नवी दिल्ली : एकीकडे देशाभरात ड्रग्स प्रकरणी शाहरुख खानचा मुलगा आयन खान रंगेहाथ पकडल्याने मोठी खळबळ माजली आहे. तर, दुसरीकडे कॉग्रेस खासदार केटीएस तुलसी यांच्या वक्तव्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. ज्येष्ठ वकील आणि काँग्रेसचे राज्यसभा खासदार केटीएस तुलसी यांनी म्हंटले की, ड्रग्जनाही गुटखा-दारू, सिगारेट यांच्यासारखी सूट देण्यात यावी. यामुळे आता ड्रग्स प्रकरणी आणखी राजकारण तापण्याची शक्यता आहे.
"मादक द्रव्ये जीवनावश्यक असून गुटखा, दारू, तंबाखू यांसारख्या पदार्थांचे सेवन कर भरून केले जात आहे. ड्रग्समध्येसुद्धा गुटखा-दारू, सिगारेट यांच्यासारखी सूट देण्यात यावी. ड्रग्ज हे जीवनावश्यक असून त्यामुळे जीवनातील वेदना कमी होतात, त्याचा समतोल वापर केला पाहिजे" असे खासदार केटीएस तुलसी यांनी म्हंटले आहे. पुढे ते म्हणतात की, आयुष्यातील वेदना ड्रग्जमुळे कमी होतात. दारू, गुटखा, तंबाखूमुळेही हानी होते. पण यांच्यावर कर भरून त्याचे सेवन करू दिले जाते. मग ड्रग्ज का नाही? करवसुली झाल्यानंतर ड्रग्जचा वापर करण्यास परवानगी दिली पाहिजे, अशी अजब मागणी केली आहे.
"ड्रग्जच्या माध्यमातून अनेक प्रसंगी औषधे घ्यावी लागतात. त्यामुळे ड्रग्जच्या वापरास परवानगी का देऊ नये? अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक पदार्थ (एनडीपीएस) कायदा, १९८५ मध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे. कारण त्याचा वापर लोकांना त्रास देण्यासाठी केला जातो. एनडीपीएस कायद्यात सुधारणा करणे आवश्यक आहे," असे मत केटीएस तुलसी यांनी व्यक्त केले.