‘स्मार्टफोन पिंकी सिंड्रोम ’ पासून सावधान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-May-2020
Total Views |

Pinky syndrom_1 &nbs

आधुनिक जगामध्ये मोबाईल टेक्नॉलॉजी अर्थात स्मार्टफोन्सचा वापर आपल्यापैकी जवळ-जवळ प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनून गेला आहे. एक माणूस दरदिवशी दिवसातील सरासरी पाच तास स्मार्टफोनवर घालवतो. लॉकडाऊनमुळे हाताशी भरपूर रिकामा वेळ असल्यामुळे तर स्मार्टफोन वापरण्यात जाणार्‍या तासांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे आणि त्यातूनच पिंकी फिंगरम्हणून ओळखल्या जाणार्‍या करंगळीमध्ये व्यंग निर्माण होत असल्याची तक्रार घेऊन येणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यात, तासनतास स्मार्टफोनचे वजन पेलण्यामुळे आपल्या डॉमिनंट किंवा प्रामुख्याने वापरल्या जाणार्‍या हाताची करंगळी वाकडी होत असल्याचे दिसून येत आहे. यालाच स्मार्टफोन पिंकीअसे म्हणतात.


फोनचा, विशेषत: आकाराने मोठ्या, लांबरुंद स्क्रीन असलेल्या फोनचा मेसेज टाईप करण्यासाठी किंवा ईमेल्स पाठविण्यासाठी सतत वापर करत राहिल्याने अंगठा आणि इतर बोटांचा एकाच पद्धतीने वारंवार वापर होत राहतो. असे काही काळ होत राहिल्यास बोटांभोवतीच्या लहान सांध्यांची अतिहालचाल होते व कालांतराने अंगठ्याच्या लिगामेंट्स किंवा लसिकांवर किंचित ताण येऊ लागतो. अशाच हालचाल दीर्घकाळासाठी होत राहिल्यास बोटांच्या एकाच प्रकारच्या तणावपूर्ण हालचालींमुळे सांध्यांमधील कुर्चेचा क्षय होऊ लागतो व त्यातून ऑस्टिओआर्थ्ररायटिस उद्भवू शकतो. जेव्हा बोटांमध्ये आर्थ्ररायटिसचा शिरकाव होतो. तेव्हा सांध्यांभोवती अतिरिक्त हाड वाढण्याची शक्यता तयार होते आणि त्यामुळे बोट मोठे होते किंवा त्यात व्यंग तयार होते.


ही समस्या आरोग्याला प्रचंड अपायकारक नसली तरीही आहार, कुटुंबाची पार्श्वभूमी आणि इतर आजार असे काही घटक कार्यरत असल्यास सांध्याचे नुकसान होण्याची गती वाढू शकते. स्मार्टफोन पिंकीपासून दूर राहण्यासाठी काही टीप्स पुढीलप्रमाणे. 

- स्मार्टफोनचा वारंवार वापर करणे टाळा.

- स्मार्टफोन वापरायचाच असेल तर थोड्या थोड्या वेळासाठी वापरा.

- टेक्स्टिंग किंवा गेमिंगसाठी थोडा थोडा वेळ वाटून द्या.

- थोडी विश्रांती घ्या आणि हात दुखू लागण्यापूर्वी फोन खाली ठेवा.

- बोटे ताणून, उघडबंद करून त्यांना व्यायाम द्या.

- टाइप करण्याऐवजी कीबोर्ड स्वाईप किंवा स्पीच पर्यायाचा वापर करा.

- मोबाईल फोनसाठी स्टॅण्ड वापरा किंवा त्यावरील मजकूर एअरप्लेच्या माध्यमातून टीव्हीवर पाहा.

- हात दुखू लागल्यास सूज कमी करण्यासाठी औषधांच्या दुकानात मिळणारे वेदनाशामक घ्या.

- थोड्या थोड्या काळाने फोन एका हातातून दुसर्‍या हातात घेत राहा, म्हणजे एकाच हातात खूप काळासाठी फोन धरला जाणार नाही.


या सूचनांचा वापर केल्यास वैद्यकीय मदत न घेताही तुमची समस्या सुटू शकेल. फोनचा वापर तारतम्याने केल्यास तुमच्या सांध्यांवर आणि हातांच्या स्नायुबंधांवर ताण येणार नाही. हवी तशी सेल्फी येईपर्यंत फोटो घेत राहणे असो किंवा इमेलला तत्काळ उत्तर देणे असो, आपला फोन योग्य प्रकारे पकडा आणि आपल्या करंगळीवर ताण येऊ देऊ नका!


- डॉ. सचिन भोसले

(लेखक हे मुलुंड येथील फोर्टिस हॉस्पिटलमध्ये ज्येष्ठ सल्लागार, ऑर्थोपेडिक सर्जन आहेत.)

@@AUTHORINFO_V1@@