शिक्षण समिती अध्यक्षांचा इशारा
मुंबई: ज्या शाळांच्या भिंतीवर यापुढे ‘मुंबई महापालिका अनुदानित शाळा’ असा फलक नसेल, त्या शाळांचे अनुदान बंद करण्यात येईल, असा इशारा मुंबई महापालिका शिक्षण समिती अध्यक्षांनी दिला आहे.
“ज्या शाळांना मुंबई महापालिकेकडून अनुदान देण्यात येते, त्या शाळेच्या भिंतीवर अथवा दर्शनी ठिकाणी ‘मुंबई महापालिका अनुदानित शाळा’ असा फलक लावणे आवश्यक आहे. मात्र, मुंबई महापालिकेकडून ज्या अनुदानित शाळांना अनुदान देण्यात येते, त्या शाळांच्या बाहेर पालिकेकडून अनुदान मिळत असल्याबाबतचे फलक लावले जात नाहीत, अशा तक्रारी होत असल्यामुळे अशा शाळांना अनुदानित शाळा असल्याबाबतचे फलक लावणे बंधनकारक करण्यात यावे. ज्या शाळा असा फलक लावणार नाहीत, त्या शाळांचे अनुदान बंद करण्यात यावे.” अशी मागणी माजी शिक्षण समिती अध्यक्ष शुभदा गुडेकर यांनी केली आहे.
“काही कॉन्व्हेंट शाळांना लोकप्रतिनिधी एखाद्या सामान्य विद्यार्थ्याच्या प्रवेशाबाबत पत्र देऊन विनंती करतात. मात्र, अशा शाळा त्यास जुमानत नाहीत. पालिका इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या काही शाळांना अनुदान देते, तर त्यांनी का म्हणून मुजोरपणा करायचा,” असा सवाल संध्या दोशी यांनी केला आहे. “अनुदानित शाळांनी त्यांच्या शाळेच्या बाहेर दर्शनीय ठिकाणी फलक न लावल्यास आणि त्यांना पालिकेच्या अटी-शर्ती मान्य नसल्यास, त्यांचे अनुदान रद्द करण्याचा निर्णय घेण्यात येईल,” असेही दोशी यांनी सांगितले.