टाळेबंदीतील शास्त्रीय संगीत!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Jun-2020
Total Views |

artist_1  H x W


सध्याच्या ‘कोविड-१९’मुळे उद्भवलेल्या परिस्थितीशी आपण सगळेच लढतो आहोत. समाजाचा प्रत्येक घटक या संकटामुळे अस्वस्थ झाला आहे. शास्त्रीय संगीत कलाकारांचीही तीच गत आहे. सध्या ‘फेसबुक लाईव्ह’, ‘इन्स्टाग्राम लाईव्ह’ यासारख्या अनेक माध्यमांतून हे कलाकार आपल्या समोर येऊन कला सादर करताना दिसतात. सगळेच दर्दी रसिक त्याचा आस्वादही घेतात. त्यासाठी कुठलंच मानधन, शुल्क दिलं, घेतलं जात नाही. दोन महिने हे सुरु आहे. यावर आता काही दिवसांपासून बराच ऊहापोह सुरु आहे. कलाकारांनी विनामूल्य कला सादर केली, तर तर त्यामुळं कलेचं एकंदरीतच महत्त्व कमी होत जाईल, शिवाय ज्यांचं केवळ कलेवर पोट आहे, त्यांचं काय, असा एक प्रवाह आहे, तर अशा बिकट परिस्थितीत आपल्या कलेमुळे आपण रसिकांना दोन घटका समाधान देत असू तर याहून मोठं भाग्य ते काय, असाही एक मतप्रवाह आहे. बरीच तरुण, ज्येष्ठ, श्रेष्ठ कलाकार मंडळी या संदर्भात आपली मतं मांडत आहेत व एकंदरीतच सध्या असंख्य चर्चांना उधाण आलं आहे. त्यापैकी काहींची या विषयासंदर्भात मतं संकलित करुन मांडलेले विचार...




संगीत ही अखिल मानवाची खरी भाषा आहे. ती देवरूप आहे. शुचितेचा स्पर्श देतं ते संगीत. या क्षणभंगुर आयुष्यामध्ये तेच एक शाश्वत सुख आहे. गंधर्व किन्नराची ही कला विश्वपोषक प्रभूच्या सर्वात जवळची असं मानलं जातं. कारण, ही दैवी कला धारण करणारे शास्त्रीय संगीतातील सर्वच कलाकार आपल्या अमोघ स्वरांवाटे साक्षात परम चैतन्यशक्तिशाली परमात्म्यालाच अवतरण देत असतात. कारण, स्वरवाहक आहेत. मांगल्याचं प्रतीक आहेत. म्हणूनच टाळेबंदीच्या रुक्ष, नकोशा काळातही रसिकांची मानसिक मरगळ दूर करण्याकामी आपल्या ओजस स्वरांनी अनेक कलाकारांनी सोशल मीडियाचा आधार घेत कोणतंही शुल्क न आकारता आपली कला सादर केली. कितीतरी संस्था, संयोजक फेसबुक, इन्स्टाग्राम इत्यादी माध्यमांतून देशविदेशातल्या कलाकारांचे ‘लाईव्ह’ सादरीकरण त्यांच्या पेजेसद्वारे यानिमित्ताने रसिकांपर्यंत पोहोचवत आहेत. कसोटीचा हा काळ यामुळं सुसह्य तर होतोच आहे, पण कलाकारांच्या अनुषंगानेदेखील त्याकडे पाहायला हवे. विश्वातील चैतन्यशक्ती स्वरांवाटे जागृत ठेवणार्‍या सर्वच कलाकारांसाठी सध्याचा टाळेबंदीचा काळ व यापुढचा अनिश्चित काळ इतर सर्वांप्रमाणेच तितकाच जिकिरीचा व संघर्षपूर्ण आहे, हे या लेखाच्या निमित्ताने काही कलाकारांशी बोलताना अगदी प्रकर्षाने जाणवलं.




संगीत ही अवस्था आहे. खासकरून शास्त्रीय संगीत हा तर संतुलित जीवनाचा प्रघात आहे. याच संदर्भात अमेरिकेत स्थायिक असलेले शास्त्रीय गायक समर्थ नगरकरांच्या मते, माझी कला इतरांना आनंद, समाधान देते ही बाब प्रत्येक कलाकारासाठी निश्चितच सुखावणारी आहे. पण, कुठंतरी दृष्टिकोन बदलायला हवा. बॉलीवूड, ऑर्केस्ट्रासारख्या कार्यक्रमासाठी महागडी तिकिटे काढण्याची तयारी असते, मग शास्त्रीय संगीतच मोफत हवं असा अट्टाहास का? ही मानसिकता कुठेतरी बदलायला हवी. युवा पिढीचं प्रतिनिधित्व करणारा सध्याचा आघाडीचा शास्त्रीय गायक आदित्य मोडक पुढे जाऊन संस्था, संयोजकांना आवाहन करत म्हणतो की, “आता या सर्वांनीच कलाकारांना मानधन द्यायला हवं. टाळेबंदीची अनिश्तितता वाढत जातेय आणि अशा परिस्थितीत आधुनिक तंत्रज्ञान वापरून असेच लाईव्ह कार्यक्रम करता येऊ शकतात व त्यासाठी किमान शुल्क ठेवले जावे जेणेकरून कलाकाराला त्याच्या उदरनिर्वाहासाठी मोबदला मिळेल.” आदित्यचा एक मुद्दा इथं खास नमूद करणं सर्वच कलाकारांसाठी महत्त्वाचं आहे, तो हा की केवळ कार्यक्रम हेच उपजीविकेचं साधन न राहता, कलाकारासाठी इतरही स्रोत असले पाहिजे. ते त्यांनी स्वतः विकसित केले पाहिजेत. शिकणं-शिकवणं यातूनदेखील कलेचं सृजनत्व बहरत असतं आणि चार पैसे गाठीशी पडत असतात.



“परब्रह्मामध्ये प्रवेश देते ती खरी विद्या होय. शास्त्रीय संगीताचं हे ज्ञान तर त्या विद्येचादेखील राजा आहे. पण, ज्ञानाला चिकटत जाणारा मानवी मर्यादांचा गंध जाळून टाकणं प्रत्येक कलाकारासाठी मोलाचं असतं. तशी वेळ, तसा काळ प्रत्येकाच्या जीवनात येत असतो, किंबहुना यायलाही हवा. त्यातून कला अधिक उजळून निघत असते. म्हणूनच टाळेबंदीच्या महाभयंकर काळात सकारात्मक राहून स्वतःला सिद्ध करता आलं,” असं मत व्यक्त केलंय प्रसिद्ध गायिका अर्चनाताई कान्हेरे यांनी. जे फारसं गायलं गेलं नव्हतं, ते स्वतःला आव्हान देऊन रसिकांसमोर सादर करणं याहून मोठं भाग्य ते काय! अर्थात, याचा अतिरेक होऊ न देता त्यात कुठेतरी कलाकार, साथीदार यांच्यावर अन्याय होता कामा नये, त्यांना थोडासा का होईना, मोबदला मिळालाच पाहिजे, असंही त्या आवर्जून म्हणतात. असंच काहीसं मत आहे ते तरुण शास्त्रीय संगीत गायिका रश्मी सुळे यांचं. त्या म्हणतात, “माझा लाईव्ह झालेला प्रत्येक कार्यक्रम मला खूप आनंद देऊन गेला. कारण, प्रत्येक वेळेला काहीतरी वेगळं गाऊन स्वतःला आजमावून बघता आलं. प्रचंड अनिश्तिततेच्या काळातही त्यामुळं धीर मिळाला. शिवाय त्यामुळं नि:स्वार्थ उपासना करायची संधी मिळाली.”


तृप्तीनं सजीव महाबलवान होतो असं म्हणतात. शास्त्रीय संगीतातून मिळणारी ही तृप्ती चिरकाल टिकणारी असते. कारण, तीत चेतनेचा सुवास आहे. म्हणूनच “कलाकारांनी थोड्या प्रमाणात सध्याच्या कठीण प्रसंगी श्रोत्यांसाठी विविध माध्यमांतून जरूर लोकांपर्यंत जावे, पण त्यात कुठेतरी सुसूत्रता हवी,” असं मत व्यक्त केलंय सुप्रसिद्ध संतूरवादक पद्मश्री सतीश व्यास यांनी. ज्यांना इतर वेळेला लोकांमध्ये सादरीकरण करायला फारशी संधी मिळत नाही, असे काही कलाकार प्रसिद्धीच्या हव्यासापायी विनाशुल्क असं काही करत असतील, तर ते चुकीचं आहे. काहींचा उद्देश जरूर चांगलादेखील आहे, पण एकंदरीतच यातून कलेचं अवमूल्यन तर होत नाही ना, हे बघायला पाहिजे. विनामूल्य कलाकारांकडून गाऊन घेणं हेदेखील थांबायला हवं. त्यापेक्षा चर्चासत्रं, मुलाखती, परिसंवाद, अशा माध्यमांतून रसिकांपर्यंत पोहोचणं जास्ती संयुक्तिक व सुसंगत आहे. सर्वच कलाकारांचं कल्याण व्हावं, कुठल्याही कठीण, दुःखद प्रसंगी त्यांना मदत व्हावी, या हेतूने कलाकारांची अशी राष्ट्रीय पातळीवर एक संस्था हवी, असं पंडितजी खास नमूद करतात. त्यासाठी काही कलाकार, सरकार, प्रशासन यांनी समन्वय साधून ही योजना अंमलात आणावी. आदित्यदेखील यावर पाठिंबा देत म्हणतो की, “परदेशात सर्वच कलाकारांच्या अशा संस्था आहेत. आपल्याकडेदेखील तशी संस्था असावी व जी नि:पक्षपणे चालवली जावी. ज्यात साहाय्यक निधीची सोय हवी व त्यातून प्रत्येक गरजू कलाकाराला मदत पोहोचती व्हावी.”


एकंदरीतच सध्याच्या दुर्बोध परिस्थितीत शास्त्रीय संगीतातील कलाकार आपल्या अक्षत स्वरांवाटे सर्वच रसिकांसाठी स्वर्गीय आनंदाची मनमुक्त बरसात करता आहेत. परंतु, त्यांच्याही काही मागण्या आहेत, संगीताला आराध्य मानून ज्या श्रोत्यांच्या साक्षीनं ते सुरांची अखंड भक्ती करता आहेत, त्यांच्याकडून काही रास्तं अपेक्षा आहेत. कलाकाराचं श्रोत्याशी असलेलं लाघवी नातं नेहमीच अतूट धाग्यानी जोडलं गेलं, ते अजून वृद्धिंगत होत जावं हीच अपेक्षा. येणारा पुढचा काळ कलाकार, रसिक आणि प्रत्येक सामान्य माणसासाठीच आव्हानात्मक आहे. सुप्रसिद्ध शास्त्रीय गायिका शुभदा पराडकर ताईंनी व्यक्त केलेली आर्जव यानिमित्ताने प्रत्येक सजीवाची प्रार्थना झाली आहे. त्या म्हणतात, “हे देदीप्यमान स्वरप्रभो, आमच्या मार्गात प्रतिबंध करणारं पाप तू पळवून लाव, स्वर-ताल-लयीची तत्त्वं जी विश्वबांधणीची तत्व आहेत ती तू जाणतोस! आम्हाला सरळ मार्गानं त्या आनंदाकडे घेऊन चल!” म्हणूनच कदाचित शास्त्रीय संगीताचं अधिष्ठान अटळ आहे. कारण, स्वर परमात्म्यात तादात्म्य पावण्यासाठी लागणारी दैवी ऊर्जा त्यात आहे. असे असंख्य स्वयंप्रकाशित तारे शास्त्रीय संगीताचं हे भव्य आकाश आपल्या विलक्षण प्रतिभा शक्तीच्या जोरावार सदैव तेवत ठेवतील यात शंकाच नाही.

- निराद जकातदार
@@AUTHORINFO_V1@@