ठाणे मनपाचा भोंगळ कारभार; अंत्यसंस्कारानंतर रुग्ण जिवंत!

    08-Jul-2020
Total Views | 75

Covid 19_1  H x


रुग्णालय आणि प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे रुग्णांच्या कुटुंबियांना मनःस्ताप!

ठाणे : कोरोनाचा कहर सुरू असतानाच प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचे धक्कादायक प्रकार समोर येत आहेत. ठाण्यातही असाच काहीसा प्रकार उघड झाला आहे. बेपत्ता असलेल्या भालचंद्र गायकवाड याचे तीन दिवसांपूर्वी निधन झाले होते. त्यांचा मृतदेह कोपरीतील सोनवणे कुटुंबीयांना देण्यात आला. मृतदेहावर अंत्यसंस्कारही करण्यात आले. अंत्यसंस्कारानंतर मात्र प्रत्यक्षात सोनवणे जिवंत असल्याची माहिती समोर आली आहे.


कोविड केअर सेंटरमधून ७२ वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाचा मागील दोन दिवसापासून शोध सुरु होता. या संदर्भात बेपत्ता झाल्याची तक्रारही दाखल करण्यात आली होती. तर या दरम्यान या रुग्णाचा मृत्यू झाला असून त्यांचा मृतदेह कोपरीतील दुसऱ्याच एका कुटुंबाकडे सोपविण्यात आला असल्याची माहिती समोर आली. त्या कुटुंबाने त्यांचा आपला नातेवाईक समजून त्यांच्यावर अंत्यसंस्कारही केले. मात्र त्यानंतर त्यांच्या कुटुंबातील सदस्य जिवंत असल्याची माहिती त्यांना मिळाल्यावर हा सगळा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.


सोमवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कोविड रुग्णालयाची पाहणी केल्यानंतर त्यांनी रुग्ण बेपत्ता झाल्याचा धक्कादायक गौप्यस्फोट केला होता. दरम्यान या संदर्भात ठाणे मतदाता जागरण अभियानाच्यावतीने याला जबाबदार म्हणून पालिका प्रशासनाच्या विरोधात तक्रार दाखल केली होती.


मंगळवारी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी देखील कोविड केअर रुग्णालयात जाऊन येथील डॉक्टरांशी चर्चा करुन ४८ तासात रुग्णाचा शोध लावण्याचे आश्वासन घेतले होते. अखेर रात्री उशिरा या रुग्णाचा शोध लागला. मात्र त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती आमदार निरंजन डावखरे यांनी दिली.


सदर रुग्ण हा सुरुवातीला कळवा रुग्णालयात दाखल होता. त्यांची प्रकृती खालावल्याने रुग्णालयाने त्यांना महापालिकेच्या नव्याने सुरु करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये दाखल केले. तशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांना देखील देण्यात आली. त्यानुसार त्यांचे कुटुंबीय रुग्णालयात चौकशीसाठी देखील गेले होते. परंतु गायकवाड नावाचा व्यक्ती तेथे नसल्याचे दिसून आले. त्यानंतर मागील दोन दिवसापासून ठाणे मतदाता जागरण अभियान, भाजप यांच्या माध्यमातून त्यांच्या शोधासाठी प्रयत्न सुरु होते. परंतु त्यांचा काही केल्या शोध लागत नव्हता.


या पार्श्वभूमीवर, हा मृतदेह ३ जुलैपासून बेपत्ता असलेल्या रुग्णाचा असल्याचा आरोप भाजप आमदार निरंजन डावखरे यांनी केला आहे. मृतदेहाच्या बॅग पारदर्शक नसल्याने चेहराही पाहण्याची सोय नसल्याने नातेवाइकांच्या भावनांशी खेळ केला जात असल्याचे ट्वीट डावखरे यांनी केले. आमदार संजय केळकर यांनीही याबाबत तीव्र संताप व्यक्त करत दोषींवर तात्काळ कारवाईची मागणी केली आहे. बेपत्ता रुग्णाच्या कुटुंबियांना दोन दिवसांपासून प्रचंड मनस्ताप होत असून प्रशासनाचा हा निष्काळजीपणा आणि चूक दडपण्याचा प्रकार धक्कादायक असल्याची तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. ही अक्षम्य चूक असून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.







अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121