नरेंद्र मोदींची लडाख भेट आणि चीनला गर्भित इशारा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Jul-2020
Total Views |


modi and jingping_1 



परवाचं मोदीजींचं लडाखमधलं भाषण ऐकलं. त्यातील एक वाक्य जे मोदीजी कचकचून बोलले आणि जो गर्भित इशारा होता; ज्यांना तो इशारा दिला होता, त्यांच्यापर्यंत तो पोहोचलाच असेल. पण, त्यातून अनेक उडते पक्षी त्यांनी जमिनीवर पाडले. ‘इशारा’ नेमकं कशाला म्हणतात आणि तो कसा द्यायचा असतो, हे खरंतर मोदींच्या बर्‍याच भाषणांत आढळतं.


पुलवामानंतर लगेचच दोन दिवसात बिहारमध्ये एका रॅलीमध्ये त्यांनी इशारा दिला होता त्यांनी की, ज्यांनी हे दुष्कृत्य केलंय, त्यांना हे खूप महागात पडेल. मोदींच्या या विधानानंतर त्यांची तेव्हा अनेक जणांनी टिंगल केली की, इकडे ४४ जवान मारले गेलेत आणि तुम्ही भाषणं कसली करता? पण, १४ फेब्रुवारीची दुर्दैवी घटना घडली आणि २६ फेब्रुवारीचा ‘एअर स्ट्राईक’ आणि या दोन घटनांच्या मध्ये दिलेला तो सूचक इशारा. असा हा आपले शब्द खरे करून दाखवणारा माणूस म्हणजे नरेंद्र मोदी आणि दुसरा पंतप्रधान. पहिले अर्थातच शास्त्रीजी! परवाच्या भाषणात मोदींनी म्हटलेले वाक्य होतं - “विस्तारवाद का दौर अब खतम हो चुका है.” या वाक्याला अनेक गर्भित आणि गूढ अर्थ आहेत. अनेक कंगोरे आहेत, अनेक किनारे आहेत आणि अनेक इशारेही आहेत. सर्वप्रथम हा इशारा चीनला प्रत्यक्ष आहे. कारण, त्यावर ताबडतोब चीनचा प्रतिवाद होता - ‘भारत चीनला अकारण विस्तारवादी समजत आहे.आता या वाक्याचा रोख अगदी नरमाईचा आणि दबलेला. पण, त्यातही खूप मोठा अर्थ दडलेला आहे. मुळात चीनला कळलं की, हा टोमणा आपल्यासाठीच होता. याला ‘आ बैल मुझें मार’ असे म्हणतात आणि ‘चोराच्या मनात चांदणं.’ यात अजून एक गोष्ट स्पष्ट होते की, चीन मोदींच्या प्रत्येक कृतीकडे बारीक लक्ष ठेवून आहे आणि प्रत्येक बोलण्याचा अर्थ काढून त्यावर तो प्रतिक्रियाही देत आहे.


हा तोच चीन आहे, जो काँग्रेस सत्तेत असताना, कधी भारतीय राज्यकर्त्यांना साधी भीकदेखील घालत नव्हता. येथील राज्यकर्ते चीनच्या आगळीकीकडे कसं दुर्लक्ष करत होते, याचं मोठं उदाहरण म्हणजे 2012 मार्चमध्ये चीनने हिमाचल प्रदेश जवळच्या त्यांच्या हद्दीत लष्करी कवायती दरम्यान उल्लंघन करून त्यांची दोन हेलिकॉप्टर भारतीय हद्दीत येऊन गेली. ही गोष्ट हिमाचल प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री प्रेमकुमार धुम्मल यांनी केंद्राला कळवूनदेखील केंद्राने त्यावर काहीही हरकत नोंदवली नाही. लष्करानेही चीनच्या या आगळीकीची माहिती केंद्र सरकारला दिली. परंतु, तत्कालीन काँग्रेस सरकारने या गंभीर घटनेची किंचितशी दखल घेतली नाही, यातच सर्वकाही आले. या पार्श्वभूमीवर भारतीय पंतप्रधानांची सीमेवर भेट आणि चीनला दिलेला इशारा अत्यंत समर्पक आहे, ज्याचा गर्भित अर्थ चीनला समजला म्हणूनच त्यांनी त्वरित या वाक्यावर आपली प्रतिक्रिया नोंदवत आम्हाला आक्रमक म्हणणं हा मिथ्या आरोप आहे आणि परिस्थितीचा विपर्यास आहे, असं म्हटलं. यालाच म्हणतात नाकाला मिरच्या झोंबणं. हा इशारा पाकला देखील होता की, आम्ही चीनसारख्या देशाला धूप घालत नाही, तर तुम्ही त्यांच्यापुढे बच्चे आहात. भारताने एका वाक्यात खरंतर चीनचे इरादे स्पष्ट करून धमकीच दिली आहे. कारण, देशाचा सर्वोच्च नेता सीमेवर जाऊन फक्त जवानांना धैर्य देत नाही, त्यांची पाठ थोपटत नाही, तर समोरच्या शत्रूराष्ट्राला अप्रत्यक्षपणे धमकावतोच की, आपल्या हद्दीत व्यवस्थित राहा, अन्यथा परिणाम गंभीर होतील. त्याची झलक आम्ही १५ जूनच्या मध्यरात्री तुम्हाला दाखवली आहेच. अजून बघण्याची इच्छा असेल तर आमच्यात धमक आहे!! मुळात १५ जूनच्याच धक्क्यातून चीन सावरलेला नसताना त्याला भारताने दिलेला हा आणखीन एक धक्का होता. मुळात जो देश आजपर्यंत कुचकुचत बोलत होता आणि कायम ज्याला आपण धमकावत आलो आणि इथल्या लाचार राज्यकर्त्यांनी ते मुकाट्याने ऐकून घेतलं आणि आपल्याला फार कधी दुरुत्तरे देण्याचा विचारदेखील करू शकत नव्हते, तो देश चक्क कृती करून मोकळा झाला, याचाच चीनला धक्का बसलेला दिसतो. म्हणजे, आतून भारत किती सज्ज असेल, या विचारानेच आता चीनची झोप उडालेली दिसते.


प्रत्येक राज्यकर्त्याची आपली एक विशिष्ट मानसिकता असते. मोदींची मानसिकता मात्र खूप वेगळी आहे. मुळात आता घाव बसलाय म्हणजे जखम ताजी आहे, त्याचवेळी पुढील घाव घालून घेतले की, अशी शिक्षा मिळते की, पुढील कित्येक वर्षं तो शत्रू तोंड वर काढून बोलताच काम नये. इकडे राजनैतिक स्तरावर चीनने आपल्याशी बोलणी सुरु ठेवलीत, कारण ‘ड्रॅगन’ आयुष्यात पहिल्यांदा एका ‘कोब्रा’च्या नादी लागलाय. ज्या भारताला चीन राजकीय अर्थाने निर्जीव समजत होता, आज त्या देशाला ‘कोब्रा’सारखा डसताना पाहून ‘ड्रॅगन’ सपशेल बिथरलाय. म्हणूनच आताच अजून काही जबरदस्त घाव घालून, चीनला पुरते मागे हटवून, पुन्हा चिनी वळवळ करणार नाहीत, याची तजवीज मोदी आणि टीम करताना दिसते. मुळातच या भेटीचा चारपदरी उद्देश लक्षात घ्यायला हवा. १५ जूनला भारतीय सैन्याने दाखवलेले धैर्य आणि अतुलनीय साहस यांचं कौतुक (जो मोदीजींचा नैसर्गिक स्वभाव आहे.) मी पूर्वीच्या राज्यकर्त्यांप्रमाणे घाबरणारा नाहीहे दाखवून देणे. चीनला राजनैतिक पातळीवर पूर्णत: अडकवणे, जेणेकरून तिथे कोणतीही माघार चीनने घ्यायला नको आणि चौथा उद्देश, जर ऐकलं नाही तर पुढील कोणतीही गोष्ट करण्यास भारत कचरणार नाही आणि आमच्या सैन्याने जी काही कृती केली, ती आगळीक नव्हती, तर ती एक समजून-उमजून व ठरवून केलेली कृती होती, हे लक्षात घ्या. भारतीय सैन्यामागे संपूर्ण भारत ठामपणेे उभा आहे. त्यामुळे हा पूर्वीचा भारत नाही, हे चीनच्या आतापर्यंत लक्षात आलेच असेल.


मोदींच्या लडाखभेटीचा अजून एक अर्थ म्हणजे, १५ जूनला जे काही घडलं, ते पूर्णपणे आमच्या ‘प्लानिंग’चा भाग होता आणि ते कार्य अपेक्षेपेक्षा उत्तम पार पाडल्याबद्दल मी माझ्या बहाद्दूर सैनिकांचं कौतुक करायला आलोय. इथे एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की, पुलवामाप्रमाणेच मोदींनी हा इशारा आधीच दिला आहे की, आमच्या एकाही सैनिकाचं बलिदान व्यर्थ जाणार नाही. याचा खूप मोठा अर्थ आहे आणि चीनही बालाकोट हल्ल्याच्या घटनेतून हे पुरता जाणून आहे. मोदी जे काही सांगतात, ते नक्की करतात. परंतु, ते जे सांगत नाहीत, ते पडद्यामागे घडत असतं आणि त्याची अंमलबजावणी करण्यासाठी त्यांची टीम पूर्णपणे सक्षम आहे. यात अजून एक इशारा दडलेला आहे की, चीनच्या भारतात पेरलेल्या एजंटांना आम्ही भीकही घालत नाही आणि त्यांनी कितीही बकबक केली, तरी आम्ही जे करायचं ते करणारच! अर्थात, हा इशारा चीनला, त्यांच्यासोबत करार केलेल्या एजंटांना, कम्युनिस्ट पक्षांना आणि मीडियामधील अस्तनीतल्या सापांना देखील आहे. दुसरा एक इशारा या अचानक ठरलेल्या भेटीने मोदींनी दिला की, तुम्ही भारतीय संघटना, मीडिया आणि लोकांना करोडोंच्या देणग्या दिल्यात तरी, त्या लाचारांना आम्ही काहीही उत्तरदायी नाही आणि मोदी सर्व निर्णय स्वतंत्ररित्या घेतात, त्यावर कोणताही आणि कोणाचाही दबाव नाही. अंतर्गत वा बाह्य कोणत्याच दबावाला मोदी भीकसुद्धा घालत नाहीत. त्याचप्रमाणे कोणतीही घटना आणि त्यांचे परिणाम आम्ही आमच्या हिताचेच करवून घेतो, मग समोर कितीही मोठा शत्रू का असेना!
 

अजून एक वाक्य जे मोदींनी वापरलं, ते म्हणजे, ‘अब विकासका दौर चला है.’ यात फक्त इथला विकास नाही, तर ‘आत्मनिर्भर भारता’चा गंभीर इशारा पण आहे. म्हणजे तुमच्या इथल्या कंपन्यांना आम्ही लवकर गुंडाळून त्यांना परत तुमच्याच देशात पाठवणार हे निश्चित. कारण, ‘आत्मनिर्भर भारत’ या त्यांच्या मंत्रामध्ये समस्त भारतीय अत्यंत उत्साहाने सामील झाले. सुरुवातीला भारतीयांनी चिनी अ‍ॅप्स मोबाईलमधून डिलीट करुन दाखवलेला प्रतिसाद पाहूनच, कायद्याच्या पातळीवर, तेच अ‍ॅप्स मोदींनी बंद करून एक पाऊल पुढे टाकले. कारण, मोदींनी चीनच्या आर्थिक नाड्या हळूहळू आवळायला सुरुवात केली आहे. हा तमाम भारतीयांचा पाठिंबा लक्षात घेऊनच, तसा इशारेवजा आवाज मोदींनी सीमेवर जाऊन चीनला ऐकवला. कारण, आर्थिक नुकसान माणसाला वा देशाला बरंच काही शिकवून जातं. दुसरं असं की, जर खरंच चीनच्या आर्थिक नाकेबंदीची गणितं जमवता आली, तर तेथील अर्थव्यवस्था नक्कीच कोलमडू शकते. चीनने भारतीय कंपन्या ताब्यात घेण्याच्या हालचालींना नुकताच एक अध्यादेश काढून मोदी सरकारने तसा पायबंद घातला आहेच. ज्यायोगे येथे चीनची अनियंत्रित गुंतवणूक होणार नाही, याची काळजी घेण्यात आली आहे. त्याचा पुढील परिणाम चीनमध्ये बेकारीसह आर्थिक अस्थैर्य निर्माण होऊन, लोकमत बदल आणि त्याचे रूपांतर आज ना उद्या असंतोषात होईल आणि सत्तापरिवर्तन होऊ शकेल. कारण, कोणतीही सत्ता अनियंत्रित पद्धतीने व हुकूमशाही मार्गाने फार काळ टिकवता येत नाही, ही बाब वेळोवेळी जगातील अनेक राष्ट्रांमध्ये सिद्ध झाली आहे.


मुळात चीन हा वर्गातला एक व्रात्य आणि गुंड मुलगा, ज्याला अमेरिकेपासून सर्वच देश प्रत्यक्ष इशारा द्यायला घाबरत होते. मात्र, १५ जूनच्या भारतीय जवानांच्या धडाकेबाज आणि कल्पनातीत कृतीने, जगात सर्वांना शब्दशः तोंडात बोट घालायला लावली. हे म्हणजे एखाद्या व्रात्य आणि दंगेखोर मुलाला एखाद्या सरळ सध्या वाटणार्‍या (मुळात साध्या नसलेल्या, पण ७० वर्षांच्या चुकीच्या धोरणांमुळे सर्वच आघाड्यांवर बोटचेपं धोरण स्वीकारलेल्या) मुलाने अचानक, ध्यानीमनी नसताना सणसणीत चपराक लगावावी, तशी ही गत. १५ जूनच्या कृतीतून अजून एक गोष्ट सिद्ध झाली ती म्हणजे, फक्त लढाईची तयारीच नव्हे किंवा शस्त्रसज्जता नव्हे, तर सैनिकी मनोधैर्याच्या बाबतीत देखील भारतीय सैन्य जगात अग्रेसर आहे. कारण, जगातलं कोणतंही युद्ध केवळ संख्याबळावर नाही, तर सैनिकांच्या मनोधैर्यावरही लढलं जातं. म्हणूनच कमीतकमी सैन्य असूनसुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांना जोरदार टक्कर दिली आणि हिंदवी स्वराज्य स्थापित केलं. मोदी आल्यानंतर त्यांनी लष्कराला गरजेची शस्त्रास्त्र, उपकरणं, सामग्री सर्व काही देण्याची व्यवस्था केली आणि तेदेखील शस्त्रास्त्र खरेदी प्रक्रियेत दमडीचाही भ्रष्टाचार होऊ न देता. यामुळे सैनिकांचं मनोधैर्य उंचावलं. तसेच, ज्या ज्या वेळी सैनिकांनी आपल्या कामगिरीने भारतमातेची मान अभिमानाने उंचावली, त्या त्या वेळी खुद्द पंतप्रधानांनी सैनिकांना प्रत्यक्ष जाऊन शाबासकी दिली आहे. ‘एअर स्ट्राईक’च्या वेळीही पंतप्रधान पूर्ण रात्र जागे राहून, ही कामगिरी नीट पार पडत आहे ना, आपल्या सैन्याची काहीही जीवितहानी तर होत नाही ना, याकडे बारीक लक्ष ठेवून होते आणि खथरंच खूप मोठी गोष्ट आहे. वरील सर्व गोष्टींचा एकत्रित परिणाम चीनच्या बदललेल्या भूमिकेत दिसून येतो. जर असा बदल वरवरचा असेल, तर आपण सज्ज आहोतच. पण, आता चीनला चांगलाच धडा शिकवला जाऊ शकतो, हा इशारा या भेटीतून मोदींनी दिला. हे या भेटीचं खूप मोठं फलित म्हणावं लागेल.
 

- प्रसन्न आठवले

@@AUTHORINFO_V1@@