चांद-तार्‍यांपलीकडे माणूस होताना...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Jun-2020   
Total Views |
shamshuddin _1  


‘भारतीयत्व के अभिमान मे संविधान के सन्मान मे’ असा संकल्प घेऊन आणि धर्मांधतेपेक्षा मानवतेच्या विचारसरणीने स्वत:ची, समाजाची देशाची प्रगती करा, असा संदेश देणार्‍या डॉ. शमशुद्दीन तांबोळी यांच्याविषयी...

पुरोगामी महाराष्ट्रात शमशुद्दीन तांबोळी हे तसे एक मोठे नाव. सामाजिक जाणिवा आणि अभिसरणाच्या प्रक्रियेत त्यांचे योगदानही लक्षणीय. त्यामुळेच त्यांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले. मुस्लीम समाजाचे अंतरंग मांडताना त्यांनी दहा पुस्तके लिहिली. ‘तिहेरी तलाक’च्या मुद्द्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मुस्लीम महिलांच्या प्रश्नाविषयी निवेदन देणारे शमशुद्दीन तांबोळीच होते. त्यामध्ये त्यांनी ‘तिहेरी तलाक’सोबतच सरकारने मुस्लीम समाजातील बहुपत्नीत्व, हलाला यावरही कडक कायदे करावे, अशी मागणी केली होती.


एम. ए, एमएड, एलएलबी, पीएच.डी असे डॉ. शमशुद्दीन यांचे शिक्षण. जागतिक शांतता आणि मैत्री अभियानात त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले आणि १५ देशांत कार्यही केले. नुकतेच ते उपप्राचार्य या पदावरून निवृत्त झाले.


परभणीतल्या मोहिद्दीन आणि रशिदा बी यांना आठ मुले. आई सुफी पंथाला मानणारी. मुर्शिदकडून ताविज बनवून ती लेकरांना घालायला लावी. पण, ताविज घालण्याआधी मुर्शिद खीर खाई, ती उष्टी केलेली खीर मुलांनी खायची, मग तो अल्लाच्या नावाने ताविज मुलांना घाले. एके दिवशी शमशुद्दीन यांनाही ताविज घालण्यासाठी नेण्यात आले. पण, मुर्शिदकडे आणि आजुबाजूची परिस्थिती बघून शमशुद्दीन यांनी मुर्शिदची उष्टी खीर खाण्यास नकार दिला. कदाचित आयुष्यातले ते त्यांचे पहिले बंड असावे. तसे ते शाळेतही जात. पण, घरी हिंदी आणि शाळेत शुद्ध मराठी. त्यामुळे शिकण्यासाठी अडचण येऊ लागली. इंग्रजीचा तर ओ का ठो कळत नसे. शेवटी कंटाळून त्यांनी शाळा सोडली. वडिलांनी या गोष्टीचे स्वागतच केले. कारण, ‘शाळा शिकून काय करायचे, रोटी कमवायसाठी कामच करायचे आहे,’ असे त्यांचे विचार. मोहिद्दीन यांच्या दुकानात कुलकर्णी नावाचे एक शिक्षक येत. त्यांनी मोहिद्दीन यांना सांगितले की, “मुलाला शिकव बाबा.” त्याच काळात गावातली काही मुलं गावाबाहेर परभणी जिल्ह्याच्या ठिकाणी शिकायला जात. त्यांचे ऐकून, त्यांना पाहून शमशुद्दीन यांनाही वाटू लागले की, आपणही परत शाळेत जावे. त्यामुळे ते शिक्षणासाठी परभणीच्या वसतिगृहात आले. आईवडिलांनी खळखळ केली. पण, शमशुद्दीन यांनी ठरवले की आपण शिकायचेच. आपल्या गावच्या बिरादरीत कुणी शिकले नाही. पुढे काय करायचे माहीत नाही. पण, आपण शिकायचे. या वसतिगृहात अशोक परळीकर नावाचे शिक्षक होते. ते रा. स्व. संघाचे विचार मानणारे होते. त्यांनी शमशुद्दीन यांना फार जीव लावला. परळीकर मास्तर शमशुद्दीन यांच्याकडे जातीने लक्ष देत. इतके की शमशुद्दीन यांच्या शाळेच्या दाखल्यावर ‘शमशू’ इतकेच नाव होते, तर परळीकरांनी शमशुद्दीन यांना बोलवून सांगितले, “शमशू असे नाव असते का?” असे म्हणून त्यांनी शमशूचे ‘शमशुद्दीन’ नाव केले. ते शमशुद्दीन यांना सांगत, “तू हमीद दलवाईंसारखा मुसलमान हो. पुण्याला कधी गेलास तर त्यांना भेट. समाजासाठी तसे काम कर.” ही गोष्ट शमशुद्दीन यांनी कायम लक्षात ठेवली. पुढे ते दहावीला गुणवत्ता यादीमध्ये आले. पुण्याला संत ज्ञानेश्वर वसतिगृहात शिकू लागले. तिथे सत्यशोधक मंडळाचे सईद अन्वर आणि अजित सरदार यांचे व्याख्यान त्यांनी ऐकले. त्यातनूच मग ते मुस्लीम सत्यशोधक मंडळाशी जोडले गेले. कार्यकर्ता, कार्याध्यक्ष आणि गेल्या चार वर्षांपासून ते या संस्थेचे अध्यक्ष आहेत.


मुस्लीम समाजामध्ये ‘जिहाद’ आणि ‘काफीर’ या दोन शब्दांवरून अंधश्रद्घा आणि द्वेष माजवला जातो. शमशुद्दीन हे थांबावे यासाठी जनजागृती शिबिरे घेतात. गेले दहा वर्षे बकरी ईदच्या दिवशी बकरा न कापता रक्तदान शिबीर आयोजित करतात. मुस्लीम समाजातील युवावर्ग समाजाच्या मुख्य प्रवाहात यावा, देश आणि समाजाशी बांधिलकी मानत त्याने आपली प्रगती करावी, यासाठी ते काम करतात. या सगळ्या संघर्षात त्यांना समाजातून प्रेम आणि विरोध दोन्ही झाला. पण, डॉ. शमशुद्दीन आपल्या विचारांवर ठाम आहेत. समाजातील महिलांच्या प्रश्नावर काम करत असताना त्यांना वाटते की, ‘बार्टी’च्या धरतीवर मुस्लीम समाजासाठी एक केंद्र निर्माण व्हावे. तसेच फातिमा बी यांच्या नावाने मुस्लीम भगिनींसाठी वसतिगृह आधारकेंद्र निर्माण व्हायला हवे. मुस्लीम भगिनींच्या प्रश्नाविषयी तुम्ही इतके संवेदनशील का? असे विचारल्यावर ते म्हणाले, “मी लहान असताना माझ्या बहिणीचा नवरा तिला माहेरी सोडून गेला. बैलगाडी घेऊन द्या, पैसे द्या, तरच तुमच्या पोरीला परत नेईन, असा निरोप पाठवू लागला. पण, आमची परिस्थिती बेताची. बहीण घरीच राहिली. पण, ‘नवर्‍याने टाकलेली’चा शिक्का बसू नये म्हणून ती पुन्हा मेलेल्या मनाने तिच्या पतीकडे गेली. पण, बहीण इथे आल्यावर त्याने दुसरे लग्न केलेले. तिने सवतही स्वीकारली. काही कारणास्तव मी आणि अब्बू तिला भेटायला सासरी गेलो. मी पाहिले, माझा मेहुणा नांगरणी करत होता. पण, औताच्या जागी त्याच्या दोन बायका बैलासारख्या जुंपल्या होत्या. ती दुर्दशा, ते दु:ख मी विसरू शकत नाही. गुराढोरांसारखे मुलीबाळींना वागवणे बंद झाले पाहिजे, असे माझे आग्रही मत आहे. देश समाजाच्या सर्वांगीण विकासामध्ये समाज पुढे यावा, हेच माझे लक्ष्य आहे.”




@@AUTHORINFO_V1@@