३१ मार्चपूर्वी करावयाच्या १० आर्थिक बाबी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Mar-2020   
Total Views |


gulgule_1  H x


१०-११ दिवसांनंतर २०१९-२०२० हे आर्थिक वर्ष संपणार. ते संपण्यापूर्वी १० आर्थिक बाबी पूर्ण करणे गरजेचे आहे. त्याविषयीच्या आजच्या भागात माहिती करुन घेऊया.

१. करदात्याला २०१८-२०१९
या आर्थिक वर्षाचा टॅक्स रिटर्न ३१ जुलै, २०१९ पूर्वी फाईल करणे आयकर खात्याच्या नियमाप्रमाणे बंधनकारक होते. ज्या करदात्याने २०१८-२०१९चा आयकर रिटर्न अजून फाईल केला नसेल, तर त्याला तो ३१ मार्च, २०२० पूर्वी फाईल करावयासच हवा. रिटर्न उशिरा फाईल होणार असल्यामुळे एकूण ५ लाख रुपयांहून कमी उत्पन्न असणार्‍यांना १ हजार रुपये दंड, एकूण उत्पन्न १० लाख रुपयांहून अधिक असणार्‍यांसाठी १० हजार रुपये दंड. जर कराची रक्कम १० हजार रुपयांहून अधिक असेल, तर करदात्याला दंड होऊ शकतो व त्याच्यावर गुन्हाही दाखल होऊ शकतो. पण यापूर्वी करदात्याला, आयकर खात्यातर्फे नोटीस देण्यात येते. ३१ मार्चनंतर २०१८-१९ या वर्षाचा रिटर्न फाईल करता येत नाही व करदाता आयकर खात्यातर्फे ‘डिफॉल्टर’ ठरविला जातो.

२. वेतनधारकाचा कर वेतनातून कापला जातो.
स्वयंरोजगार करणार्‍यांना व व्यावसायिकांना किंवा ज्या वेतनधारकांना अन्य मार्गे उत्पन्नही आहे, अशांनी त्यांच्या उत्पन्नावर योग्य कर किती रकमेचा भरावा लागेल, याचा आकडा निश्चित करून कर भरणे आवश्यक आहे. जर एकूण आयकर भरण्याची रक्कम १० हजार रुपयांहून अधिक असू शकेल, अशांनी ‘अ‍ॅडव्हान्स’ कर भरणेही आवश्यक आहे. संपूर्ण उत्पन्न एकत्र करून ‘अ‍ॅडव्हान्स’ कर भरावा लागतो. उद्योगातून, व्यवसायातून, कॅपिटल गेनमधून व्याजातून, भाड्यापोटी किंवा बक्षिसापोटी असे सर्व तर्‍हेेचे उत्पन्न समाविष्ट करून, एकूण उत्पन्न ठरवावे लागते. अ‍ॅडव्हान्स कराचा शेवटचा हप्ता भरायची तारीख १५ मार्च होती. जर तुम्ही त्यापूर्वी अ‍ॅडव्हान्स कर भरला नसेल तर तुम्ही ‘डिफॉल्टर’ सिद्ध होऊ शकता.

३. वर्षाचे सर्व उत्पन्न तपासा.
कित्येक करदाते त्यांच्या वार्षिक एकूण उत्पन्नाबद्दल अनभिज्ञ असतात. जर तुमचे उत्पन्न ५ लाख रुपयांपर्यंत असेल, तर तुम्हाला कर भरावा लागत नाही. ५ लाख रुपयांच्यावर एक रुपयाने जरी उत्पन्न वाढले, तर तुम्ही करपात्र होता. वर्षाचे उत्पन्न तपासताना तुमच्या लक्षात आले की, तुमचे उत्पन्न थोड्याच रकमेने ५ लाख रुपयांच्या पुढे जात आहे, तर कर वाचविण्यासाठी संस्थांना देणगी द्या. ज्या संस्थांना देणगी दिल्यामुळे आयकर सवलत मिळू शकते, अशाच संस्थांना देणगी द्या. आरोग्य विम्याची पॉलिसी स्वत:साठी, कुटुंबासाठी व आईवडिलांसाठी घ्या. ‘नॅशनल पेन्शन सिस्टिम’मध्ये गुंतवणूक करा. यामुळे तुम्हाला आयकर कायद्याच्या ८०-सी अन्वये मिळणार्‍या दीड लाख रुपयांच्या करसवलतीशिवाय अतिरिक्त ५० हजार रुपयांची करसवलत मिळते.

४. कोरोनासाठी आरोग्य विमा उतरवा.
‘जागतिक आरोग्य संघटने’ने कोरोना महामारी जाहीर केला आहे. ‘इन्शुरन्स रेग्युलेटरी डेव्हलपमेंट अथॉरिटी’ने कोरोनाचा दावा आरोग्य विमा पॉलिसीत संमत करावा, असे पत्रक काढलेले आहे. जे नव्याने पॉलिसी घेतील, त्यांचा दावा मात्र एक महिना संमत होणार नाही. त्यामुळे सध्याच्या कोरोनाचा प्रसार होण्याचा वेग बघितल्यास, ज्यांचा आरोग्य विमा नाही, अशांनी तत्काळ आरोग्य विम्याचे संरक्षण घ्यावे. तुमच्यासाठी व कुटुंबासाठी उतरविलेल्या आरोग्य विम्याचे संरक्षण घ्यावे. तुमच्यासाठी व कुटुंबासाठी उतरविलेल्या आरोग्य विम्यावर २५ हजार रुपयांपर्यंत कर सवलत मिळते. आई-वडिलांसाठी आरोग्य विम्याचे संरक्षण घेतल्यास अतिरिक्त रु. २५ हजार इतक्या रकमेची कर सवलत मिळते. ३१ मार्चपूर्वी आरोग्य विमा उतरविल्यास या आर्थिक वर्षी (२०१९-२०२०) तुम्ही करसवलतीस पात्र ठरू शकता.

५. अल्पबचत संचालनालयाच्या गुंतवणूक योजनांत गुंतवणूक करा.
काही बँका अडचणीत आल्यामुळे सामान्य माणसे फक्त बचत खात्यापुरता बँकांशी संबंध ठेवत असून गुंतवणूक पर्यायांसाठी शासकीय योजनांना प्राधान्य देत आहेत. राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रे - यातील गुंतवणुकीवर सध्या दर साल दर शेकडा ७.९ टक्के दराने व्याज मिळत असून, किसान विकासपत्रावर ७.६ टक्के व्याज मिळत आहे. १ एप्रिलपासून या गुंतवणुकींवरील व्याजदर कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यात ३१ मार्चपूर्वी गुंतवणूक करावी.

६. फायदा मिळवा
शेअर बाजार कोरोनाच्या परिणामांमुळे गडगडल्याचे आपण पाहिले. ‘लाँग टर्म कॅपिटल गेन’मध्ये बर्‍याच जणांची गुंतवणूक आहे. आता वर्षाला १ लाख रुपयांहून अधिक ‘कॅपिटल गेन’ झाला तर तो करपात्र आहे. त्यामुळे ‘कॅपिटल गेन’वर भरावा लागणारा कर वाचविण्यासाठी योग्य वाटल्यास काही शेअर, म्युच्युअल फंडातील गुंतवणूक विमा व ३१ मार्चपूर्वी पुन्हा विकत घ्या. हा निर्णय योग्य आकडेमोड करून घ्या.

७. प्रधानमंत्री वय वंदना योजना (पीएमव्हीव्हीवाय)
या योजनेत ३१ मार्चपूर्वीच गुंतवणूक करता येऊ शकते. इतर पेन्शनच्या ‘अ‍ॅन्युटी’ योजना आयुष्यभर (मरेपर्यंत)गुंतवणूकदाराला पेन्शन देतात, पण हिचा कालावधी १० वर्षे असून परतावा निश्चित मिळतो. जर पेन्शनर या योजनेत गुंतवणूक केल्यापासून १० वर्षे जगला म्हणजे मुदतपूर्वीपर्यंत जगला, तर त्याला मूळ गुंतविलेली रक्कम परत केली जाते. जर ही योजना कार्यरत असताना, गुंतवणूकदारास मृत्यू आल्यास त्याच्या ‘नॉमिनी’ला रक्कम दिली जाते. करतज्ज्ञांच्या मतानुसार, ज्येष्ठ नागरिक गुंतवणूक योजनेनंतर, ज्येष्ठ नागरिकांसाठी ही सर्वात चांगली गुंतवणूक योजना आहे. सध्याच्या केंद्र सरकारने ही योजना अमलात आणली आहे. ज्या ज्येष्ठ नागरिकांनी ज्येष्ठ नागरिक गुंतवणूक योजनांत १५ लाख रुपयांपर्यंतची कमाल गुंतवणूक केली असेल, तर उरलेली रक्कम या योजनेत गुंतवावी. या योजनेत आयकर कायद्याच्या ८०-सी अन्वये करसवलत मिळत नाही व पेन्शन करपात्र आहे. गुंतविलेल्या रकमेवर ‘जीएसटी’ आकारला जात नाही.

८. पॅन व आधार संलग्न करणे
३१ मार्चपूर्वी पॅन व आधार संलग्न केले नाही, तर पॅन रद्द होणार. याशिवाय रु. १० हजार इतका दंडही आकारला जाणार आहे. हे संलग्न करण्याची प्रक्रियाफार सोपी आहे. ळपलेाशींरुळपवळरशषळश्रश्रळपस. र्सेीं. ळप या वेबसाईटवर पॅन आधारशी ऑनलाईन संलग्न करता येते.

९. एफएमपी, फंड्,-म्युच्युअल फंडचे फिक्स मॅच्युरिटी प्लान्स
एफएमपी, फंड्,-म्युच्युअल फंडचे फिक्स मॅच्युरिटी प्लान्स हे ‘क्लोज्ड- एन्डेड’ योजना आहेत. फिक्स मॅच्युरिटी प्लान्समध्ये तीन वर्षांहून अधिक गुंतवणुकीवर मिळणारा ‘गेन्स’ हा दीर्घ मुदतीचा ‘कॅपिटल गेन’ मानला जातो. बर्‍याच म्युच्युअल फंड कंपन्या डेट फंड्समध्ये फार मोठ्या प्रमाणावर तोट्यात आहेत. त्यामुळे या गुंतवणुकीवर ३१ मार्चपूर्वी पुनर्विचार करा.

१०. टर्म इन्शुरन्स विकत घ्या
हा सर्वात चांगला विमा प्लान. कमी पैशात जास्त रकमेचे संरक्षण मिळते. तुम्ही अजूनपर्यंत टर्म इन्शुरन्स उतरविला नसेल, तर तत्काळ उतरवा.१ एप्रिलपासून प्रीमियम रकमेत २० टक्के वाढ होण्याची शक्यता आहे.
परंतु, देशात कोरोनामुळे निर्माण झालेली महामारीची परिस्थिती लक्षात घेता, सरकारी निर्णय, धोरण, योजना, त्यांच्या डेडलाईन्समध्ये देखील बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तेव्हा, सरकारी हेल्पलाईन क्रमांक, संकेतस्थळांवरुन योग्य ती माहिती मिळवा आणि त्या अनुषंगाने आपले आर्थिक निर्णय घ्या. पण, तत्पूर्वी कोरोनापासून पूर्ण खबरदारी घ्या आणि सुरक्षित राहा.
@@AUTHORINFO_V1@@