...‘का रे’ करणारे कुठे आहेत?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Feb-2020
Total Views |

agralekh _1  H



शिवसेनेविषयी शिवराळ भाषा वापरणाऱ्या आशिष शेलारांचे होर्डिंग लावून काही लाचारांनी आपल्या धन्याला खुश तर केले. मात्र, शिवसेनेसमोर उभ्या असलेल्या मूलभूत प्रश्नांचे काय?



ज्यांनी नव्वदीच्या दशकातली शिवसेना पाहिली आणि तिच्या कायमचे प्रेमात पडले, त्यांना आज काय वाटत असेल, हा मोठ्या संशोधनाचा विषय आहे. ‘भूमिपुत्रांची चळवळ’ म्हणून समाजशास्त्राच्या पाठ्यपुस्तकात विसावलेली शिवसेना आता नेमकी कोणती, हा प्रश्नच पडावा. राजकन्येशी लग्न करण्यासाठी नखे काढून, दात पाडून राजाकडे जाणाऱ्या  आणि नंतर मरेस्तोवर मार खाणाऱ्या सिंहाची गोष्ट जगजाहीर आहे. पण, त्यात आता ताजा कलमही जोडला जाऊ शकतो. भारतीय जनता पक्षाचे नेते आ. अॅड. आशिष शेलार यांनी, “राज्यात एनआरसी कायदा लागू करणार नाही,” या विद्यमान मुख्यमंत्र्यांच्या विधानाला सणसणीत उत्तर दिले. अशाप्रकारे केंद्राचे कायदे राज्यांना नाकारता येत नाहीत. अशी वागणूक घटनाबाह्य ठरते. त्यामुळे आशिष शेलार यांनी जो खडा सवाल उपस्थित केला, तो योग्यच म्हणावा लागेल.




मात्र, शिवसेनेने त्यावर जी प्रतिक्रिया दिली, तिला ‘बायकी’ म्हटले, तर तो स्त्रीत्वाचा अपमान होईल. ‘मर्दाचा पोवाडा मर्दाने गावा,’ असे बाबासाहेब पुरंदरेंचे वाक्य आहे. शिवचरित्र कथन करताना त्यांनी ते अनेकदा वापरले आहे. आशिष शेलार जे बोलले, ते शिवसेनेला झोंबले. राजकारण हा काही पकडापकडीचा किंवा शिवाशिवीचा खेळ नाही. वेळ पडल्यास अंगावर घ्यावे लागते आणि जावेही लागते. मात्र, आशिष शेलार यांना उत्तर देण्याच्या नादात शिवसेनेने जे केले, ते काही मर्दाचे लक्षण नाही. एक गलिच्छ होर्डिंग रंगवून त्यावर बीभत्स चित्र काढून शिवसेनेने आपण कुठे जाऊन पोहोचलो आहोत; ते दाखवून दिले आहे. मुंबईकरांनी शिवसेनेला डिवचणाऱ्या सेनेच्या वाघांची कशी चपराक बसते हे पाहिले आहे. मात्र आता तो आक्रमकपणा, ती जरब सेनेची राहिलेली नाही. त्यामुळे असल्या अभद्र उद्योगांच्या आधारावर सेनेला निनावी होर्डिंग्ज लावावी लागत आहेत.



शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली. मराठीच्या मुद्द्यावरून शिवसेना हिंदुत्वाच्या मुद्द्याकडे सरकली आणि त्यातून जो काही मिळायचा तो राजकीय लाभ शिवसेनेला मिळाला. शिवसेनेचे राज्य आहे म्हणून मुंबई महानगरपालिका ही जगातली सर्वात चांगली महापालिका नाही आणि मुंबईकर सर्व सोयीसुविधांनी युक्त अशा शहरात राहतात, असेही काही नाही. मात्र, शिवसेनेला लोक मानतात, ते शिवसेनेच्या रोखठोक भूमिकांमुळे! बाप काढणे हा रांगड्या मराठी माणसाचा सहज स्वभाव. शिवसेनेच्याच नव्हे, तर किती तरी अन्य नेत्यांनीही आपल्या भाषणात अशी उदाहरणे वापरली आहेत. खुद्द उद्धव ठाकरेंनीही हा शब्दप्रयोग अनेकदा केला आहे. एका वेगळ्या संदर्भात त्यांनी तर आपल्या वडिलांना दिलेल्या वचनाची पूर्ती करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रालाच फसविले. भारतीय जनता पक्षाशी शिवसेनेने युती केली होती. मोदींच्या नावाने खासदार, तर फडणवीसांच्या नावाने आमदार निवडून आणले होते. मात्र, ऐनवेळी शिवसेनेने पलटी मारली आणि महाराष्ट्रात जे काही सुरू आहे, ते सगळ्यांच्या समोर आहे. आयुष्यभर काँग्रेसशी लढलेल्या शिवसेनाप्रमुखांच्या पक्षाला काँग्रेसच्या टेकूवर सरकारात बसविण्याचे जे पाप उद्धव ठाकरेंनी केले, त्याने त्यांच्या वडिलांचाच काय, पण प्रबोधनाचा वारसा मानल्या जाणाऱ्या   प्रबोधनकारांचादेखील आत्मा सुखावला असेल काय?




शिवसेनेला अशा प्रकारची पोस्टरबाजी का करावी लागते? मागे प्रकाश मेहतांच्या किंवा किरीट सोमय्यांच्या बाबतीतही अशीच पोस्टरबाजी केली गेली होती. ‘अरे’ ला ‘का रे’ करणारे शिवसेनेचे मर्द मावळे कुठे निघून गेले, हाच खरा सवाल आहे. आज ज्यांच्यासोबत शिवसेना सत्तेत आहेत, त्यांच्याकडूनही शिवसेनेची अशाच प्रकारे टिंगलटवाळी केली गेली आहे. मात्र, त्यांनाही शिवसेनेने असे काही उत्तर दिल्याचे आठवत नाही. या कालच्या शिवसेनेसमोरचे प्रश्न खरे तर आजच्या शिवसेनेत दडलेले आहे. बाळासाहेबांसाठी जिवाचे रान करणारा शिवसैनिक शिवसेनेत होता, कारण त्यांना बाळासाहेबांचा उद्देश ठाऊक होता. उद्धव ठाकरे व संजय राऊत यांच्या शिवसेनेतला नेमका फरक तोच आहे. गेल्या दहा वर्षांत शिवसेनेने जो काही सत्तेचा खेळ मांडला, त्यात ‘८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण’ हे ब्रीद वाहून गेले आहे. आता ‘१०० टक्के राजकारण’ आणि त्यात पुन्हा ‘तडजोडीचे राजकारण’ असे नवे समीकरण रूजू झाले आहे. आता अशा प्रकारची खोगीरभरती जर शीर्षस्थ नेतृत्वाकडूनच होत असेल, तर कुणा शिवसैनिकाने संघटनेसाठी संघर्ष का करावा? पोलीस केसेस स्वत:वर का घ्याव्या? मग कुणीतरी चापलूस असली घाणेरडी होर्डिंग्ज लावून आपल्या धन्याला खुश करून जातो. धनीही असा कमी वकूबाचा की तोही एवढ्यावरच खुश होतो. या अशा जुळवाजुळवीवर शिवसेनेचे सगळे चालले आहे.



भाजप हा कार्यकर्त्यांचा पक्ष. एक कार्यकर्ता चालेनासा झाला की दुसरा कार्यकर्ता तिथून येऊन आपले काम बजावतो. मात्र, घराणेशाहीच्या आधारावर चालणाऱ्या पक्षात असे होत नाही. घराणेशाही आणि तिच्या जिवावर मोठी होणारी बांडगुळे अन्य कुणाला संघटनेत मोठे होऊ देत नाही. शिवसेनेकडून समाजाला काही अपेक्षा आहेत. त्या अपेक्षांसाठीच शिवसेनेला लोकांनी मतदान केले आहे. ‘एनआरसी’च्या निमित्ताने धर्मांध मुसलमान रस्त्यावर उतरला आहे. अमर जवान स्मारकावर लाथ मारणाऱ्या मुसलमानाचा फोटो सर्वदूर पसरला होता. त्याच प्रवृत्ती आता पुढे यायला लागल्या आहेत. वस्तुत: ‘एनआरसी’चा आणि मुसलमानांचा काहीच संबंध नाही. मात्र तो जोडून जे काही चालू आहे, ते देशविघातक तर आहेच, पण सर्वसामान्य भारतीयांच्या मनातही असुरक्षितता निर्माण करणारे आहे. या असल्या वागण्याला नैसर्गिक प्रतिसाद जो आणि जसा मिळायला हवा, तो मिळाल्याशिवाय राहणार नाही. माथेफिरू म्हणून ज्यांच्या प्रतिक्रिया धिक्कारल्या गेल्या, त्यांचा असाही विचार करावा लागणार आहे. समलैंगिकांचा मोर्चा ‘देशाचे तुकडे होतील’ म्हणणाऱ्यांचे समर्थन करणाऱ्यांचा अड्डा होत असेल आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आपल्या सुटट्यांत मशगुल असतील, तर त्यांच्यावर परखड शब्दांत टीका करावीच लागेल.
@@AUTHORINFO_V1@@