कुसुमाग्रज... क्रांतीच्या तेजातली समरसता

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Feb-2020   
Total Views |

kusumagraj_1  H


विष्णू वामन शिरवाडकर अर्थात ‘कुसुमाग्रज’ म्हणजे साहित्यिक विश्वातले एक अद्वितीय व्यक्तिमत्त्व. त्यांच्या काव्याने पिढ्या घडल्या. मराठी साहित्य प्रांगणात अखंड तेजस्वी तारा म्हणून कुसुमाग्रजांचे स्थान अढळ आहे. त्यामुळेच की काय, त्यांचे नाव एका तार्‍यालाही दिले आहे. आज त्यांचा जन्मदिवस आणि मराठी राजभाषा दिनही... त्यानिमित्ताने त्यांच्या काव्यसाहित्याचे हे रसग्रहण...


कवी नुसता जगतच नाही
, तर ठराविक कालावधीमध्ये इतरांपेक्षा अधिक जगत असतो. कवी म्हणजे सुसंस्कृत समाजातील असंस्कृत अथवा रानटी मनुष्य. याचा अर्थ कवीजवळ संस्कृती नसते असा नाही, किंबहुना इतरांपेक्षा थोडी अधिक असते. पण, त्याची निष्ठा असते ती संस्कृतीच्या मूळ, विशुद्ध तत्त्वावर; त्यावर उभारलेल्या रंगीत, नक्षीदार ताबूतावर नव्हे.” कवीश्रेष्ठ कुसुमाग्रजांनी कवी म्हणजे कोण, याबद्दल केलेली मिमांसा...


प्रत्यक्ष कुसुमाग्रजांच्या कवितांचा अनुभव घेतला असता जाणवते की
, खरेच कवी नुसता जगतच नाही, तर ठराविक कालावधीमध्ये इतरांपेक्षा तो अधिक जगत असतो. कुसुमाग्रजांच्या प्रत्येक कवितेत हे जगणे शब्द होऊन भाव संवेदनांची तरल अभिव्यक्ती होतात. साहित्यसेवेबद्दल ज्ञानपीठ मिळवणारे कुसुमाग्रज. स्वतःच्या साहित्यिकपणाला त्यांनी कधीही गर्वाचे घर होऊ दिले नाही. उलट आपल्या कवितेबाबत ते म्हणतात,

समिधाच सख्या या

यात कसा ओलावा?

कोठुनी फुला परि, वा मकरंद मिळावा

जात्याच वृक्ष या एकतरी आकांक्षा

तव अंतर अग्नी, क्षणभर तरी फुलवावा॥

आपल्या कवितेने वाचकाचे भावविश्व समृद्ध होणार आहे. त्यात अवास्तव भावनांचा ओलावा असेल-नसेल, पण आयुष्याच्या ध्येयप्राप्तीच्या लक्ष्याचा अग्नी त्यातून फुलायला हवा. ही ध्येयप्राप्ती, ही लक्ष्यनिष्ठा कुसुमाग्रजांच्या काव्यरचनेचा आत्माच म्हणायला हवा.

कुसुमाग्रज स्वतःच्या कवितेला ‘समिधा’ म्हणत असताना वि. स. खांडेकर म्हणतात की, “कुसुमाग्रज तुमच्या कविता अग्नी फुलवणार्‍या आहेत, पण त्या ‘समिधा’ म्हणण्याऐवजी मला शमी वृक्षासारख्या वाटतात. ज्या शमी वृक्षावर महाभारतातील पांडवांनी शस्त्रे ठेवली आणि त्या शस्त्रांना अन्यायाचा प्रतिकार करण्याचे तेज आले.” खांडेकर म्हणतात ते अन्यायाचे प्रतिकार करण्याचे तेज कुसुमाग्रजांच्या कवितेत आहे, शब्दात आहे. स्वातंत्र्यपूर्व भारताच्या कालखंडात कवितेचा ध्यास घेतलेल्या कुसुमाग्रजांची कविता ही क्रांतिकारीच होती. घरादारावर नांगर फिरवून आयुष्याचा होम करून केवळ भारतमातेच्या स्वातंत्र्याचा ध्यास घेणार्‍या महान देशभक्तांचा तो काळ. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, मदनलाल धिंग्रा वगैरेंसारखे तरुण हसत हसत फासावर गेले, तर स्वातंत्र्यवीर सावरकर अंदमानाच्या कराल कारावासात नरकवास भोगू लागले. या सर्व देशभक्तांच्या हृदयातली आग, या सर्व क्रांतिकारकांच्या मनातील क्रांती कुसुमाग्रजांचे शब्द जगत होती. ‘गर्जा जयजयकार क्रांतीचा’ कविता वाचली, त्यातले कडवे -

खळखळू द्या

या अद्य शृंखला हाता-पायात

पोलादाची काय तमा मरणाच्या दारात?

सर्पांनो उद्दाम आवळा कसूनिया पाश

पिचेल मनगट परी उरातील अभंग आवेश

गर्जा जयजयकार क्रांतीचा,

गर्जा जयजयकार

ही कविता वाचून डोळ्यासमोर उभे राहतात ते देशासाठी कारावास भोगणारे, फासावर जाणारे देशभक्त. ज्यांच्या हातात बेड्या आहेत, देशाच्या स्वातंत्र्याचे स्वप्न पाहिले म्हणून ज्यांना इंग्रजांनी असह्य शारीरिक वेदना दिल्या. मात्र, या वेदनाही फुलाप्रमाणे समजून मातृभूमीच्या स्वातंत्र्याचेच त्यांना अप्रूप आहे. त्यासाठी त्यांना मृत्यूही जीवन आहे, शूलही फूलच आहे. ‘पृथ्वीचे प्रेमगीत’ कविताही अशीच कविता. जी शूर पत्नीचे वैराग्य वर्णन करते.


कुसुमाग्रजांची कविता ही शाश्वत मानवी मूल्यांचा गजर करते
. स्वातंत्र्य, समता आणि या दोहोंना जोडणारी समरसता या मूल्यांचा वेध घेत कुसुमाग्रजांची कविता शोषित, वंचित, अंत्यजांचा आवाज बनते. त्यांची ‘पाचोळा’ कविता याबाबत समर्पक वाटते. पायाखाली तुडवला जाणारा पाचोळा, त्याला झाडावरची ताजी हिरवी पाने हसतात, आजूबाजूचे गवतही हिणवते. पण एक दिवस असाही येतो की, त्या वनात वादळ येते, पाचोळ्याला घेऊन उंच दूर उडते. पाचोळ्याची जागा मोकळी होते. ती मोकळी जागा पुन्हा भरणार असते, हे सांगताना कुसुमाग्रज म्हणतात,

...आणि जागा हो मोकळी तळाशी

पुन्हा पडण्या वरतून पर्णराशी


‘पाचोळा’ कवितेचा उल्लेख करताना वि. स. खांडेकरांना ही कविता शोषितांच्या वेदनेची वाटते. यावर कुसुमाग्रजांचे म्हणणे होते की, “असेलही, पण मला मात्र नव्या-जुन्या पिढीचा संघर्ष वाटतो. मृत्यू येऊन जुन्या जाणत्यांना घेऊन जातो आणि कालची तरुणाई आज त्या जुन्या-जाणत्याची जागा घेते.” अर्थात, दोन महान साहित्यिकांनी मांडलेले ते अर्थ आहेत. त्यांची ‘नको गं, नको गं, आक्रंदे जमीन’ ही कविताही अशीच. या कवितेमध्ये गाडी आपल्या अफाट बळाने जमिनीला दाबत-चिरडत जाते. जमीन विनवणी करते, पण गाडी आपल्याच कैफात. वर जमिनीच्या दुःखाला हसत, तिला चिडवत, ‘तू दुर्बळ, भित्री आहेस. तुझी हीच लायकी,’ असे सुनावते. त्यानंतर काय होते? कुसुमाग्रजांच्या कवितेतली ती दुर्बळ जमीन, भयंकर अपमान, अत्याचार असह्य होऊन शेवटी क्रोधित होते, संतापाने थरथरते आणि तिच्यावर चालणारी गाडी दरीत कोसळते, तिची शकलं होतात. कदाचित नव्हे तर खात्रीने कुसुमाग्रजांना या कवितेतली जमीन म्हणजे समाजातील सज्जनशक्ती अभिप्रेत असावी, या सज्जनशक्तीच्या डोक्यावर मिर्‍या वाटत आपला अस्तित्वाचा तोरा मिरवणारी गाडी म्हणजे समाजातली दुर्जनशक्ती अभिप्रेत असावी. सज्जनांना छळताना, त्यांच्या सहनशीलतेला भ्याड समजून दुर्जनही असेच गाडीसारखे बेफाम होतात. पण, सज्जनांची सहन करण्याची मर्यादा संपली की, मग मात्र त्यांना छळणार्‍यांची खैर राहत नाही.




कुसुमाग्रजांच्या कवितेत वास्तवता भरून राहिलेली आहे
. त्यामुळे प्रेम, नातीगोती वगैरेही वास्तवतेच्या पाऊलखुणा वाजवतच येतात. आपल्या आयुष्यातल्या लाडक्या प्रेयसीचे वर्णन करताना कितीतरी कवीकल्पना चंद्रतारे आणि नसलेले-असलेले सारेच तिच्यात पाहतात. मात्र, कुसुमाग्रज स्पष्ट लिहितात-

ती नव्हती कोणी लावण्यवती रूपगर्विता

ती नव्हती कोणी

प्रतिभावंताची स्फूर्तीदेवता

ती होती फक्त एक किनारा

भरकटलेल्या गलबताचा एकमेव निवारा

भरकटलेल्या गलबताचा एकमेव निवारा॥

हे शब्द वाचतानाच आठवते, त्या पुरुषाच्या जीवनात, त्याच्या सुखदुःखात सर्वार्थाने साथ देणारी त्याची सहचारिणी. ती पत्नीही असेल किंवा प्रेयसीही असेल. जी लौकिकार्थाने सर्वांगसुंदरी नसेल किंवा तिच्यात भूल पाडण्यासारखे विभ्रमही नसतील, पण दुःखाने उन्मळून गेलेल्या जोडीदाराला पुन्हा आयुष्यात, माणसात आणण्याची शक्ती तिच्यात असते. त्याच्यासाठी तीच अंतिम निवारा असते.



या पार्श्वभूमीवर स्त्रियांवर अत्याचार करणार्‍यांना
, त्यांच्या कोमल भावनांचा गैरफायदा घेत त्यांना फसवणार्‍या प्रवृत्तीवर कठोर टीका करताना कुसुमाग्रजांची कविता जहालच होते. ते म्हणतात-

तसे आम्ही सारेच दुष्यन्त

कालिदासाच्या संमतीशिवाय

कोणाच्या तरी स्फटिक भावनेवर

त्वचेच्या अभिलाषांचे

लाल महाल बांधणारे

आणि कोणालाही न दिसणार्‍या तपोवनातील पर्णकुटीत

सर्वस्वाचं दान घेतल्यावर

सर्वांना दिसणार्‍या सुसंस्कृत राजसभेत

‘अ’ पासून ‘ज्ञ’ पर्यंत सगळे काही

निःसंकोच नाकारणारे



कुसुमाग्रजांच्या कवितांना विषयांचे कोणतेही बंधन नाही
. आज समाजात गटातटाने थोर महात्म्यांच्या अक्षरशः वाटण्या केल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक यांनाही काही महाभागांनी जातनिहाय वाटून घेतले आहे. कुसुमाग्रज या सगळ्यांचा यथेच्छ समाचार आपल्या ‘अखेरची कमाई’ या कवितेमध्ये घेतात. या कवितेत गांधीजी सगळ्या महात्म्यांकडे आपली व्यथा व्यक्त करतात-

तरी तुम्ही भाग्यवान

एकेक जातजमात तरी

तुमच्या पाठीशी आहे

माझ्या पाठीशी मात्र

फक्त सरकारी कचेर्‍यांतील भिंती।



कुसुमाग्रजांच्या कविता या शब्दातीत आणि कालातीतही आहेत
. प्रत्येक युगात आणि पिढी दर पिढी ती जास्तच आत्मानुभवी होते. कोणत्याही निराश मनाला आणि समाजाला आशेची प्रेरणा देणारे अमृत कुसुमाग्रजांच्या कवितेत आहे, हे मान्य करावेच लागेल, जे सांगते-

रात्रीच्या गर्भात असे उद्याचा उषःकाल

किंवा प्रतिकूल परिस्थितीत

सर्व काही हरलेल्याला ती सांगते

तडिताघाते कोसळेल का तारांचा संभार

कधीही तारांचा संभार



त्यामुळेच तर कवी बा
. भ. बोरकर आणि शंकर वि. वैद्य यांनी कुसुमाग्रजांच्या कवितेबद्दल म्हटले आहे की, “सर्वांगीण सामाजिक क्रांती, राजकीय घडामोडी आणि सांस्कृतिक स्वातंत्र्य यांच्या विस्तृत संदर्भाकडे पाठ न फिरवता वैयक्तिक सुखदु:खांची अतिशय हळुवार जोपासना करू पाहणार्‍या तरुण मनाची ही कविता जणू स्वतंत्र भारताची प्रातिनिधिक कविता आहे.”

खरेच आहे, कारण कुसुमाग्रजांची कविता म्हणजे-

शब्द नव्हेच तर, भावना आहे

ती मनाच्या शांतीची

अन्यायाविरोधातल्या क्रांतीची

क्रांतीच्या तेजात उमललेल्या समरसतेची

@@AUTHORINFO_V1@@