ठाण्यातील मृत पक्ष्यांची 'बर्ड फ्लू'ची चाचणी आली समोर

    07-Jan-2021
Total Views | 892
bird flue_1  H


पशुसंवर्धन मंत्री सुनिल केदार यांची माहिती 


मुंबई (विशेष प्रतिनिधी) - काल ठाण्यात सापडलेल्या बगळ्यांची 'एव्हीयन इन्फ्लूएन्झा' म्हणजेच 'बर्ड फ्लू'ची चाचणी निगेटिव्ह आल्याची माहिती राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनिल केदार यांनी दिली आहे. पाच राज्यात बर्ड फ्लूची साथ पसरली असून लाखो पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी ठाण्यातील वाघबीळ येखील विजय वाटिका गृहसंकुलात १५ बगळे मृतावस्थेत आढळल्याने बर्ड फ्लूच्या संशयाचे वातावरण पसरले होते. 
 
 
गेल्या आठवड्यात हिमाचल प्रदेशातील पाॅंग डॅम तलाव क्षेत्रात साधारण १,८०० स्थलांतरित पक्षी मृतावस्थेत आढळले. त्यामधील बरेच पक्षी बार हेडड गिज म्हणजेच पट्टकादंब प्रजातीचे होते. या पक्ष्यांचे नमुने H5N1 इन्फ्लूएन्झा व्हायरसने संक्रमित झाल्याचे समोर आले आहे. यापूर्वीच केरळ, राज्यस्थान, हरियाणा आणि मध्य प्रदेश राज्यात या व्हायसरने प्रवेश केला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातही सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे. घोडबंदर रोडवरील विजय गार्डन या गृहसंकुलाजवळ मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या काही नागरिकांना एकामागोमाग एक असे पाणबगळे मेलेल्या अवस्थेत आढळल्याने संशयाचे वातावरण निर्माण झाले होते. 
 
 
याठिकाणी वनविभाग, ठाणे महानगरपालिका आणि पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी जाऊन पाहणी केली होती. त्यानंतर पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पुण्याच्या पशुसंवर्धन रुग्णालयात या मृत पक्ष्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवले होते. मात्र हे नमुने 'एव्हीयन इन्फ्लूएन्झा' व्हायरसच्या तपासणीत निगेटिव्ह आल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाचे मंत्री सुनिल केदार यांनी दिली आहे. पशुसंवर्धन विभागाच्या आयुक्तांनी यासंबंधीची माहिती मला फोनवरुन कळवल्याचे केदार यांनी सांगितले. बर्ड फ्लूचा जरी रिपोर्ट निगेटिव्ह आला असला तरी या पक्ष्यांना मारणारा विषाणू कोणता? याचा शोध घेण्यासाठी त्यांना आता पुण्यातील मुख्य तपासणी केंद्रात पाठवण्यात आल्याची माहिती पशुसंवर्धन विभागातील अधिकाऱ्यांनी दिली त्याचा रिपोर्ट आल्यावरच या पक्ष्यांच्या मृत्यूबाबत खुलासा होईल.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121