लक्ष्मीपूजन, दीपावली पाडवा , भाऊबीज रविवारची सुट्टी आणि सोमवारची काही जणांना असणारी सुट्टी असे सलग ५ दिवस सुट्टीचे मिळाल्यामुळे सिंहगडावर तब्बल २५ हजार पेक्षा जास्त पर्यटकांनी गर्दी केली होती. सिंहगडावर वाहनांनी जायचे असल्यास लोकांना दुचाकी, चारचाकी आणि वडाप असे तीन वाहनांचे पर्याय असतात. ह्या सलग पाच दिवसात ३ हजार २०० पेक्षा दुचाकी सिंहगडावर गेल्या होत्या ;तर २ हजार पेक्षा जास्त चारचाकी सिंहगडावर गेल्या होत्या. दिवाळीनिमित्त पर्यटकांनी केलेल्या ह्या गर्दीमुळे तिथे व्यवसाय करणाऱ्या स्थानिक दुकानदारांनी सुटकेचा श्वास सोडला. सिंहगडावर दिवाळीच्या सर्व दिवशी सणानिमित्त दीपोत्सव साजरा करण्यात आला तर काही हौशी गडवेड्यांनी सोमवारी पण सिंहगडावर गर्दी केली होती.
सिंहगडावर जेवणाची सोय करून देणाऱ्या डिंबळे कुटुंबायांशी दिवाळीतील गर्दीबद्दल संवाद साधला असता, '' गेले दीड वर्ष कोरोनाच्या महामारीमुळे सिंहगडावर गर्दी होत नसे त्यामुळे गडावर हॉटेल व्यवसाय करणाऱ्या लोकांच्या घरी आर्थिक समस्या उद्भवू लागल्या होत्या. मात्र गेल्या ५ दिवसात पर्यटकांनी गडावर केलेल्या गर्दीमुळे आम्हाला पण उत्साहित वाटू लागले आहे आणि आमच्या हॉटेल मध्ये कांदा भजी आणि भाकरी पिठलं यावर पर्यटकांनी ताव मारल्याने आमचे गेल्या दीड वर्षात झालेले आर्थिक नुकसान थोड्याश्या प्रमाणात का होईना भरून निघाले आहे.'' असे ते म्हणाले