विक्रमी ‘रामायण’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-May-2020
Total Views |



ramayan_1  H x

 


कोरोनासारख्या संकटकाळात ‘रामायण’ कोण बघणार, असे तोंड वेंगाडून विचारणार्‍या, मार्क्सनिष्ठेचा गांजा लावलेल्या भोंदू पुरोगामी-सेक्युलरिस्टांना भारतीयांनी सर्वाधिक दर्शकसंख्येचा विक्रम करत अशी काही चपराक लगावली की, त्याचा खणखणाट आणखी कित्येक वर्षे ऐकू येईल.

 


रामानंद सागर निर्मित १९८७-८८ साली दुरदर्शनवर प्रसारित झालेली ‘रामायण’ मालिका ३२ वर्षांनंतर सर्वाधिक दर्शकसंख्येचा जागतिक विक्रम आपल्या नावावर करेल, असे कोणाला वाटलेही नसेल. परंतु, १६ एप्रिल २०२० रोजी तसे झाले आणि तब्बल ७.७ कोटी दर्शकांनी ‘रामायण’ मालिका पाहिली. उल्लेखनीय म्हणजे यंदा ‘रामायण’ मालिकेचे पुनःप्रसारण करण्यात आले असून आतापर्यंतचे आंतरराष्ट्रीय पातळीवरील सर्वच विक्रम एका झटक्यात उद्ध्वस्त करण्याचा पराक्रमही या मालिकेने केला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या ‘लॉकडाऊन’च्या काळात देशातील नागरिकांच्या मनोरंजनासाठी ‘रामायण’चे (‘महाभारत‘सुद्धा) प्रसारण करण्यात आले, पण त्याने पहिल्या प्रसारणकाळाची आठवणही करुन दिली. ‘रामायण’ मालिकेचा भाग प्रसारित होण्याच्या काळात अवघा देश अघोषित संचारबंदीचा अनुभव घेत असे आणि लोक दूरचित्रवाणी संचासमोर अगदी भक्तीभावाने बसत असत. ‘रामायण’ची लोकप्रियता इतकी असे की, दूरध्वनीची घंटी वाजली तरी त्यावर बोलण्याचेही लोक टाळत असत. अनेक ठिकाणी तर उदबत्ती, धूप, हार, फुले आणि मालिकेतील कलाकारांना प्रत्यक्ष राम, लक्ष्मण, सीता, हनुमंत समजून नमस्कारही केले जात. राम, लक्ष्मणाला विश्वामित्र ऋषींकडे पाठवताना, रामाला वनवासाला धाडताना, राम-भरताची भेट होताना, सीताहरणपश्चात रामाची अवस्था पाहताना आणि अशाच अनेक भावोत्कट प्रसंगात समोरचे दर्शकही त्यात गुंतत, कित्येकांच्या डोळ्यातून अश्रू वाहत. अशा तत्कालीन घटना आजही कित्येकांकडून आपल्याला ऐकायला मिळतात. आताही तसेच झाले आणि रावणपुत्र मेघनादाने लक्ष्मणाला शक्ती मारल्यानंतरच्या संपूर्ण प्रसंगाच्या भागाला सर्वाधिक दर्शकांनी पाहिले. दरम्यान, पहिला भाग प्रसारित झाला, त्यावेळीही लोकांनी ‘गुगल’वर ‘रामायण’ मालिकेबद्दल शोध सुरू केला. ‘रामायण’ किती वाजता, कोणत्या वाहिनीवर दाखवणार, हे जाणून घेण्यासाठी सर्वच जण उत्सुक होते. ‘गुगल’सह, ‘फेसबुक’ व ‘ट्विटर’वरही ‘रामायण’शी संबंधित शोध विषय पहिल्या १० मध्ये होते. विशेष म्हणजे ज्यांना ‘रामायण’चा पहिला भाग पाहता आला नाही त्यांनी दूरदर्शनच्या संकेतस्थळावर तो भाग पाहण्याचा प्रयत्न केला आणि दर्शकांच्या प्रचंड संख्येमुळे दूरदर्शनचे संकेतस्थळही कोलमडले!

 


 
‘रामायण’ मालिकेचे वैशिष्ट्य म्हणजे गेल्या काही वर्षांत जगभरात गाजलेल्या-नावाजलेल्या ‘गेम ऑफ थ्रोन्स’ किंवा ‘बिग बँग थेअरी’सारख्या मालिकाही त्यापुढे दर्शकसंख्येच्या बाबतीत ढेपाळल्या. गेम ऑफ थ्रोन्स’ची आतापर्यंतची सर्वाधिक दर्शकसंख्या आहे, १ कोटी, ७५ लाखांच्या आसपास आणि ‘बिग बँग थेअरी’ची १ कोटी ८० लाख! खर्चाचा हिशेब केला तर संपूर्ण ‘रामायण’ तयार झाले ७ कोटींत आणि ‘गेम ऑफ थ्रोन्स’ १.५ अब्ज डॉलर्समध्ये तर २७९ भाग असलेल्या ‘बिग बँग थेअरीच्या प्रत्येक भागाचा सरासरी खर्च होता २४ दशलक्ष डॉलर्स! तरीही दर्शकांना भावली ती ‘रामायण’ मालिका! ९०च्या दशकातील मर्यादित साधने, तंत्रज्ञान आणि ग्राफिक्स वापरत तयार केलेली ‘रामायण’ मालिका एकविसाव्या शतकाच्या दुसर्‍या दशकात अत्याधुनिक साधने, तंत्रज्ञान, ग्राफिक्सच्या साहाय्याने तयार केलेल्या मालिकांवर भारी पडते, हे ऐतिहासिकच! अर्थात त्यामागे भारतीयांच्या सांस्कृतिक वारशाचाही मोठा वाटा आहे. रामाचे नाव घेतल्याशिवाय देशातील कोट्यवधी जनतेचा एक दिवसही पार पडत नसेल. कारण प्रत्येकजण रामाला आपला पूर्वज मानतो, स्वतःला रामाचा वंशज मानतो. घरातील वडीलधारी मंडळी, आजी-आजोबा आजही मुला-नातवंडांना राम-लक्ष्मणाच्या हनुमानाच्या कथा सांगताना दिसतात आणि मुलेही त्यात रंगून जातात. राम, लक्ष्मण, सीता, हनुमानाशी संबंधित नावे तर देशातल्या प्रत्येक प्रांतात आणि प्रत्येक समाजघटकात आढळतात. रामाचे चरित्र इतके आदर्श आणि अनुकरणीय की, तसेच आपल्या मुलांनीही व्हावे, अशी मनीषा कित्येक आई-वडील बाळगतात. राज्यव्यवस्थेचा विचार केला तरी देशात रामराज्य नांदावे, असाच विचार इथली जनता करते. श्रीरामजन्मभूमी मुक्ती आंदोलनावेळीही लाखो लोक एकवटतात, श्रीराम मंदिरनिर्मितीची मागणी करतात आणि आता ‘रामायण’ मालिका पाहून दर्शकसंख्येचे सर्व विक्रमही मोडीत काढतात! हे आश्चर्यजनक नव्हे तर हजारो वर्षांनंतरही रामकथा आजही इथल्या नागरिकांच्या मना-मनात वसल्याचा, तिचे स्थान अढळ असल्याचा हा दाखला आहे, जो कोणीही हिरावून घेऊ शकणार नाही!

 


 
परंतु, ‘रामायण’ मालिका ‘लॉकडाऊन’दरम्यान प्रसारित करणार म्हटल्यावर पुरोगामी-सेक्युलर संकरित प्रजातींच्या पोटात दुखायला लागले. हिंदुद्वेषाने ग्रासलेल्या या टोळक्याचे डोके ठणकले आणि त्यांची ‘रामायण’विरोधी वटवट सुरु झाली. कोणी केंद्रातील सरकारचा ‘रामायण’ प्रसारणामागचा हिंदुत्ववादी अजेंडा धुंडाळू लागला, तर कोणी कोरोनामुळे खराब झालेली प्रतिमा सुधारण्याचा हा प्रकार असल्याचे म्हणू लागला, तर कोणी कोरोनासारख्या संकटकाळात ‘रामायण’ कोण बघणार, असे तोंड वेंगाडून विचारु लागला. हिंदू, हिंदू धर्म, हिंदूंच्या सांस्कृतिक-ऐतिहासिक वारशाप्रति मनात घृणाच घृणा साठलेल्यांनी ‘रामायण’चे पुनःप्रसारण नको म्हणून सोशल मीडियावरही आदळआपट केली. प्रशांत भूषण या ‘माझ्यासारखा शहाणा मीच’ मानणार्‍या विधिज्ञाने तर ‘रामायण’ व ‘महाभारत’ मालिकांना अफूचा डोस म्हटले. परंतु, भारतीयांनी मार्क्सनिष्ठेचा गांजा लावलेल्या या भोंदू पुरोगामी-सेक्युलरिस्टांना सर्वाधिक दर्शकसंख्येचा विक्रम करत अशी काही चपराक लागवली की, त्याचा खणखणाट आणखी कित्येक वर्षे ऐकू येईल. देशाची संस्कृती आणि वारसा अमान्य असलेल्या, भारतीय जनमानसाची ओळख नसलेल्यांनी गेल्या काही वर्षांपासून रावणाच्या उदात्तीकरणाचे उपक्रमही राबवले. तसेच ‘रामायण’ कधी घडलेच नाही, असा अपप्रचारही हिंदुद्वेष्ट्यांकडून करण्यात आला. पण ‘रामायण’ मालिकेला आताच्या काळातही मिळालेल्या उदंड प्रतिसादामुळे या सगळ्याच हिंदुविरोधी टोळक्याचा फोलपणा उघड झाला. राम, लक्ष्मण, सीता, हनुमंताची कथा, साधी-सुंदर मांडणी, कलाकारांचा उत्तम अभिनय आणि सत्य पोहोचवण्याच्या तळमळीला लोकांनी डोक्यावर घेतले. वेबसिरीजच्या जमान्यात चटपटीत मसालेदार भपकेबाज चित्रीकरणाला चटावलेल्या पिढीलाही ‘रामायण’ भावले. हेच ‘रामायण’चे यश म्हटले पाहिजे, जे यापुढेही अनेक वर्षे टिकून राहील..

 

 
 
@@AUTHORINFO_V1@@