शोषित, वंचित समाजबांधवांच्या उत्थानाचा वसा घेतलेले अमित गोरखे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Nov-2021   
Total Views |

Amit Gorakhe _1 &nbs

आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांशी बांधील राहून राजकारणातही समाजकार्य करण्याची प्रचंड ताकद आणि आत्मविश्वास असलेले अमित गोरखे आज भाजप महाराष्ट्राचे सचिव, तसेच नॉव्हेल शिक्षण संस्था, पुणेचे अध्यक्षही आहेत. आज, गुरुवार, दि. ४ नोव्हेंबर त्यांचा जन्मदिन. त्यानिमित्ताने त्यांचे अभीष्टचिंतन करताना त्यांच्या राजकीय आणि सामाजिक कार्याचा घेतलेला हा संक्षिप्त आढावा.
 
 
पुण्यामध्ये सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्याशी संवाद साधण्याचे सौभाग्य मला लाभले. त्यावेळी समाजाचा युवक म्हणून परिस्थितीबद्दल चर्चा करत असताना ते मला म्हणाले की, “समाजाच्या शेवटच्या स्तरापर्यंत शिक्षण आणि संधी पोहोचल्या पाहिजेत. शिक्षणाच्या प्रवाहात आणून समाजाचे सक्षमीकरण करणे हे महत्त्वाचे आहे.” त्यांचे ते शब्द आजही माझ्या जीवनाचे आदर्शबिंदू आहेत. तसा मी भाग्यवानच! कारण, मी साधा काकडी विकणारा मुलगा, त्याला सरसंघचालकांचा काही मिनिटांचा का होईना सहवास लाभला.
 
 
तसेच महाराष्ट्राचे लाडके नेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही मला बहुमोल मार्गदर्शन लाभले. मला ते म्हणाले होते की, “आपण समाजकारणासाठी राजकारणात आहोत. समाजाचा सर्वांगीण विकास आणि उत्थान हेच आपले ध्येय आहे, हे विसरता कामा नये!” त्यांच्या या विचारांना माझ्या प्रत्येक कृतीत उतरवण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करतो,” असे विचार महाराष्ट्र भाजप प्रदेश सचिव अमित गोरखे यांनी बोलताना व्यक्त केले.
 
 
अमित गोरखे यांचा समाजकारणाचा आलेख आणि कार्यपद्धतीचा जवळून परिचय असणार्‍यांना अमित गोरखे यांच्या म्हणण्यातले तथ्य नक्कीच जाणवेल. गेली १५ वर्षं भारतीय जनता पक्षाचे कार्य करताना अमित यांनी ‘राष्ट्र प्रथम, पक्ष नंतर, शेवटी मी’ हे सूत्र कायमच अमलात आणले. राजकारणातला संघ स्वयंसेवकी बाणा कायम ठेवताना अमित यांनी समाजहित कायमच जपले. ‘आमच्यावर अत्याचार झाला, अन्याय झाला’ असे म्हणणारे किती तरी लोक आपण नेहमीच पाहतो. स्वतःवर झालेल्या वैयक्तिक स्तरावरच्या अन्यायाला ते संपूर्ण समाजाशी जोडून समाज अस्वस्थ करू पाहतात. या पार्श्वभूमीवर अमित यांची कार्यपद्धती आणि विचारपद्धती खूपच वेगळी!
 
 
घरची आर्थिक स्थिती यथातथा. वडील वॉचमनची नोकरी करायचे, तर आई बालवाडीत शिक्षका. लोकसाहित्यरत्न अण्णाभाऊ साठे महामंडळाकडून काही कर्ज मिळवून एखादा व्यवसाय उभा करावा, यासाठी अमित यांनी दोन दशकांपूर्वी प्रयत्न केले होते. पण, एक नव्हे तर अनेक वेळा अर्ज करूनही त्यांना महामंडळाकडून कर्ज मिळाले नव्हते. या सगळ्या प्रकाराने मनात अढी किंवा ते खचून गेले नाहीत, तर स्वत:च्या कार्याची व्याप्ती त्यांनी इतकी मोठी केली की, एकेदिवशी ध्यानीमनी नसताना ते याच महामंडळाचे अध्यक्ष झाले. ही दैवगती होती. आजवर समाजासाठी केलेल्या कामाचे यशच होते.
 
 
पण, ही इतकी मोठी जबाबदारी स्वीकारताना त्यांच्यातला तो संधी नाकारला गेलेला युवक उतला नाही की, मातला नाही! ही संधी आपल्याला मिळाली ती समाजाच्या सेवेसाठी. महामंडळाकडे येणार्‍या प्रत्येक युवकाचे काहीना काही स्वप्न असते. महामंडळाच्या माध्यमातून या युवकांची स्वप्नपूर्ती करायची, त्यांच्या स्वाभिमानाला धक्का लागेल किंवा ते मनाने थकतील, हारतील, असे कोणतेही वर्तन त्यांच्यासोबत होऊ द्यायचे नाही, असे त्यांनी मनाशी पक्के ठरवले. त्यामुळेच महामंडळाचे अध्यक्ष होताच महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून पहिल्याच दिवशी हजारो युवकांनी आणि युवतींनी अमित यांना आपले मनोगत पाठवले. त्यात शुभेच्छा होत्याच; पण आपण महामंडळाकडून कर्ज घेऊ इछितो.
 
 
आपल्याला आयुष्यात आर्थिकदृष्ट्या स्थिर व्हायचे आहे, हे म्हणणे प्रथम होते. महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून संपर्क साधणार्‍या या सगळ्यांशी अमित यांनी वैयक्तिक संपर्क केला. महामंडळाकडून साहाय्यता मिळते. पण, त्यासाठी अटी-शर्ती आहेत. त्यासंदर्भातली माहिती खेड्यापाड्यातल्या समाजबांधवांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी अमित यांनी स्वत: घेतली. व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप बनवला, त्याद्वारे त्यांनी संपर्क कायम ठेवला. महामंडळाचे अध्यक्ष म्हणून महामंडळाच्या प्रत्येक योजनेचा लाभ समाजातील प्रत्येकापर्यंत कसा पोहोचेल, यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केला.
 
 
गावखेड्यातील तर सोडाच, शहरातीलही समाजबांधवांना आर्थिक आणि शैक्षणिक संधी मिळवताना अनंत अडचणींना सामोरे जावे लागते, हा त्यांचा स्वानुभव होता. बेरोजगारी, दारिद्य्र आणि अज्ञान यामुळे समाजविघातक शक्ती या समाजबांधवांना आपल्या कुटील जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करतात, हेसुद्धा अमित यांनी वस्तीपातळीवर पाहिले होते. युवकांना शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिकस्तरावर व्यासपीठ मिळवून द्यायचे, यासाठी अमित काम करू लागले.
 
 
महामंडळाचे अध्यक्ष असताना आ. सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले होते की, “अण्णाभाऊंच्या जन्मशताब्दीनिमित्त राज्य सरकारतर्फे १०० कोटींचे अनुदान मंजूर करू.” त्यांनी अनुदान दिलेच, त्याशिवाय लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेच्या पाच रुपयांच्या स्टॅम्पचेही अनावरण केले. याविषयी बोलताना अमित म्हणतात की, “या सगळ्यामुळे समाजामध्ये भाजपचा कार्यकर्ता म्हणून माझा मान किती वाढला हे काय सांगायला हवे?” बीड येथे निवडणुकीच्या दौर्‍यादरम्यान पंकजा मुंडे यांनी बहिणीच्या मायेने त्यांची केलेली विचारपूस आणि दौर्‍यादरम्यान अमित आणि सोबत्यांना जराही त्रास होऊ नये, यासाठी घेतलेली काळजी अमित आजही विसरलेले नाहीत. ते म्हणतात की, “माझे भाग्य की मोठमोठ्या व्यक्तिमत्त्वांचा स्नेह आणि आशीर्वाद मला लाभला आहे.”
 
 
असो. कोरोनाकाळातही अमित यांनी खूप सेवाकार्य केले. भाजपतर्फे त्यांना ‘कोविड टास्क फोर्स’ पश्चिम महाराष्ट्राचे समन्वयक म्हणून जबाबदारी दिली गेली होती. त्यांनी ती जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडली. पश्चिम महाराष्ट्रातील प्रत्येक शहरात आणि गावात ‘कोविड’ रुग्णांना मदत मिळते का? त्यासाठी नियोजन करण्याचे काम त्यांनी केले. या काळात पिंपरी-चिंचवड येथे हजारो कोरोना रुग्णांना उपचाराची सुविधा, तसेच एक हजारांपेक्षा जास्त कुटुंबांना सातत्याने रेशन वितरणही त्यांनी केले. मास्क, सॅनिटायझर आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचे वितरण तर नित्याचेच होते. या सर्व काळात अमित सेवाकार्याच्या माध्यमातून पिंपरी-चिंचवडच्या घराघरात पोहोचले. अमित म्हणतात की, “आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांचे मार्गदर्शन आणि सहकार्य आहे, त्यामुळे मी हे सगळे करू शकलो.”
 
 
आयुष्यातला प्रत्येक क्षण समाजोत्थानासाठी केंद्रित करणार्‍या अमित यांच्या जीवनाचा मागोवा घेताना जाणवते की, आई अनुराधा आणि वडील गणपत यांनी अमित यांच्यावर समाजशीलतेचे संस्कार तर केलेच; पण त्यांना घडवण्यामध्ये रा. स्व. संघाचेही योगदान महत्त्वाचे! चिंचवड, कळभोरनगर येथे संघाची शाखा लागायची. डॉ. आफळे हे संघशिक्षक होते. १०-१२ वर्षांचे असताना मित्रासोबत खेळायला मिळते म्हणून अमित त्या शाखेत गेले होते. तिथले खेळ आणि बौद्धिक ऐकून ते रमले. संघदृष्ट्या प्रथम वर्ष शिक्षितही झाले. पुढे देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष झाले आणि त्यांच्या कर्तव्यनिष्ठेने आणि प्रचंड अभ्यासू वृत्तीने अमित यांना वाटू लागले की, आपणही राजकारणात सक्रिय काम करावे.
 
 
पिंपरी-चिंचवडमध्ये तर त्यांचा लोकसंपर्क दांडगा होताच. भाजप प्रदेश सदस्य म्हणून त्यांना जबाबदारी मिळाली. पिंपरी मतदारसंघामध्ये आमदार म्हणून समाजकार्य करावे, असा त्यांचा प्रयत्न होता. पिंपरी-चिंचवडमध्ये त्यांनी प्रचंड संघटन उभे केले. पण, युतीमुळे पिंपरीची जागा शिवसेनेकडे गेली. ‘तिकीट मिळाले नाही म्हणून मी काम करणार नाही किंवा पक्षच बदलतो, जो तिकीट देईल त्या पक्षात जातो,’ अशी संधिसाधू भूमिका अमित घेणे शक्यच नव्हते. त्यावेळच्या निवडणुकीमध्ये त्यांनी महाराष्ट्रातल्या २२ जिल्ह्यांत दौरा केला. सभा घेतल्या. या काळात प्रत्येक जिल्ह्यातील मातंग समाज अमित आणि भाजपच्या पाठीशी अत्यंत आनंदाने उभा राहिला.
 
 
दुसरीकडे अमित यांचा ‘समाजविकास’ हा मुद्दा काही सुटला नव्हता. ज्या ज्या जिल्ह्यात समाजावर अन्याय-अत्याचार होतो, तेथे तेथे ते प्रत्यक्ष जाऊन समाजाबरोबर उभे राहतात. यामध्ये नांदेड जिल्ह्यातील बिलोली येथील गतिमंद मुलीवर झालेल्या बलात्काराची घटना असेल किंवा माळशिरस येथील अन्याय-अत्याचाराची घटना असेल, ते तेथे वेळेत पोहोचून त्या कुटुंबासाठी मोठा आधारवड ठरलेले आहेत. महामंडळाचे अध्यक्षपद नसतानाही त्यांच्याकडे युवक-युवतींशी संपर्क कायमच होता. प्रत्येक शहरातील व्यवसाय करू इच्छिणार्‍या युवकांचा त्यांनी गट बनवला. त्यांच्या लक्षात आले की, समाजातही एक गट अत्यंत वंचित अवस्थेत आहे, जो प्लास्टिक किंवा तत्सम वस्तू गोळा करतो, विकतो. या गटांची आर्थिक विवंचना भयंकर आहे. ‘प्लास्टिक वेस्ट टू ऑईल’ या केंद्र सरकारच्या योजनेचा उपयोग करत त्यांनी या समाजबांधवांचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. मुंबई, पुणे, नवी मुंबई, सांगली, सातारा, बीड अशा १२ शहरांमध्ये या योजनेअंतर्गत गोळा केलेल्या प्लास्टिकमधून तेल निर्माण करायचा व्यवसाय उभा करण्याची योजना त्यांनी आखली. कात्रजमध्ये असा प्रकल्पही सुरू झाला आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये त्यांच्या शैक्षणिक संस्थेत पाच हजारांपेक्षा जास्त विद्यार्थी शिकत आहेत व ‘कलारंग’ संस्थेच्या माध्यमातून सांस्कृतिक क्षेत्रात पिंपरी-चिंचवडमधील त्यांचे नाव अग्रगण्य क्रमांकाने घ्यावेच लागते, ते उत्तम अभ्यासू वक्ते आहेत, शैक्षणिक व सांस्कृतिक कामासाठी त्यांना २०१२ साठी ‘राष्ट्रीय युवा पुरस्कार’ तत्कालीन राष्ट्रपतींच्या हस्ते मिळालेला आहे. आज ४ नोव्हेंबर हा त्यांचा जन्मदिवस... या दिनानिमित्त अमित गोरखे यांच्या विचारकार्याला दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे खूप खूप शुभेच्छा. ९५९४९६९६३८




@@AUTHORINFO_V1@@