सावधान! वणवा पेट घेत आहे...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-May-2020   
Total Views |


forest fire_1  

 


‘लॉकडाऊन’मुळे काही वन्यक्षेत्रांत संशयास्पद हालचालींना वेग आला आहे. त्यामुळे केवळ शिकारच नाही, तर या भागात मानवनिर्मित वणवे भडकण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यानिमित्ताने भारतातील वणव्यांची सद्यस्थिती आणि वन खात्याकडून अपेक्षित उपाययोजनांचा आढावा घेणारा हा लेख...
 

 

सप्टेंबर २०१९ मध्ये ऑस्ट्रेलियाच्या जंगलात पेटलेला वणवा फेब्रुवारी २०२० पर्यंत, म्हणजे तब्बल सहा महिने धुमसत राहिला. या वणव्याचे भीषण स्वरूप सांगायचे झाल्यास, संपूर्ण इंग्लंड देशाचे जेवढे क्षेत्रफळ आहे, तेवढे म्हणजे साधारण एक कोटी हेक्टर क्षेत्र या वणव्यामुळे जळून खाक झाले. एकट्या न्यू साऊथ वेल्स या ऑस्ट्रेलियन राज्याचे संपूर्ण हॉलंड देशाएवढे ५० लाख हेक्टर क्षेत्र या वणव्याच्या भक्ष्यस्थानी सापडले होते. त्यामुळे या जंगलातील दुर्मीळ जीवसृष्टी गॅलापेगो म्हणजे कांगारू बेटे धोक्यात आली. हजारो कांगारू व कोआलाप्राणी मृत्युमुखी पडले आहेत. वणव्याचे प्रमुख कारण म्हणजे, गवताळ झुडपांनी व्यापलेल्या प्रदेशावर झाडांची सुकलेली पाने व काटक्या सतत पडलेले होते. दुसरे म्हणजे, अवर्षण व दीर्घ काळ कोरडे हवामान. सोसाट्याच्या वार्‍यामुळे सरपणावर वीज पडून असाच वणवा पेटत राहिला आणि पसरत गेला. ब्रिटिश शास्त्रज्ञांच्या ५७ संशोधन लेखांच्या अभ्यासाप्रमाणे, अती उष्णता, कमी आर्द्रता, कमी पावसाचे प्रमाण आणि अतिवारा वाहणे इत्यादी गोष्टी जंगल-वणवे पेटण्यासाठी प्रामुख्याने कारणीभूत ठरतात. ऑस्ट्रेलियाबरोबरच सर्वाधिक चर्चेत राहिला तो ब्राझीलच्या अ‍ॅमेझॉन जंगलातील वणवा. ऑगस्ट २०१९ पासून ब्राझीलच्या या प्रदीर्घ वणव्यात तब्बल २५०० आगी लागल्या. ३० लाख विविध जातींची वृक्षसंपदा व वन्यप्राणीही या वणव्यात होरपळले. वणव्याचे स्वरूप इतके भीषण होते की, आगीचा काळा धूर ३२०० किमी दूर अंटार्क्टिक किनार्‍यापर्यंत पसरला होता.
 
नोव्हेंबर २०१८ मध्ये अमेरिकेच्या कॅलिफोर्नियामधील दक्षिण व उत्तरेकडील भागात मोठ्या वणव्यांनी ४२ जणांचे जीव घेतले. कॅलिफोर्नियातील तब्बल आठ हजार अग्निशमन कर्मचारी या १०४० चौ. किमी भागात वणवाशमनाचे काम करत होते. या वणव्यामुळे एकूण ७२ हजार हेक्टर क्षेत्र प्रभावित झाले आणि पॅरॅडाईझ शहरातील ६५०० घरे बेचिराख झाली होती. इतर देशांमधील मोठ्या वणव्यांच्या घटना बघून आपल्याला आपल्या देशातील वनसंपदा, प्राणीजीवन वणव्यात खाक होऊ नये, म्हणून जास्त काळजी घ्यावी लागणार आहे. कारण, एका आकडेवारीनुसार, २०१९ मध्ये भारतात सुमारे ३० हजार ठिकाणी जंगलात वणव्यांनी पेट घेतला. यातील ९५ टक्के वणवे हे मानवाच्या आगी लावण्याच्या कुरापतीमुळेच घडल्याचे चौकशीअंती समोरही आले. या क्षेत्रातील तज्ज्ञांनी ठरविले की, या आगी लागू नयेत म्हणून प्रयत्न करायला हवेत व त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. जंगलाजवळच्या स्थानिक लोकांना या आगी लागू नये म्हणून त्यांच्याकडून वणवाशमनाकरिता पारंपरिक सल्ला घ्यायला हवा.
 
 
वणव्यांमुळे काय होऊ शकते?

 

पूर्वीच्या काळी जंगलात वणवे हे नैसर्गिक कारणांनी लागत होते. पण, आजकाल ९५ टक्के वणवे भारतात मानवनिर्मित असल्याचे समोर आले आहेत. प्राण्यांना चरण्यासाठी गवताच्या वाढीकरिता वा पीकबदलाकरिता जंगलाजवळील काही भागांना स्थानिक शेतकरी आगी लावतात. शेतकर्‍यांच्या म्हणण्याप्रमाणे, या लावलेल्या आगींमुळे जंगलाची जागा स्वच्छ होते, शेतातील किडे, रोगट भाग व तण नष्ट होतात. जागा साफ झाल्यानंतर मद्यनिर्मितीकरिता महुवा फुलांची वाढ करतात. टेंडू झाडाची पाने आगीनंतर सुधारतात. परंतु, अशा आगीत जंगलांची अपरिमित हानी होते. त्यात राहणारे सस्तन प्राणी, पक्षी, सरपटणारे प्राणी, कीटक मरतात, जखमी होतात वा विस्थापित होतात. वनस्पतींची व विविध जाती-उपजातींची हानी होते. उष्ण कटिबंधातील जैवविविधतेतील जनुकीय साठ्यामध्ये अनेक प्रकारचे खाण्याचे प्रकार व औषधे उगवलेली असतात, ती नष्ट होण्याची शक्यता असते. शिवाय पशुपक्ष्यांचे अधिवास बदलल्याने त्यांची स्थलांतरे होतात. वणव्यांमुळे हरितगृह वायू निर्माण होऊन हवा प्रदूषित होते. वाहनांच्या व विमानांच्या हालचालींना अडथळे येतात. आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. निष्पाप जीव हकनाक मरतात.
‘फायर सर्व्हे ऑफ इंडिया’च्या २००५ ते २०१७ अशा १३ वर्षांच्या अभ्यासामधून मिळालेल्या माहितीप्रमाणे, वणवे पेटू शकतात अशी देशात २ लाख, ७७ हजार, ७५८ संभाव्य ठिकाणे आहेत. मिझोराममध्ये यातील ३२,६०० ठिकाणे छत्तीसगढ, ओडिशा, मध्य प्रदेश, आसाम आणि महाराष्ट्र येथे २० हजार ते २६ हजार ठिकाणे, आर्द्रता असलेल्या केरळमध्ये अशी १७०० ठिकाणे आहेत. महाराष्ट्रातील जंगल खात्याचे मुख्य अधिकारी प्रवीण मोटे यांच्या माहितीप्रमाणे, राज्यातील गडचिरोली भागामध्ये जंगलांचे सामायिक हक्क बहाल केल्यामुळे, वणवा आगीचे ७० टक्के प्रमाण कमी झाले आहे. तरी आपल्या देशात केरळपासून ते जम्मू-काश्मीरपर्यंतच्या जंगलांतील वणव्यांचे प्रमाण गेल्या दोन वर्षांत १२५ टक्क्यांनी वाढले आहे. २०१८ मध्ये देशातील पाच राज्यांची वणवे लागलेली ठिकाणे व महाराष्ट्रातील ठिकाणे ते कंसात दर्शविले आहे -
 
मध्य प्रदेश (४९२९), छत्तीसगढ (३३३१), मिझोराम (२३३९), ओडिशा (३७३५), महाराष्ट्र (३९१९).
 
महाराष्ट्रातील वणव्याची ठिकाणे -
 
(कोकणातील पश्चिम घाट, बुलढाणा, धुळे, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली व नागपूर)
 
देशातील काही जंगल-वणवे
 
(१) मे-जून २०१९ - उत्तराखंडमध्ये नैनितालजवळच्या जंगलात २८ मे रोजी १६१ हेक्टर क्षेत्रात ९४ आगी लागल्या. या राज्यात २०१२ मध्ये अगदी वाईट अवस्थेमधील लागलेले वणवे सोडले, तर दुसरी वणव्यांची वाईट अवस्था २०१९ मध्ये आढळून आली. वणव्यामुळे सुमारे २,५२१ हेक्टर क्षेत्र प्रभावित झाले होते. घरे पडली होती. गुरेढोरे मृत्युमुखी पडली होती. जंगलातील ड्रोनचा विभाग काम करायला अपुरा पडला होता. उत्तराखंड सरकारकडे फक्त पाच ड्रोन्स होती, तीसुद्धा पूर्णपणे उपलब्ध होऊ शकली नव्हती.
 
(२) फेब्रुवारी २०१८ - कर्नाटकातील बंदीपूर येथील व्याघ्र वस्तीतील ४८०० हेक्टर क्षेत्रावर पसरलेले जंगल या वणव्याच्या पाच दिवसांच्या आगीमुळे नष्ट झाले. एअर फोर्सच्या हेलिकॉप्टरनी आग विझविण्याकरिता कष्ट घेतले. मार्च २०१८ मध्ये तामिळनाडूमधील थेनीमध्ये ट्रेकर लोकांचा समुदाय आगीमुळे अडकून पडला. तामिळनाडू सरकारने त्यामुळे फेब्रुवारी १५ ते मार्च १५ या काळात ट्रेकरना आगी लागत असल्यामुळे या मोसमामध्ये ट्रेकिंगसाठी बंदी घातली.
 
(३) डिसेंबर २०१८ आरे कॉलनी हे मुंबईचे फुप्फुस. येथे ३ डिसेंबरला टेकडीवर ५२ हेक्टर क्षेत्रावर (तीन-चार किमी अंतर क्षेत्रावर) मोठा वणवा पेटला. वणवाशमनाकरिता ५० कर्मचारी होते. या आधी ३ मार्चला संजय गांधी उद्यानातील येऊरला चार जणांनी मुद्दाम वणवा पेटविला होता. त्यामुळे तेथील (तुळशी, विहार व पवई तलावांजवळ) जंगलसृष्टी धोक्यात होती. त्यात ७७ विविध पक्षी जाती, ६ विंचू जाती, ८६ फुलपाखरांच्या जाती, ९० कासवांच्या विविध जाती, ६ विषारी सापांच्या जाती, पक्ष्यांच्या १० विशेष जाती होत्या. म्हणूनच या वणव्यांकडे वा हे वणवे पेटू नये याकरिता वन खात्याने दुर्लक्ष करू नये.
 
(४) संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील वणव्यांची संख्या गेल्या काही वर्षांत ३०९ टक्क्याने वाढली आहे. या उद्यानात अजून हिरवीसृष्टी शिल्लक आहे, पण तेथे विकासाची कामे होत आहेत व आगी लागून जीवसृष्टी नष्ट होत आहे. वन खाते आगी लावण्याच्या कृतींसाठी स्थानिक लोकांंना जबाबदार मानते. परंतु, पर्यावरण तज्ज्ञांकडून जंगल-प्राधिकरणाकडे बोट दाखविले जात आहे. वन खात्याचे या जंगलांकडे दुर्लक्ष होत असून सरकारने वेळीच याकडे गांभीर्याने लक्ष घालायला हवे.
 
या उद्यानातील वणव्यांची गेल्या चार-पाच वर्षांतील माहिती खाली दिली आहे.
 

 


वर्ष            वणव्यांची संख्या      क्षेत्र हेक्टर         तोटा कोटी रुपये

 


२०१५               १५९              ११२९              १४.१४
२०१६               २८४              २१०५              २३.७०
२०१७               २६६              १३८१              २०.१३
२०१८               ३४८              १७६४              २९.५७
२०१९ (मार्चपर्यंत)      ५३               १५३                २.९१

 


या जंगल वणव्यांमुळे एकूण तोटा ९०.४६ कोटी रुपये झाला होता. हा तोटा गवत व लाकूड जळून खाक झाल्यामुळे होतो. पण, विविध जाती वा प्रजाती नष्ट होतात, हा त्याचा सर्वात मोठा तोटा आहे. तो तोटा असा पैशात मोजता येणार नसून त्यामुळे निसर्गाची होणारी हानी अपरिमित आहे.

 
(५) नोव्हेंबर २०१८ खारघर नवी मुंबई - २५ नोव्हेंबरपासून खारघर टेकड्यांवरील तळोजा येथील खानवच्या जंगलात एका महिन्यात आठ वणवे लागले. तेथील लोकांचे म्हणणे होते की, या वणव्यामुळे कमीत कमी एक हजार वृक्ष जळून खाक झाले असावेत. जंगल प्राधिकरणाने स्थानिक लोकांनीच आगी लावल्याचा संशय व्यक्त केला होता. वन खात्याच्या डेप्युटी कॉन्झर्व्हेटरनी २० फायर फायटिंग ब्लोवर साईटवर आणले व २५ ब्लोवर मार्गावर होते. २० गवत कापण्याची साधने विकत घेतली आहेत. या आगींच्या काही ठिकाणी शमन कर्मचारी पोहोचू शकत नव्हते. जंगल खात्याने वणवे लागू नये म्हणून खबरदारी घ्यायला हवी. तसेच वनक्षेत्रांच्या सीमांवर ठिकठिकाणी मजबूत कुंपण करुन हे भाग मानवी हस्तक्षेपापासून दूर राहतील, याकडे अधिक लक्ष द्यायला हवे.

 

 
 
@@AUTHORINFO_V1@@