कीलक या शब्दाचा अर्थ ‘अभीष्ट सिद्धीला अडथळा आणणारे बंधन’ असा आहे. सामान्य भाषेत याला शाप म्हणतात. गायत्री मंत्रापासून सप्तशतीपर्यंत प्रत्येक स्तोत्रावलीला, एखाद्या ऋषींनी किंवा देवाने शाप प्रदान केलेला असतो. त्या जोडीला शापमुक्ती विधानसुद्धा असते. देवीमहात्म्यातील सप्तशती मंत्रावर महादेवकृत कीलक आहे. हे कीलक दूर न केल्यास, चंडीपाठाचे फळ प्राप्त होत नाही. म्हणूनच कीलक स्तोत्र हे शापोद्धार म्हणजेच, बंधनमुक्तीचे माध्यम आहे.

श्लोक

कृष्णायां वा चतुर्दश्यामष्टम्यां वा समाहितः।
ददाति प्रतिगृह्हाति नान्यथा प्रसीदति॥
इत्थं रूपेण कीलेन महादेवेन कीलितम्।
यो निष्कीलां विधायनां चण्डीं जपति नित्यशः॥
स सिद्धः सगणः सोज्य गन्धर्वों जायते ध्रुवम्।
नापमृत्युवशं याति मृते च मोक्षमाप्नुयात्।

अर्थात, कृष्ण पक्षातील चतुर्दशी किंवा अष्टमी तिथीला, एकाग्र चित्ताने चंडीचा जप केला पाहिजे. दान आणि प्रतिग्रह केल्याशिवाय चंडी प्रसन्न होत नाही. महादेवांनी चंडीला कीलित केले आहे आणि जो साधक हे कीलक दूर करून नित्य जप करतो, तोच सिद्ध होतो, गंधर्व होतो, अकालमृत्यू टळतो आणि मृत्यूनंतर मोक्ष प्राप्त करतो. या तिथींचे महत्त्व काय? कृष्ण पक्षात चंद्राची कला वर्धिष्णु असते. चंद्र हा मनाचा अधिपति आहे. चतुर्दशीला चंद्राची एकच कला शिल्लक असते. त्यानंतर पौर्णिमा येते, अर्थात या अवस्थेत मन प्रसन्न असते. अष्टमीला साधक समभावात असतो. समाहितचा अर्थ एकाग्रचित्त होऊन प्राप्त केलेली समाधी अवस्था. या अवस्थेत अर्पण आणि प्रतिग्रह स्वाभाविकपणे घडतात. दान आणि प्रतिग्रह केल्याशिवाय देवी प्रसन्न होत नाही. याचा अर्थ केवळ भौतिक वस्तूंशी संबंधित दान आणि प्रतिग्रह अभिप्रेत नसून अंतःकरणातील भाव, श्रद्धा, आणि आत्मिक समर्पण साधावे हीच अपेक्षा आहे.


अर्पण आणि प्रतिग्रह यांची अनुभूति हा आत्मानुभव आहे. देवी ही केवळ उपास्य नसून, आत्म्याचीच अभिव्यक्ती आहे. देवीचे पूजन म्हणजे आत्मपूजन, देवीचे स्नान म्हणजे आत्मशुद्धी आणि देवीचा जप म्हणजे आत्मसाक्षात्कार. अर्थात देवी आणि आपण यातील अद्वैत साधकाला उमगते. ही अवस्था म्हणजे समाहित-एकाग्रचित्त समाधी. या अवस्थेत साधक आणि देवी यांच्यातील भेद नाहीसा होतो. कीलक स्तोत्रात सांगितले आहे की, हे अर्पण-प्रतिग्रह केल्याशिवाय चंडी प्रसन्न होत नाही. याचा अर्थ असा की, केवळ पाठ, जप किंवा विधी पुरेसे नाहीत, तर भाव, समर्पण आणि आत्मिक एकत्व आवश्यक आहे. साधक जेव्हा या अवस्थेत प्रवेश करतो, तेव्हा तो देवीचा स्नेह अनुभवतो. आणि एकदा हा स्नेह अनुभवला की, साधक कधीही कृतघ्न राहू शकत नाही. त्याच्या अंतःकरणात अर्पणाची वासना फुलते, कधी पुष्परूपाने, कधी भावरूपाने, कधी भक्तीरूपाने.

हीच अवस्था साधकाला आत्मसाक्षात्काराच्या दिशेने नेते. हेच कीलक स्तोत्राचे गूढ रहस्य आहे की, अर्पण आणि प्रतिग्रह ही साधनेची मूलभूत प्रक्रिया आहे. जी साधकाला सिद्धीच्या मार्गावर नेते. निष्किल विधीमध्ये कीलक/बंधन/अडथळा/शाप याला निष्प्रभ/दूर केले जाते. कीलक केवळ शाप नाही, तर तो ज्ञानमय गुरुचा आदेश आहे. साधकाला योग्य अवस्थेत पोहोचण्यासाठी, आत्मबोध प्राप्त करण्यासाठी आणि साधन-समरात प्रवेश करण्यासाठी, गुरुने दिलेला सूचक संकेत म्हणजे कीलक. हे बंधन दूर केल्याशिवाय, साधकाला चंडी तत्त्वात प्रवेश करता येत नाही. कीलक म्हणजे एक प्रकारचा तपशक्तीचा गेटवे आहे, जिथे साधकाला स्वतःच्या अंतःकरणातील अडथळे, अहंकार आणि अज्ञान दूर करावे लागतात. हे केल्याशिवाय देवी प्रसन्न होत नाही आणि साधना केवळ कर्मकांड बनते.

सिद्धी हे साधना केल्याने प्राप्त होणारे फळ आहे. यात केवळ भौतिक लाभ अभिप्रेत नसून आत्मउन्नती, चैतन्यवृद्धी आणि मोक्षप्राप्तीची आस आहे. कीलक स्तोत्रात स्पष्टपणे सांगितले आहे की, जो निष्कील होतो, तोच सिद्ध होतो. आणि सिद्ध झाल्यावर त्याला गंधर्वपद प्राप्त होऊ शकते, तो अकालमृत्यूपासून मुक्त होतो, मृत्यूनंतर मोक्षाचा अधिकारी होतो. ही सिद्धी केवळ मंत्रजपाने मिळत नाही, तर भाव, समर्पण आणि आत्मबोधाने मिळते. साधना हेच एक समर आहे. यात साधकाला अर्गला, कीलक आणि कवच यांची आवश्यकता असते. कीलक म्हणजे अडथळा, अर्गला म्हणजे प्रवेशद्वार आणि कवच म्हणजे संरक्षण. या तिन्ही साधनांनी सज्ज होऊनच साधक चंडी तत्त्वात प्रवेश करू शकतो. साधक जेव्हा निष्कील होतो, तेव्हा त्याला चंडीपाठाचा खरा अर्थ समजतो. पाठ केवळ शब्दांचा संग्रह न राहता, तो आत्मिक संवाद बनतो आणि या संवादातूनच सिद्धी प्राप्त होते. कीलक स्तोत्रात सांगितले आहे की, ’नान्यथा प्रसीदति’ याचा अर्थ असा की, अन्य कोणत्याही मार्गाने देवी प्रसन्न होत नाही. केवळ निष्कील करून, समाहित चित्ताने आणि भावपूर्ण जपानेच देवी प्रसन्न होते.

कीलक स्तोत्राचा अंतिम भाग अत्यंत गूढ आणि तात्त्विक आहे. येथे साधकाच्या साधनेचा अंतिम उद्देश स्पष्ट केला जातो, तो म्हणजे केवळ पार्थिव लाभ नव्हे, तर मोक्षप्राप्ती. चंडीपाठ हे केवळ सौभाग्य, आरोग्य, वशीकरण, शत्रुनाश यांसाठी नाही, तर आत्मोद्धारासाठीही आहे. हे स्तोत्र सांगते की, चंडी ही भोग आणि अपवर्ग दोन्हींच्या प्राप्तीचे साधन आहे. वेदान्त आणि दर्शनशास्त्र ही मोक्षशास्त्रे आहेत; परंतु ती ऐहिक फलांपासून विरक्त आहेत. त्यांचा उद्देश केवळ आत्मसाक्षात्कार आहे. परंतु, चंडीपाठ हे भोग आणि मोक्ष दोन्हींचा समन्वय साधते. म्हणूनच कीलक स्तोत्रात सांगितले आहे की, जे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चार पुरुषार्थांची इच्छा करतात, तेच चंडीपाठाचे अधिकारी आहेत. चंडीपाठ हे सामान्य भक्त आणि तपस्वी साधकासाठी सर्व फलांचे साधन आहे. साधक जेव्हा चंडीपाठ करतो, तेव्हा तो प्रथम पार्थिव फलांचा अनुभव घेतो. त्यातून त्याला आत्मिक प्रेरणा मिळते आणि मगच तो मोक्षाच्या दिशेने वाटचाल करतो. हा एक क्रमिक अभ्यासक्रम असल्याप्रमाणे आहे. यात एकेका टप्प्यावर एकेका फळाची प्राप्ती होते.

1. सौभाग्य - जीवनात यश आणि स्थैर्य
2. आरोग्य - शरीर आणि मनाची शुद्धी
3. बशीकरण - आत्मिक तेज आणि प्रभाव
4. शत्रुनाश - अंतःशत्रूंचा नाश
5. सिद्धी - साधनशक्ती आणि तपोबल
6. मोक्ष - आत्मसाक्षात्कार आणि मुक्ती

चंडीपाठ ही केवळ स्तुती नसून जीवनसाधना आहे, जिचे अंतिम साध्य मोक्षप्राप्ती आहे. जो साधक निष्कील करतो, समाहित होतो आणि चंडीतत्त्वात प्रवेश करतो, तोच या फलांचा अधिकारी होतो.


सुजीत भोगले