जया अंगी सद्गुण, सज्जन तयांचे करती रक्षण

    02-Dec-2020
Total Views | 122

Vedas _1  H x W
 


यं रक्षन्ति प्रचेतसो वरुणो मित्रो अर्यमा ।
न कि: दभ्यते जन:॥ सामवेद-185)
 
 
अन्वयार्थ
हे इन्द्र, हे परमेश्वरा! (यम्) ज्या माणसाचे (प्रचेतस:) विवेकशील असे महाज्ञानी, (वरुण:) वरणीय श्रेष्ठ सुजन, (मित्र:) प्रेम व स्नेह करणारे मित्रगण आणि (अर्यमा) न्यायकारी लोक (रक्षन्ति) रक्षण करतात, (स:)तो (जन:) मनुष्य (कि:) कोणाकडूनही (न दभ्यते) दाबला व मारला जाऊ शकत नाही.
 
 
विवेचन
 
 
काळ हा कधी थांबत नाही. तो गतिमान आहे. चांगले-वाईट इथे घडणारच! बदलत्या परिस्थितीत समाजात वाढत जाणार्‍या अनिष्ट प्रवृत्तींमुळे सामान्य जन मात्र त्रस्त होताना दिसतात. अशा लोकांमध्ये नेहमी हा औदासिन्याचा सूर असतो की, या जगाचे काय खरे आहे? चांगल्या माणसांना कुठे न्याय व वाव आहे इथे? सज्जनांची आज-काल मोजदाद तर कोण करतो? सद्गुणी माणसांच्या अडचणीत कोण धावून येतो? चांगल्यांना कुठे किंमत आहे? भल्या माणसांचा कोणीही वाली नाही. वगैरे वगैरे...
 
 
पण, असे असले तरी या जगात चांगली माणसे अस्तित्वात आहेत. काळ कोणताही असो, उत्तम गुणांचे सत्पुरुष अल्पप्रमाणात का होईना, या जगात विद्यमान असतातच. त्यांच्या अस्तित्वामुळेच ईश्वरीय सद्गुण टिकून आहेत. अशा साधू वृत्तीच्या थोर महात्म्यांमुळेच भगवंताच्या या व्यवस्थेत कुठेतरी काहीतरी चांगले घडतेय. हे जाणण्यासाठीच माणसाकडे हवी असते, ती गुणग्राही व दोषत्यागी वृत्ती!
 
 
वरील प्रकारचा नकारात्मक दृष्टिकोन असतो, तो अविचारांनी ग्रासलेल्या, मनाने खचलेल्या व ईश्वरावरील विश्वास उडालेल्या नास्तिक मंडळींचा! प्रखर सत्यवादी आणि ईश्वरनिष्ठ अशा उत्साही आस्तिक माणसाला मात्र जगातील कोणत्याही भीतीची व वाईट प्रसंगाची चिंता नसते. जो सन्मार्गावरील पथिक असतो. तसेच शुभ कर्म करण्यात नेहमी मग्न असतो. यामुळेच तो आपल्या जीवनात सफल ठरतो. आपल्यामधील सद्गुणांमुळे तो सर्वांचा जवळचा होतो.
 
 
प्रिय बनतो. त्यामुळे जरी त्याच्यावर कोणती संकटे आली, तरी त्याचे रक्षण करण्याकरिता समाजातील चार प्रकारचे लोक सतत धावून येतात. त्याला दुःखांपासून दूर ठेवतात. सांसारिक अडीअडचणीत त्याच्या मदतीला धावून येतात. संकटापासून वाचविण्याकरिता ते सतत त्यांच्या मागे उभे असतात. त्यांच्या आश्रयाला आलेले भले सज्जन लोक कधीही कोणाकडूनही अडविले किंवा मारले जाऊ शकत नाहीत.
 
 
सदरील मंत्रात समाजातील प्रचेता, वरुण, मित्र आणि अर्यमा या चार प्रकारच्या लोकांचे माहात्म्य वर्णिले आहे. हे चार प्रकारचे लोक धार्मिक व सज्जन लोकांना नेहमीच वेगवेगळ्या प्रकारे मदत करतात. चांगल्या लोकांच्या पाठीशी ते खंबीरपणे उभी राहतात आणि त्यांच्या रक्षणासाठी नेहमी तत्पर असतात. त्यांच्या जवळ आलेल्या आश्रितांना कोणीही दाबू शकत नाही. त्यांना त्रास देऊ शकत नाही. हे आजवरचे त्रिकालाबाधित सत्य आहे.
 
 
वरील चार महान लोकांसंदर्भात थोडेसे जाणून घेऊया. यातील पहिला आहे- ’प्रचेता’ म्हणजेच उत्कृष्ट ज्ञानी सज्जन! ‘प्र’ म्हणजेच प्रवृद्ध किंवा प्रबुद्ध माणूस! जो प्रकर्षाने ज्ञानी व विवेकाने चेतनायुक्त असतो, जो शुद्ध विचार व आचरणाने जागृत असतो, अशांनादेखील ‘प्रचेता’ असे म्हणतात. समाजात वावरणारे ‘प्रचेता’ लोक हे खर्‍या अर्थाने आपल्या परिसरातील सज्जनांचे रक्षण करण्यासाठी तत्पर असतात. अज्ञान, अविद्या व अविचारांनी ग्रासलेल्या समाजाला जागे करण्यासाठी ‘प्रचेता’ लोकच प्रयत्नशील असतात. एखादा दीनदु:खी, गरीब भला माणूस असेल, तर त्याच्या बाजूने उभे राहणारे ‘प्रचेता’ लोक त्याला अभयदान देत असतात.
 
 
‘प्रचेता’ म्हणजेच महाज्ञानी असा चैतन्यशील सत्पुरुष! अशा ज्ञानवंत माणसांकडे लोकांचा नेहमीच ओढा असतो. जीवनातील नाना प्रकारच्या शंका, समस्या व अडीअडचणींवर मात करण्यासाठी हे ‘प्रचेता’ लोक सर्वसामान्यांना मार्गदर्शन करतात. त्यांचे जीवन ज्ञानाने व आचरणाने पवित्र झालेले असते. म्हणूनच अशांवर समाजातील सर्व घटकांचा विश्वासदेखील असतो. दुसर्‍या क्रमांकाचे लोक ‘वरुण’ असतात. उत्तम आचरण, सद्गुण आणि सद्विचार यांद्वारे जे वरणीय व प्रशंसनीय असतात, त्यांना ‘वरुण’ असे म्हणतात. तसेच गुणांच्या आधारे उत्तम व्यक्तींची निवड करणारे म्हणजेच त्यांना स्वीकारणारे सुजन हेसुद्धा ’वरुण’ मानले जातात.
 
 
समोरील व्यक्तीच्या बाह्य गोष्टींकडे न पाहता त्यांच्या अंतरंगातील सद्गुणांना ते मान्यता देतात. उत्तम गुणांचा स्वीकार करून त्या माणसाचे रक्षण करण्याकरिता तत्पर होतात. याउलट अनेक लोक असे असतात की, जे केवळ दुर्गुण व दोषांकडे पाहत इतरांकडे तिरस्काराच्या नजरेतूनच पाहतात. सर्‍या क्रमांकाचे ‘सुजन’ म्हणजेच मित्र होय. जे सर्वांशी स्नेहपूर्वक व्यवहार करून सर्वांवर प्रेमाचा वर्षाव करणारे असतात, ते मित्र होय. त्यांच्यातील स्नेहाची भावना ही सर्व प्रकारे तारणारी असते. हे मित्र आपल्या संपर्कात येणार्‍या सर्वच लोकांना वाईटापासून वाचवतात आणि शुभ कर्म करण्यासाठी त्यांना प्रेरित करतात.
 
 
 
मित्रत्वाच्या भावनेतून सुख-दुःखाच्या प्रसंगी ते सर्वांच्या मदतीला धावून जातात. दीन-दु:खितांवर प्रेमाचा वर्षाव करतात. या मित्रांमुळेच अनेक जण नानाविध दोषांपासून दूर होत आनंदाने जगताना आपण पाहतोच ! चौथ्या क्रमांकाचे सज्जन म्हणजे ‘अर्यमा’ होय. जे कोणत्याही प्रकारचा पक्षपात न करता, सर्वांना यथायोग्य न्याय देतात. प्रामाणिक व सत्यमार्गावर असलेल्या लोकांना अभय देतात. योग्य तो न्यायनिवाडा करतात. अशांना म्हणजेच उत्कृष्ट न्यायप्रदान करणारे सत्पुरुष असेही म्हटले जाते. समाजात ‘अर्यमा’ व्यक्ती असतील, तर गोरगरिबांना न्याय मिळतो; अन्यथा त्यांना अन्याय सहन करावा लागतो.
 
 
असे हे चार प्रकारचे लोक समाजात वास्तव्यास असतील, तर समाज व राष्ट्र सदैव प्रगतिपथावर सदैव आरुढ होतो. प्रचेता, वरुण, मित्र आणि अर्यमा हे ज्यांचे रक्षण करतात, अशा रक्षितांना कोणीही त्रास देऊ शकत नाही. कोणीही त्यांचे अहित करू शकत नाही. यासाठीच वेदमंत्राची साधी व सोपी रचना आहे-
 
यं रक्षन्ति प्रचेतसो, वरूणो, मित्रो, अर्यमा, स: जन: न कि: दभ्यते।
 
पण, हे चारही दिव्य सत्पुरुष मोठ्या प्रमाणात त्यांच्याच रक्षणासाठी तत्पर असतात, जे की त्यांच्यासारखेच गुण धारण करण्यांस समर्थ असतात. थोरांची मदत मिळवायची असेल किंवा त्यांच्या जवळचा व्हावयाचे असेल, तर उत्तम आचरण करावयास हवे. त्यासाठी चांगले गुण आपल्या अंगी रुजले पाहिजेत. स्वतः कसेही (अनिष्ट) वागायचे आणि अपेक्षा मात्र मदतीची करायची? हे कितपत योग्य आहे; अन्यथा या जगात वाईट कृत्ये करणार्‍या लोकांची संख्या भरपूर आहे. निकृष्ट कामे करायची आणि संकटे उडवून घेत त्यातून सुटण्याकरिता इतरांकडे मदतीची अपेक्षा करायची? हे संयुक्तिक नव्हे!
 
 
आपल्या वैभवशाली अशा प्राचीन इतिहासावर दृष्टिक्षेप टाकल्यास आपणास वरील सद्गुणांनी युक्त महापुरुषांची दर्शन घडते. मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामांनी पित्याच्या आज्ञेपोटी 14 वर्षांचा वनवास अगदी हसतमुखाने स्वीकारला आणि तो कर्तव्य म्हणून बजावलादेखील! घनघोर अशा वनवास काळात श्रीराम, सीता व लक्ष्मण यांना त्यांच्यातील सत्य, सदाचार, सहनशीलता, अहिंसा, करुणा, दया, प्रेम, परोपकार, मानवता, सच्चारित्र्य, नीतिमत्ता इत्यादी विविध आदर्श गुणांमुळेच त्यांना ठिकठिकाणी ऋषी, मुनी, साधू, राजे अशा अनेकांचे आशीर्वाद व साहाय्य प्राप्त झाले. वनराज गुह, जटायु, बिभीषण, हनुमान इत्यादी मित्र व साहाय्यक बनले. तसेच रावणपक्षातील त्याचाच भाऊ बिभीषण हा श्रीरामांचा प्रिय सखा बनतो.
 
 
तसेच महाभारतात 12 वर्षांच्या वनवासात पांडवांनादेखील त्यांच्या प्रतिकूल परिस्थितीत असंख्य सुजनांची मदत मिळाली, ती त्यांच्यातील सर्वोत्तमगुणांमुळेच! पितामह भीष्म, गुरु द्रोणाचार्य, कृपाचार्य, महात्मा विदूर हे सर्व केवळ देहाने कौरव पक्षात होते, पण मन व हृदयाने मात्र पांडवांकडेच! अशा या वेदोक्त चार सद्गुणांनी परिपूर्ण असलेल्या सत्पुरुषांना देव म्हणून संबोधले जाते आहे. कारण, हे सुजन दिव्यत्वाने भरलेले असतात. यांच्या संपर्कात येतो, तो निश्चितच प्रभावित होतो. यांचा आश्रय हा सर्वांकरिता अमृताची सावली ठरतो. पण, यासाठी सर्वसामान्यांनादेखील आपल्यामध्ये चांगले गुण धारण करावयास हवे.
 
 
दुर्व्यवहारी, दुराचारी व वाईट वृत्तीचे लोक वरील चारही देव पुरुषांचे मित्र बनू शकत नाहीत. म्हणूनच ज्यांना सुरक्षित राहावेसे वाटते अथवा आपली जीवनयात्रा उत्तम प्रकारे कोणाच्याही त्रासाविना संपन्न करावीशी वाटते, त्यांनी समाजात विद्यमान असलेल्या प्रचेता, वरुण, मित्र व अर्यमा या चार सुजनांच्या आश्रयास यावयास हवे. त्यामुळे निश्चितच त्यांच्या शरीर, मन व बुद्धीने पूर्णांशाने संरक्षण होईल आणि जीवनदेखील यशस्वी होईल. म्हणूनच एका संत कवीने म्हटलेल्या खालील ओळी सार्थ ठरतात-
 
 
 
जाको राखे साईयां, मार सके ना कोई। बाल न बांका कर सके, जो जग बैरी होई॥
- डॉ. नयनकुमार आचार्य
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121