नेपाळ : चीनचा दुसरा तिबेट

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Aug-2020   
Total Views |


Nepal China_1  


नेपाळच्या याच राजकीय अनागोंदीच्या परिस्थितीवर ‘ग्लोबल वॉच अ‍ॅनालिसिस’ने नुकताच एक सविस्तर अहवाल प्रसिद्ध केला. या अहवालातील निरीक्षणे आणि निष्कर्ष हे दर्शविण्यासाठी पुरेसे आहेत की, नेपाळ हा चीनसाठी दुसरा तिबेट होण्याच्या मार्गावर आहे.



ज्ञानभूमि, शान्तिभूमि,
तराई, पहाड, हिमाल
अखण्ड यो प्यारो हाम्रो
मातृभूमि नेपाल।


‘सयौं थुँगा फूलका’ अर्थात ‘शंभर फुलांनी माळलेले एक राष्ट्र’ या नेपाळी राष्ट्रगीतातील वरील एक कडवे. नेपाळ हादेखील भारताप्रमाणेच भौगोलिक, सांस्कृतिक विविधतेने नटलेला, हिमालयाच्या कुशीत वसलेला एक देश. जगातील कोणे एकेकाळचे हे हिंदूराष्ट्र. पण, आज भारताशी रोटीबेटीचे संबंध असणार्‍या नेपाळला मात्र चीन अधिक जवळचा वाटतो. गेल्या काही महिन्यांतल्या कित्येक घडामोडींनी नेपाळच्या या तिरक्या चिनी चालीने भारत-नेपाळ संबंधांमध्ये कधी नव्हे इतका प्रचंड तणाव आला. मग तो नेपाळचा भारतीय भूभाग आपल्या नकाशात दाखवण्याचा खोडसाळपणा असो वा पंतप्रधान के. पी. शर्मा ओलींनी रामनाम घेऊन आणलेला सांस्कृतिक अतिक्रमणाचा आव. परंतु, या सर्व घटनांवर कोणताही आक्रस्ताळेपणा न करता, भारताने अतिशय सावध भूमिका घेतली. परिणामी, १५ ऑगस्टला ओलींनी मोदींना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छाही दिल्या आणि नंतर दोन्ही देशांमध्ये विकास प्रकल्पांवर बातचितही झाली. पण, हे सगळे वरकरणीच.


कारण, भारतही जाणतो की, नेपाळमध्ये काहीच आलबेल नाही. नेपाळी कम्युनिस्ट पक्षातही ओली आणि पुष्प कमल दहल प्रचंड यांच्या समर्थकांचे दोन गट पडले आहेत. परिणामी, ओलींनी पाच वर्षांचा पंतप्रधान पदाचा कार्यकाळ पूर्ण करावा आणि प्रचंड यांनी पक्षांतर्गत सूत्रे सांभाळावी, या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब होऊ शकते. नेपाळच्या याच राजकीय अनागोंदीच्या परिस्थितीवर ग्लोबल वॉच अ‍ॅनालिसिसने नुकताच एक सविस्तर अहवाल प्रसिद्ध केला. या अहवालातील निरीक्षणे आणि निष्कर्ष हे दर्शविण्यासाठी पुरेसे आहेत की, नेपाळ हा चीनसाठी दुसरा तिबेट होण्याच्या मार्गावर आहे.

या अहवालाचे लेखक रॉलेंड जॅक्वॉर्ड यांच्या मते, आर्थिकदृष्ट्या सक्षम नसलेल्या देशांना हेरुन चीन त्या देशातील मोठ्या नेत्यांना भ्रष्ट करतो. सध्या एकाएकी आपली विदेशीनीती बदलणार्‍या नेपाळची वाटचालही त्याच दिशेने सुरु आहे. नेपाळच्या या चिनी वाटचालीच्या पहिल्या पावलाचे संकेतही जॅक्वॉर्ड यांनी अहवालात अधोरेखित केले आहेत. जानेवारीमध्ये जेव्हा अमेरिकेने द. अमेरिकेतील व्हेनेझ्युएला या देशावर निर्बंध लादले, तेव्हा चीनसोबतच नेपाळनेही अमेरिकेच्या या कृतीचा विरोध करुन अमेरिका आणि मित्रराष्ट्रांनी व्हेनेझ्युएलामध्ये नसती ढवळाढवळ करु नये, असा सल्ला दिला. जॅक्वॉर्ड यांच्या मते, नेपाळसारख्या देशाने द. अमेरिकेतील एखाद्या देशाविषयी बोलण्याची ही कदाचित पहिलीच वेळ होती. याच अहवालात नमूद केलेली दुसरी गंभीर बाब म्हणजे, काठमांडूमध्ये उच्चस्तरीय अधिकार्‍यांना चीन आपल्या इशार्‍यावर नाचवताना दिसतो. चिनी दुतावासाने राजन भट्टाराई, या नेपाळी कम्युनिस्ट पार्टीचे सदस्य आणि पंतप्रधान ओलींचे विदेशनीतींचे सल्लागार असलेल्या माणसाला नेपाळ-भारत संबंधावर संशोधन अहवाल लिहिण्यासाठी तब्बल १५ लाख नेपाळी रुपयाचे कंत्राट दिले. विशेष म्हणजे, हे कंत्राट याच भट्टाराई यांच्या पत्नी गीता गौतम यांना देण्यात आले, ज्यावर भट्टाराई खुद्द लक्ष ठेवून असतील. तसेच या भट्टाराई महाशयांचे चीनची नेपाळमधील राजदूत लि यिंगक्यू यांच्याशी सारखी ऊठबसही आहेच. त्यामुळे जॅक्वॉर्ड यांच्या अहवालाच्या मते, असे कित्येक अधिकारी, नेते, नेपाळी कम्युनिस्ट पार्टीतील सदस्यांना चीनने विविध आमिषे दाखवून आपल्या खिशात घातले आहे. म्हणूनच लि यिंगक्यू पंतप्रधानांसह नेपाळी कम्युनिस्ट पक्षातील कित्येक नेत्यांच्या गाठीभेटी घेताना दिसल्यामुळे या नेत्यांच्या निष्ठेविषयी संशयाचे धुके गडद झाले होते. इतकेच नाही तर, चीनच्या इशार्‍यावरुन आता नेपाळमधील २० हजार तिबेटी निर्वासितांवरही चीनविरोधी निदर्शने केल्यास कडक कारवाई होऊ शकते. तसेच दलाई लामांचा वाढदिवस साजरा करणे, त्यांच्या असोसिएशनच्या अंतर्गत निवडणुका घेणे यावरही बंदी लादण्यात आली आहे. तेव्हा, एकूणच ज्याप्रमाणे चीनने तिबेटला गिळंकृत केले, तीच वेळ नेपाळवरही ओढवू शकते. त्याची सुरुवात फार पूर्वीच झाली असून नेपाळी कम्युुनिस्ट पार्टी आणि पर्यायी देशाची सूत्रेही हळूहळू चीनच्या हाती एकवटताना दिसतात. त्यामुळे आपल्या राष्ट्रगीतातील शब्द अन् शब्दाला जागत नेपाळने आपल्या सार्वभौमत्वासाठी चीनला सुरक्षित अंतरावर ठेवले नाही, तर शंभरहून अधिक फुलांनी माळलेला हा सुंदर देश कोमेजायला वेळ लागणार नाही.

@@AUTHORINFO_V1@@