मुंबई : ओबीसींची स्वतंत्र जनगणना व्हावी अशी मागणी अशी मागणी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी विधानसभेत केली आहे. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात छगन भुजबळ यांनी ही मागणी केली. त्यांच्या या मागणीला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी समर्थन दिले आहे. तसेच देशाचे पंतप्रधान स्वतः ओबीसी असल्याचे फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
जनगणनेच्या अर्जात बदल केले जावेत अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली आहे. बिहार राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्रातही ओबीसी समाजाची वेगळी जनगणना करावी असे छगन भुजबळ यांनी म्हंटले आहे. जनगणनेच्या फॉर्ममध्ये ओबीसीचा एक वेगळा पर्याय दिला तर जनगणना होऊ शकते, असेही ते यावेळी म्हणाले.
यावर देवेंद्र फडणवीस यांनी समर्थन देत, “आम्हाला या विषयाबद्दल आधी कळवले असते तर आम्ही अधिक माहिती घेतली असती. भुजबळ यांनी मांडलेला विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. आमचं त्यांना समर्थनच आहे. ओबीसींसाठी योजना, कार्यक्रम राबवताना जनगणना माहिती असेल तर धोरण आखण्यास मदत होते. सातत्याने ही मागणी होत आहे. सर्व पक्षांचे त्याला समर्थन आहे. ठराव केल्यानंतर आपण रजिस्ट्रार जनरलकडे पाठवला. शेवटी तेदेखील अधिकारी आहेत. जे काही नियम आहे त्यानुसार त्यांनी संविधानात तरतूद नाही वैगेरे उत्तरे दिली आहेत. पण हा धोरणात्मक निर्णय आहे. खरे तर देशाच्या पंतप्रधानांना काही जात नसते. पण योगायोगाने देशाचे पंतप्रधान स्वत: ओबीसी आहेत. धोरणात्मक निर्णय असल्याने आपण पंतप्रधानांकडे जाऊन विनंती करणं गरजेचे आहे. त्यासाठी अध्यक्षांनी पुढाकार घेतला पाहिजे,” असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटले आहे.