कायदापालक जीवरक्षक संग्रामसिंह

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Nov-2020   
Total Views |

Sangram Singh _1 &nb



नागरिकांच्या जीविताचे रक्षण करणारे, स्पष्ट विचार असणारे नाशिकचे पोलीस उपायुक्त संग्रामसिंह निशाणदार यांच्याविषयी...


पोलीस हा जनतेचा मित्र असून पोलीस व जनता यांच्यातील संबंध हे शांतता निर्माण करणे कामी महत्त्वाची भूमिका बजावत असतात, असे वाक्य आपण अनेकदा ऐकले असेल. सामाजिक स्वास्थ्यासाठी वरील वाक्यातील पोलीस व जनता यांच्या संबंधांच्या अनुषंगाने असणारा भाग हा कदाचित सत्यही असेल. मात्र, पोलीस हा ‘जनतेचा मित्र’ असण्यापेक्षा तो ‘कायद्याचा रक्षक’ आहे, अशी स्पष्ट भूमिका नाशिकचे नवनियुक्त पोलीस उपायुक्त (गुन्हे) संग्रामसिंह निशाणदार मांडतात. आडनावाप्रमाणे थेट ‘निशाणा’ धरून भेदक आणि स्पष्ट विचार मांडणारे पोलीस अधिकारी, असे त्यांचे वर्णन केले तर वावगे ठरणार नाही.
निशाणदार हे २00३ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन राज्याच्या पोलीस दलात अधिकारी म्हणून रुजू झाले. विद्यापीठात अव्वल आलेले निशाणदार यांनी ‘इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग’पर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेले आहे. तसेच, त्यांनी



अमेरिकेत एम. एस. करत इंजिनिअरिंगचे पदव्युत्तर शिक्षणदेखील पूर्ण केले आहे. मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेले निशाणदार यांचे वडीलदेखील पोलीस अधिकारी होते, तर आई संगीतशिक्षिका आहेत. मूळचे सोलापूरचे असलेले निशाणदार यांचे शालेय शिक्षण हे नाशिकमधील सेंट झेव्हिअर्स या शाळेत पूर्ण झाले. उत्तम करिअर आणि परदेशात नोकरीची संधी असतानादेखील राज्य लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून भारतीय नागरिकांची सेवा करण्याचा पर्याय त्यांनी निवडला. कारण, पोलीस सेवेच्या माध्यमातून दुखितांचे अश्रू पुसण्याचे कार्य होऊ शकते. तसेच, कोणत्याही व्यक्तीला तत्क्षणी समस्यामुक्त करण्याची संधी या सेवेत आहे, असे मत निशाणदार यांचे आहे.
 
 
 
व्यक्ती ठरवून सेवेत आली तर काय किमया साधू शकते, याचे उत्तम उदाहरण म्हणून निशाणदार यांच्याकडे पाहिले जाते. आपल्या परीविक्षाधिन काळात त्यांची गोंदिया येथे नियुक्ती करण्यात आलेली होती. त्यावेळी नदीला आलेल्या पुरात काही महिला या वाहून जात होत्या. आपल्या जीवाची परवा न करता, निशाणदार यांनी त्या ओसंडून वाहणार्‍या नदी पात्रात उडी घेत, त्या महिलांच्या जीविताचे रक्षण केले. याबद्दल त्यांना पंतप्रधान जीवन रक्षा पदकानेदेखील सन्मानित करण्यात आले आहे. पोलीस उपाधीक्षक या पदावर असणारे हे पदक प्राप्त करणारे राज्यातील ते पहिले पोलीस अधिकारी आहेत. त्यामुळेच कायद्याच्या पालनासंदर्भात पोलिसांची असणारी स्पष्ट भूमिका आणि त्याच वेळी नागरिकांच्या जीविताचे रक्षण करणारे सरकारी अधिकारी असे निशाणदार यांच्या व्यक्तिमत्त्वाचे दोन आयाम दिसून येतात.
 
 
 
आजवर त्यांनी तासगाव, भंडारा, वसई, पुणे, देवरी आदी ठिकाणी आपले कर्तव्य बजावत आपल्या कार्याची अवीट छाप सोडली आहे. पुणे येथे माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत असणार्‍या नैना पुजारी या महिलेच्या खून खटल्याचा तपासदेखील निशाणदार यांनीच लावला आहे. कोणताही धागादोरा हाताशी नसताना, गुन्हे अन्वेषणामध्ये असणारी उपजत आवड आणि काम करण्याची चिकाटी या बळावर त्यांनी या प्रकरणाचा छडा लावला होता. या प्रकरणाच्या माध्यमातून आयटी क्षेत्रात कार्यरत असणार्‍या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न हा ऐरणीवर आला होता. केवळ तपास केला, आरोपी गजाआड केले म्हणजेच आपली भूमिका संपत नाही, तर पोलीस म्हणून असे प्रकार पुन्हा घडू नये यासाठीदेखील काम होणे आवश्यक आहे. हे निशाणदार यांनी जाणले. आपल्या अनुभवाच्या बळावर त्यांनी ‘वुमन्स सेफ्टी इन आयटी एम्पलॉई’ हे महिला सुरक्षेचे मॉडेल विकसित केले. या माध्यमातून या क्षेत्रातील महिलांनी आपली सुरक्षा कशी करावी, याबाबत सविस्तर सादरीकरण त्यांनी केले. त्यांचे हे मॉडेल आजही इन्फोसिस, एल अ‍ॅण्ड टी, इन्फोटेक, विप्रो आदी कंपन्यांमध्ये अंमलात आणले जात आहे.
 
 
 
 
नाशिकमध्ये बालपण व्यतित केल्याने नाशिकची उत्तम माहिती निशाणदार यांना असून येथे सोनसाखळी चोरीच्या घटना हे एक आव्हान असल्याचे ते सांगतात. तसेच, राज्यातील सर्वात शांत शहर नाशिक असल्याचे ते आपल्या अनुभवाच्या बळावर सांगतात. त्यामुळे नाशिकमधील शांतता ही कायमस्वरूपी अबाधित राखण्याचे देखील एक मोठे आव्हान असल्याचे ते नमूद करतात. त्यामुळे आगामी काळात जी आव्हाने समोर येतील, त्यांचे स्वरूप लक्षात घेऊन कार्याची दिशा आखण्याचा मनोदय ते व्यक्त करतात. ज्या व्यक्तीच्या कामाच्या आसपास आपण पोहोचू शकतो किंवा तशी इच्छा प्रकट करतो, ती प्रत्येक व्यक्ती ही जीवनात आदर्श असते. अशी जीवनातील आदर्शाची व्याख्या करताना ते नागरिकांना विशेषत: तरुणाईला समाजमाध्यमांवर जास्त वेळ न दवडण्याचा संदेश देतात. समाजमाध्यमांऐवजी थेट नागरी संवादास चालना दिल्यास सामाजिक मूल्य वृद्धिंगत होण्यास चालना मिळेल. तसेच त्यामुळे सामाजिक संवाददेखील वाढीस लागेल, अशी आशा ते व्यक्त करतात.
 
 
 
विचारातील स्पष्टता आणि कार्य करण्याची मनस्वी इच्छा असली की अशक्यही शक्य होत असतेच. निशाणदार यांच्या ठायी या दोन्ही बाबी अगदी सहज दिसून येतात. त्यामुळे आगमी काळात त्यांचे आजवरचे धडाडीचे कार्य नाशिकमध्ये नक्कीच पाहावयास मिळेल. त्यांना आगामी कार्यासाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या शुभेच्छा!


@@AUTHORINFO_V1@@