श्रमिक स्पेशल ट्रेनवर टीका करणाऱ्या राहुल गांधीना रेल्वे मंत्र्यांचा सवाल
नवी दिल्ली : काँगेस नेते राहुल गांधी यांनी श्रमिक स्पेशल ट्रेनवरून रेल्वे खात्यावर टीका केली होती. याच पार्श्वभूमीवर भाजप नेत आणि रेल्वे मंत्री पीयुष गोयल यांनी गांधींच्या ट्विटला प्रतिसाद देत त्यांनाच एक सवाल केला आहे.
‘देशाला लुबाडणारेच अनुदानाला नफा म्हणू शकतात. राज्य सरकारांकडून घेतल्या जाणाऱ्या रकमेपेक्षा रेल्वेने मजुरांसाठी चालवलेल्या गाड्यांसाठी अधिक खर्च केला आहे. सोनिया गांधी या स्थलांतरी मजुरांच्या तिकीटाचे पैसे देणार होत्या. त्याचं काय झालं?, असा प्रश्न आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहेत’, असा खोचक प्रश्न ट्विट करत पीयूष गोयल यांनी राहुल गांधींच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला.
राहुल गांधींनी श्रमिक स्पेशल ट्रेनबाबतच्या एका बातमीवर ट्विट केले होत. या ट्विटमध्ये त्यांनी सरकार आपत्तीतही नफेखोरी करत आहे. कोरोना साथीच्या काळात भारतीय रेल्वेने श्रमिक स्पेशल ट्रेनद्वार ४२८ कोटी रुपये कमावले आहेत. हे सरकार गरिबांच्या विरोधात आहे, असे अनेक आरोप केले.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी सरकारने २५ मार्चपासून लॉकडाऊन जाहीर केला होता. त्यामुळे परराज्यातील मजूर अडकून पडले होते. हजारो मजूर आपल्या गावी पायीच निघाले होते. या पार्श्वभूमीवर रेल्वेने विविध राज्यांमध्ये अडकलेल्या स्थलांतरीत मजुरांसाठी श्रमिक विशेष ट्रेन सुरू करत त्यांना त्यांच्या घरी रवाना केले.