लोकप्रबोधनाच्या आणि लोकरंजनाच्या परंपरेचे दर्शन घडणार
महाराष्ट्र: महाराष्ट्राला शेकडो वर्षांची लोकप्रबोधनाची आणि लोकरंजनाची परंपरा आहे. आणि आपल्या राज्याची ही ऐतिहासिक परंपरा लोककलांचा इतिहास, जडणघडण, लोककलांचे पूर्वीचे आणि आजचे स्वरूप यावर प्रकाश टाकणारी ‘लोककला रंग’ ही संवाद मालिका लवकरच प्रदर्शित होणार आहे. सदर मालिका सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या फेसबुक पेज व यू ट्यूब वाहिनीवरून प्रसारित करण्यात येणार आहे.
सांस्कृतिक मंत्रालय, भारत सरकार आणि सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘लोककला रंग’ ही संवाद मालिका सोमवार दि. ४ ते सोमवार ११ जानेवारी २०२१ या कालावधीत परसारीत होणार आहे. रोज संध्याकाळी ७:०० वाजता सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई या फेसबुक पेज आणि यू टयूब चॅनलवर मालिका प्रसारित होईल. लोककलांचे अभ्यासक डॉ.गणेश चंदनशिवे यांच्या सर्व लोककलांचा थोडक्यात परिचय करून देणाऱ्या प्रस्तावनेने या मालिकेची सुरवात होणार आहे.
सदर मालिकेमध्ये शाहीर देवानंद माळी, लावणी सम्राज्ञी रेश्मा परितेकर, दशावतार कलाकार सुधीर कलिंगण, प्रसिद्ध कीर्तनकार डॉ.दिलीप डबीर, भारुडकर निरंजन भाकरे, सुप्रसिद्ध तमाशा कलावंत रघुवीर खेडकर, गोंधळकर भारत कदम, खडीगम्मत अभ्यासक मनोज उज्जैनकर आणि हे मान्यवर आपापल्या कलेचे सादरीकरण करणार आहेत. ज्येष्ठ निवेदक नरेंद्र बेडेकर या सर्व कलाकारांशी संवाद साधणार आहेत. सर्व कला रसिकांसाठी ही संवाद मालिका म्हणजे पर्वणीच ठरणार आहे.