डिवचण्याची चूक करू नका!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Oct-2020
Total Views |


agralekh _1  H



कथित धर्मनिरपेक्षतेचा गांजा मारला आणि उदारमतवादाचा हुक्का लावला की, बॉलीवूडवाल्यांना हिंदू धर्माबद्दल असभ्य शब्द वापरायला चांगलाच चेव चढतो. आधी ‘तनिष्क’ने ‘लव्ह जिहाद’ आणि नंतर ‘इरॉस नाऊ’ने नवरात्रोत्सवात अश्लील शब्द वापरत तेच केले. पण, हिंदूंचे सण-उत्सव तुमचे अभिव्यक्तिस्वातंत्र्य दाखविण्यासाठीचा ‘इव्हेंट’ नाही, हे त्यांनी लक्षात ठेवावे.



अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली हिंदू धर्माचा अपमान करण्याचे, खिल्ली उडविण्याचे काम हिंदी चित्रपटसृष्टीने सातत्याने केले. कथित धर्मनिरपेक्षतेचा गांजा मारला आणि उदारमतवादाचा हुक्का लावला की, बॉलीवूडवाल्यांना हिंदू धर्माबद्दल असभ्य शब्द वापरायला चांगलाच चेव चढतो. सध्या हिंदू धर्मीयांचा पवित्र नवरात्रोत्सव सुरू असून, कोरोना व ‘लॉकडाऊन’च्या काळात सर्वच जण नियम पाळून तो साजरा करत आहेत. इतरांसारखे शांतिदूतांचे नाव लावून प्रत्यक्षात मात्र, सणासुदीत धिंगाणा घालण्याचे काम हिंदू धर्मीयांनी कोरोना व ‘लॉकडाऊन’दरम्यान कधीही केले नाही. कदाचित, हिंदूंच्या याच अतिसहिष्णू, अतिउदारवादी स्वभावामुळे ‘एरॉस नाऊ’ किंवा ‘तनिष्क’सारख्यांचे फावते आणि ते हिंदूंनाच लक्ष्य करतात. ‘ इरॉस नाऊ’ या चित्रपटनिर्मिती क्षेत्रातील कंपनीने नवरात्राच्या पहिल्या दिवसापासूनच आपल्या चित्रपटांतील फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावरून प्रसारित केले. नवरात्रामध्ये प्रत्येक रंगाचे वेगळे महत्त्व असल्याचे सांगण्यासाठी चित्रपटातील अभिनेते आणि अभिनेत्रींच्या फोटोंचा ‘ इरॉस नाऊ’ने वापर केला.
मात्र, त्यावर लिहिलेला मजकूर अश्लील, अश्लाघ्य आणि अभद्रच होता. जसे की, कतरिना कैफच्या फोटोवर, ‘डीड यू वॉण्ट टू पूट द ‘रात्री’ इन माय नवरात्री?’; सलमान खानच्या फोटोवर, ‘यू नीड अ ‘दांडी’ टू प्ले दांडिया-आय हॅव वन’ आणि रणवीर सिंहच्या फोटोवर, ‘लेट्स हॅव सम मजामा, इन माय पजामा’, अशी असभ्य वाक्ये लिहिलेली होती. इथे ‘इरॉस नाऊ’ला नेमके काय सांगायचे आहे? तर हिंदूंचा नवरात्र उत्सव देवीची पूजा-अर्चा करणारा नसून, लैंगिक स्वैराचाराचा असल्याचे आणि फक्त मौजमजा-मस्तीसाठी तो साजरा केला जातो, असेच ‘इरॉस नाऊ’ला यातून ठसवायचे होते. पण, ‘इरॉस नाऊ’ला हिंदू सणांना कितीही हीन दाखवायचे असले तरी, ते साध्य होणारे नव्हते. कारण, ‘इरॉस नाऊ’ने आपल्या मना-मेंदूतील विकृतीचे प्रदर्शन केल्यानंतर त्याविरोधात सोशल मीडियातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. हिंदू धर्मीयांनी ‘इरॉस नाऊ’वर बहिष्काराची मोहीम चालवली, हजारोंनी ट्विट्स ‘इरॉस नाऊ’विरोधात प्रसारित झाले. सोशल मीडियावर ‘#बॉयकॉटइरॉसनाऊ’ आणि ‘#शेमऑनइरॉसनाऊ’ हे दोन हॅशटॅग ट्रेंड करू लागले. त्याला राजकीय नेत्यांनी आणि कंगना राणावतसारख्या अभिनेत्रीनेही साथ दिली. परिणामी, ‘इरॉस नाऊ’वर माफी मागण्याची वेळ आली.
दरम्यान, ‘इरॉस नाऊ’ने जरी माफी मागितली असली, तरी त्यांचे कृत्य माफ करण्यासारखे नक्कीच नाही. कारण, कोणीही यावे आणि टपली मारून जावे, हिंदू धर्मावर खालच्या भाषेत विनोद करावे, चेष्टा करावी, हा बॉलीवूड, ‘इरॉस नाऊ’ किंवा ‘तनिष्क’ वगैरेंसाठी नित्याचा प्रकार झाला आहे. ‘तनिष्क’ने ऐन नवरात्राच्या काळातच हिंदू विवाहितेच्या डोहाळ जेवणाचा कार्यक्रम मुस्लीम कुटुंबात दाखवला. पण, त्याच्या आधीच कित्येक प्रकरणात धर्मांध मुस्लिमांनी मैत्री वा प्रेमसंबंधांमुळे हिंदू मुलांच्या हत्या केलेल्या होत्या, तर हिंदू मुलींशी निकाह करून नंतर त्यांचाही खून केलेला होता. तरीही ‘तनिष्क’ला वास्तवाशी कसलाही संबंध नसणारी जाहिरात तयार करण्याची बुद्धी झाली. परिणामी, ‘लव्ह-जिहाद’चा पुरस्कार करणार्‍या त्या जाहिरातीचा आणि ‘तनिष्क’ ब्रॅण्डचाही जोरदार विरोध झाला. नंतर ‘तनिष्क’नेही माफी मागितली. पण, त्यातही प्रामाणिकपणापेक्षा हिंदूंनाच बोल लावणारे शब्द जास्त होते. ते पाहता चित्रपट क्षेत्र किंवा ब्रॅण्ड्सने आधी चूक करायची, नंतर माफी मागायची आणि हिंदूंनी तुमचे उद्योग विसरायचे का? तर तसे अजिबात होणार नाही. कारण, हिंदू धर्मावर खालच्या शब्दांत भाष्य करण्याची बॉलीवूडची जुनीच खोड आहे.
देशात ८० टक्के हिंदू लोकसंख्या असताना बॉलीवूड किंवा ‘इरॉस नाऊ’सारखी कंपनी त्यांच्याच भावनांशी खेळ कसा करू शकते? हा प्रश्न म्हणूनच उपस्थित होतो आणि त्याचे उत्तर हिंदूंची माफ करण्याची वृत्ती हेच मिळते. त्यामुळे ‘इरॉस नाऊ’ने जरी माफी मागितलेली असली, तरी ‘इरॉस नाऊ’ व ज्यांनी नवरात्रकाळात असले कृत्य केले, त्या सर्वांवर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे, तरच ते सुधारतील. दरम्यान, आतापर्यंत गेल्या कित्येक वर्षांत चित्रपट क्षेत्रच नव्हे, तर जाहिरात, गीते-संवाद, वेब सीरिज, रिअ‍ॅलिटी शो व दूरचित्रवाणी मालिकांतूनही हिंदू धर्मावर आघात होतच राहिले. म्हणजे एखाद्या कलाकाराला स्टॅण्डअप कॉमेडी करायची असेल, त्यानेही चला, हिंदू देवी-देवतांची खिल्ली उडवूया; कोणाला मॉडर्न दिसायचे आहे तर त्यानेही, चला हिंदू सण, परंपरा, व्रत, उत्सव, वेशभूषेवर विनोद करूया, असला प्रकार केला. मात्र, अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली दोन पैसे कमाविण्यासाठी हिंदू धर्माला शिव्या घालणार्‍या या लोकांविरोधात कोणी आवाज उठवला, तर लगेच असहिष्णुता, असहिष्णुता म्हणून बोंबलणारे टोळके सक्रिय झालेच म्हणून समजा. हिंदूंनी विरोध केला की, कधीकाळी कोणाकडून झोळीत पडलेले पुरस्कार परत केलेच म्हणून समजा.
म्हणजे तुमच्या सण, उत्सव, श्रद्धास्थाने, प्रतीकांची कोणी कितीही खिल्ली उडवो, तुम्ही शांत बसा, तुम्ही शब्दही काढू नका, अशी या लोकांची उफराटी अपेक्षा. पण, जे कोणी तसे कृत्य करते त्यांना नवीन काही सर्जन करा, असे सांगण्याची यांची हिंमत नाही. कारण, हिंदू धर्मावर टीका करणार्‍यांचा किंवा त्यांना पाठिंबा देणार्‍यांचाही वकूब तितकाच मर्यादित. नावीन्याची वानवा असल्याने दोघेही एकमेकांनाच साथ देणार. पण, हिंदू ते सहन करणार नाही. हिंदूंवर टीका केली, अपमान केला की, त्याला चोख प्रत्युत्तर मिळणारच. नंतर कोणी कितीही आरडाओरडा केला तरी चालेल. पण, हिंदूंचे सण-उत्सव, परंपरा, तुमचे अभिव्यक्तिस्वातंत्र्य दाखविण्यासाठीचा ‘इव्हेंट’ नाही. हिंदू शांत आहे, सहिष्णू आहे, तो तुमच्या गैरकृत्यांचा सनदशीर मार्गाने विरोध करत आहे. फ्रान्समध्ये मोहम्मद पैगंबराचे व्यंगचित्र दाखविल्याने शिक्षकाचा शिरच्छेद करण्यापर्यंत धर्मांध मुस्लिमाची मजल गेली. तो प्रकार भारतात हिंदूंनी केलेला नाही, म्हणूनच हिंदूंचे हेच कायदेशीर मार्गाने विरोध करण्याचे वैशिष्ट्य आणि सामर्थ्य अबाधित ठेवायचे असेल, तर इतरांनीही डिवचण्यापेक्षा सहकार्याची भावना ठेवायला हवी.
@@AUTHORINFO_V1@@