मुंबई, दि. २६ (प्रतिनिधी) : आशिया खंडातील मोठया झोपडपट्ट्यांपैकी एक मानल्या जाणाऱ्या मुंबईतील झोपडपट्टीचा प्रश्न मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. झोपडपट्टीतील रहिवाशांचे प्रश्न आणि त्यासंबंधित बाबींवर खासदार गोपाळ शेट्टी हे वारंवार संघर्ष करताना दिसून आलेले आहेत. त्यातच आता या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी थेट महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पुढाकार घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. झोपडपट्टी वासियांच्या विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मंगळवार, दि. २६ ऑक्टोबर रोजी राजभवन येथे खासदार गोपाळ शेट्टी यांच्यासह राज्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांची एक संयुक्त बैठक घेतली.
गोरगरीबांच्या हक्कासाठी खा. गोपाळ शेट्टी यांचे प्रयत्न अतिशय स्तुत्य असल्याचे राज्यपाल भगसिंह कोश्यारी यांनी यावेळी म्हटले. तसेच एसआरए पुनर्वसनाच्या रेंगाळलेल्या निर्णय प्रक्रियेबद्दल राज्यपालांनी बैठकीस उपस्थित असलेल्या एसआरए आणि म्हाडा अधिकाऱ्यांकडे तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.
खासदार गोपाळ शेट्टी म्हणाले की, झोपडपट्टी वासियांसाठी आजवर अनेक प्रयत्न करण्यात आले आहेत आणि भविष्यातही केले जातील. झपडपट्टी वासियांकरिता बांधण्यात येत असलेले प्रकल्प जे अद्याप रेंगाळलेले आहेत ते पूर्ण व्हावे म्हणून झोपडपट्टी पुनर्वसना संबंधी २०११ पर्यंतच्या झोपडपट्टी वासीयांना घर मिळावे व जीआर अनुसार हक्काचे पक्के घर लवकरात लवकर देण्यात यावे तसेच पहिल्या मजल्यावरील झोपडपट्टीवासीयांना घर द्यावे अशी विनंती करण्यात आली होती. मात्र वारंवार पाठपुरावा करूनही हे विषय रखडलेलेच आहेत. पहिला माळ्यावर असलेल्या झोपडपट्टीवासीयांना पुनर्वसन वेळी सशुल्क आणि प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत ठराविक रक्कम भरून हक्काचे घर देण्यात यावे, अशी मागणीही खा.शेट्टी यांनी यावेळी केली.