मृत्यूचे रहस्य

    09-Oct-2025
Total Views |

उत्क्रांतीकरिता जीवात्मादशा आवश्यक आहे. अनेक मूलद्रव्यांचे मिळून जडशरीर बनलेले असते. तद्वत्च एखादे पाषाणसुद्धा अनेक मूलद्रव्ये मिळून बनलेले असते. अनेक युगे तसेच पडून राहूनसुद्धा त्या पाषाणरुप अहिल्येत जीवरुप राम अवतरल्याविना, त्या अहिल्यारुप पाषाणाचा उद्धार होणार नाही. अनेक कोट्यवधी वर्षांपासून पृथ्वीत दबलेल्या लोखंडाचे सोने झाले नाही की, कोळशाचे प्लॅटिनम झाले नाही. रेडियम धातूचे शिसे बनते, पण ती रेडियमची प्रकृतीच आहे. म्हणजे केवळ जडशरीराचीच उत्क्रांती होते, हे डार्विनचे तत्त्व मान्य करता येत नाही. उदा. बाहेर हवेत कर्बाम्ल वायूच्या रुपाने वाटेल तेवढा कर्ब उपलब्ध आहे. पण तो कर्ब जिवंत वनस्पती वा प्राण्यांद्वारे ग्रहण केला गेल्यास, त्यापासून अस्थी, मांस, मेद, मज्जा, रक्त, रस इत्यादी धातू तयार होतात. प्राण्यांच्या वा वनस्पतीच्या शरीरात जाण्यापूर्वी तो कर्ब जडमृत असतो. पण वनस्पती व प्राण्यांनी त्याचा स्वीकार केल्याबरोबर, तोच जडकर्ब जिवंत बनून उत्क्रांत दशेला पावतो. याचे रहस्य हेच आहे की, उत्क्रांती अवस्था केवळ जडशरीराशी निगडित नसून जीवात्म्याशीसुद्धा आहे.

उटकमंडजवळील नीलगिरी पर्वतावर राहणारे आदिवासी, पूर्वीचे रोमन लोक आहेत असे मानले जाते. पण आज त्यांचा वर्ण रोमनांप्रमाणे गौर नाही, तर ते आज निमगौर आहेत. उष्णप्रदेशात राहून त्यांची त्वचा आपणहून काळी पडते, असा वैज्ञानिक सिद्धांत आहे. परंतु, गेल्या ५०० हून अधिक वर्षांपासून गोव्याला सेंट पीटरचा मसाल्यात राखलेला देह ठेवला आहे. तो उष्ण प्रदेशातच आहे. त्वचा पूर्वीइतकीच गौर आहे. चांगदेवांप्रमाणे तो पीटर ५०० वर्षे जिवंत असता, तर त्याची त्वचा एव्हाना काळी पडलीच असती. भारतात अनेक वंश बाहेरून आले आहेत पण, आज ते वंशदृष्ट्यासुद्धा बदलून पूर्ण भारतीय व श्यामलवर्णी बनले आहेत. उत्क्रांतीकरिता जीवाची, जिवंतपणाची आणि जीवनाची आवश्यकता असते, हे स्पष्ट आहे.

चैतन्यशक्तीशिवाय बदल असंभव आहे. साधारणतः प्राणवायू उद्जन वायूशी संलग्न पावून पाणी तयार होते, पण प्राणवायूला वा उद्जन वायूला अधिक चैतन्य आणल्यास, त्यापासून हायड्रोजन पॅरॉक्साईड तयार होतो. प्राणवायू अधिक उद्जनवायूशी संलग्न झाल्यास, त्यापासून साखर तयार होते. अन्यथा मृत कर्बाशी संलग्न झाल्यास कचरा तयार होईल. येथेसुद्धा जडमूलद्रव्यात विशेष चैतन्य म्हणजे सोप्या भाषेत जीव उत्पन्न करावा लागतो, तेव्हा कुठे त्यांचे संलग्नतेतून उत्क्रांत असे पदार्थ उत्पन्न होत असतात. प्राणवायूची घटना अशी आहे, पण हाच प्राणवायू पृथ्वीच्या वातावरणातील उच्च स्तरावर गेल्यास, त्यावर तेथील सक्रिय अशा वैश्विक किरणांचा प्रयोग होऊन त्यांचे रुपांतर ओझोनमधे होते. साधे जडमूलद्रव्यसुद्धा वैश्विक किरणांसारख्या जिवंत अस्तित्वासह आपल्या घटनेत बदल करते.
म्हणजेच उत्क्रांत बदलाकरिता जीवंत अस्तित्वाची आवश्यकता असते, हे यावरून दिसते.

आजपर्यंत स्फटिकीभवनाची प्रक्रिया मृतवत् मानली जात असे. आता स्फटिकीभवन होण्याकरिता संस्कारांची म्हणजेच, मनाची आवश्यकता असते असे सिद्ध झाले आहे. इतर प्राण्यांप्रमाणे साखर, मीठ, तुरटी इत्यादी स्फटिकमय पदार्थ जिवंत मानले जाऊ लागले आहेत. मनाशिवाय उत्क्रांती नाही, म्हणजे अत्यंत मूळ अवस्थेत का असेना, पण मन असल्याशिवाय उत्क्रांती शक्य नाही. जिवंतपणाचे मुख्य लक्षण म्हणजे मन आहे. आज निरनिराळ्या प्रकारची जी विभिन्न औषधे तयार करण्यात येत आहेत, ती अणुरचना बदलाची सूक्ष्म उदाहरणे होत. मूळ अणूच्या संलग्नशक्तीला अधिक उत्क्रांत करून, त्यापासून विभिन्न अणुधारणेची विभिन्न द्रव्ये तयार करता येतात. हीच ती विस्मयकारक औषधे होत. असली औषधे म्हणजे द्रव्यातील उत्क्रांत अवस्था होय. उत्क्रांतीची अवस्था वा शक्यता केवळ शरीरांनाच लागू नसून, मूलद्रव्यांनाही लागू आहे असे यावरून दिसते. हा मूलद्रव्यांमधील उत्क्रांत फरक त्यात उत्पन्न झालेल्या मनावर अवलंबून आहे, असे सिद्ध झाले आहे.जीवन वा जिवंतपणाच्या व्याख्या आता पूर्वीप्रमाणे मर्यादित राहिल्या नसून, त्या दिवसेंदिवस अणू परमाणूपर्यंत नव्हे, ओतप्रोतापर्यंतसुद्धा अधिक सूक्ष्म आणि व्यापक बनत चालल्या आहेत.

वैदिक क्रमविकास

शरीरावर होणार्‍या परिणामाची प्रक्रिया वा संस्कार जीवात्म्यावर होत असतात आणि जीवात्म्यावर होणार्‍या संस्काराचा परिणाम जडशरीरावर होऊन, जडशरीर अधिक उत्क्रांत व कार्यक्षम बनते असा उत्क्रांतीचा वैदिक सिद्धांत आहे. वैदिक विचारानुसार उत्क्रांतीकरिता जीवात्म्याचे जडशरीरावर होणारे परिणाम व जडशरीराद्वारे ग्रहण करणार्‍या जीवावर होणारे संस्कार यांची परस्पर आवश्यकता असते. थोडक्यात, जीवात्म्याच्या सावध संस्कारांचा परिणाम जडशरीरावर होतो, तर जडशरीरावर झालेल्या संस्कारांचा परिणाम सावध जीवात्म्यावर होतो. याप्रकारे प्रकृतीपुरुष यांचा खेळ अव्याहतपणे चालूच असतो. उत्क्रांतीचे रहस्य प्रकृति-पुरुषाच्या जागृत व्यवहारात आहे. त्यामुळे प्रकृती की पुरुष असा प्रश्न विद्वानांनासुद्धा पडतो. या द्वैतवादातून बाहेर निघण्याकरिता भगवद्गीता स्पष्ट सांगते,

प्रकृतिं पुरुषं चैव विद्यनादि उभावपि।
विकारांश्च गुणांश्चैव विद्धि प्रकृतिसम्भवान्॥१९,अ.१३॥

या सर्व सृष्ट पसार्‍याचे मूळ तू प्रकृती व पुरुष असे दोन्ही मान. या वादात अधिक खोल जाण्याची आवश्यकता नाही. मात्र एवढे खरे की, विकार आणि प्राप्त संस्कार ग्रहणानुसार हा सर्व प्रकृतीचा विविध पसारा पसरत आहे, प्रकृतीत त्यामुळे विविधता येत आहे. विकार मनाला होत असतात व गुणधारणासुद्धा मनाशिवाय असंभव आहे. म्हणून या प्रकृतीच्या विविधतेचे मूळ संस्कार ग्रहण करणार्‍या मनात आहे. मन नसेल तर काहीच नाही. गीता सांगते,

मन एवं मनुष्याणां कारणं बन्धमोक्षयोः।

संस्कारांची मूस म्हणजे मन मानल्यास, या मनामुळे मूलद्रव्य अनेक प्रकारे संलग्न होऊन सृष्टीत विविधता उत्पन्न होते. या विविध वस्तुजातांची पुन्हा जुळवणी होऊन, विभिन्न जीव उत्पन्न होतात. मनरुप संस्कार रसाद्वारे जीवांवर पुनर्संस्कार घडून, नानाविध जीव उत्पन्न झाले आहेत.असल्या मानसिक प्रक्रियेमुळे एकपेशीय अमीबापासून अनेकपेशीय हायड्रा, जेलीफिश, मत्स्य (फिश), बेडूक, साप, सस्तन प्राणी, वानर व नर उत्क्रांतीद्वारे अस्तित्वात आले आहेत. परिस्थितीची प्रक्रिया त्या त्या शरीरावर होऊन, त्या शरीरात सतर्क राहणार्‍या जीवावर त्याचा परिणाम होऊन, त्या परिस्थितीवर मात करण्यासाठी जीवाने नवीन रचना केली. यामुळे त्या शरीरात नवीन फरक झाले. केवळ जडशरीरात आपणहून फरक घडणे असंभव आहे. सतर्क अस्तित्वच असला फरक घडवू शकते. हे सतर्क अस्तित्व म्हणजे जीवात्मा होय. जीवात्मा व शरीर या दोघांच्या कार्यसहकार्याने उत्क्रांती घडून येत असते. (क्रमशः)


योगिराज हरकरे

शब्दांकन : राजेश कोल्हापुरे-९७०२९३७३५७