मनसेच्या आंदोलनाला काही तास उरले असतानाच पोलिसांनी मनसे नेत्यांवर कारवाई करण्यासाठी पावले उचलली आहेत.
मुंबई : कोरोना संसर्गाच्या वाढत्या फैलावाच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आलेली मुंबईतील उपनगरीय लोकलसेवा सर्वसामान्यांसाठी अद्यापही सुरू झालेली नाही. लोकलसेवा बंद असल्याने कामावर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे, त्या पार्श्वभूमीवर कामावर जाणाऱ्यांना लोकल प्रवासाची मुभा द्या अन्यथा सोमवार २१ सप्टेंबर रोजी सविनय कायदेभंग आंदोलन करत लोकल प्रवास करू, असा इशारा मनसेने दिला आहे. मात्र, मनसेच्या आंदोलनाला काही तास उरले असतानाच पोलिसांनी मनसे नेत्यांवर कारवाईचा बडगा उचलला आहे. तसेच आंदोलनाची हाक देणारे मनसे नेते संदीप देशपांडे यांना पोलिसांनी नोटिस बजावली आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी बेस्ट बसमध्ये होणाऱ्या गर्दीचा व्हिडीओ ट्वीट करत संदीप देशपांडे यांनी ठाकरे सरकारला सवाल केला होता. लोकल सुरु न केल्यास सविनय कायदेभंग करण्याचा इशारा मनसेने दिला होता.“बसच्या गर्दीत कोरोना होत नाही, पण रेल्वेच्या गर्दीत होतो, असा सरकारचा समज आहे का??” असा प्रश्न संदीप देशपांडे यांनी विचारला आहे. खचाखच गर्दीने भरलेल्या बसचा व्हिडीओ शेअर करत त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला आहे.लोकल लवकर सुरु करा अशी मागणी विशेषतः उपनगरात राहून दररोज कार्यालयासाठी मुंबईपर्यंत प्रवास करावा लागणाऱ्या नागरिकांकडून होत आहे. हीच मागणी उचलून धरत “रेल्वे सेवा सुरु करा, अन्यथा सविनय कायदेभंग करावा लागेल” असा इशारा संदीप देशपांडे यांनी बसमधील गर्दीचा आणखी एक व्हिडीओ शेअर करत दिला आहे. दरम्यान, मनसे आमदार राजू पाटील यांनीही कामासाठी घराबाहेर पडणाऱ्या सर्वसामन्यांना लोकल प्रवासाची परवानगी मिळावी, अशी मागणी केली होती.a