इस्लामी कट्टरतेचा हिडीस चेहरा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Oct-2020
Total Views |

agralekh_1  H x


मोहम्मद पैगंबराचे व्यंगचित्र दाखवल्याने फ्रान्समधील शिक्षकाचे धर्मांध मुस्लीम विद्यार्थ्यानेच मुंडके छाटले. पण, हा केवळ वैयक्तिक हल्ला नसून इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याच शब्दात ‘इस्लामी दहशतवादी हल्ला’ असल्याचे स्पष्ट होते. मात्र, इस्लामी कट्टरतावादावर नेमका रामबाण इलाज काय याचा विचार व कृती करण्याची वेळ या हत्येने जगासमोर येऊन ठेपली आहे.


फ्रान्समध्ये शुक्रवारी सॅम्युअल पॅटीनामक इतिहासाच्या शिक्षकाचे १८ वर्षीय विद्यार्थ्याने धारदार चाकूने मुंडके उडवले आणि जगातील प्रत्येक संवेदनशील व्यक्तीच्या हृदयाचा थरकाप उडाला. सॅम्युअल पॅटीच्या हत्येचे कारण वर्गामध्ये मोहम्मद पैगंबराचे व्यंगचित्र दाखवणे, धर्माचा अपमान करणे आणि ‘इस्लाम खतरे में’ची भावना असल्याचेही स्पष्ट झाले. तत्पूर्वी, ऑक्टोबरच्या सुरुवातीपासूनच मारल्या गेलेल्या शिक्षकाला जीवानिशी ठार करण्याच्या धमक्या देण्यात येत होत्या. मृत शिक्षकाने वर्गामध्ये अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा पाठ शिकवण्यासाठी ‘शार्ली हेब्दो’ नियतकालिकाने प्रकाशित केलेले मोहम्मद पैगंबराचे व्यंगचित्र दाखवले होते. मात्र, त्याआधी शिक्षकाने भावना दुखावण्याची शक्यता असल्याने मुस्लीम विद्यार्थ्यांनी वर्गाबाहेर जावे, असे आवाहनही केले. पण, ते त्यांनी पाळले नाही आणि मोहम्मद पैगंबराचे व्यंगचित्र दाखवल्यानंतर एका मुलीच्या भावना दुखावल्या. नाराज विद्यार्थिनीने वर्गात काय झाले, ते आपल्या वडिलांना सांगितले व धर्माचा अवमान झाल्याने मुलीचा बापही संतापला. त्याने शिक्षकाविरोधात तक्रार दाखल केली, तसेच शिक्षकाला शाळेतून बडतर्फ करण्याची मागणी केली, तर शिक्षकानेदेखील मुलीच्या बापाविरोधात मानहानीची तक्रार नोंदवली. मात्र, शिक्षकाच्या या पवित्र्याने मुलीचा बाप आणखीच चवताळला व त्याने सॅम्युअल पॅटीविरोधात सोशल मीडियावर ऑनलाईन मोहीम उघडली. सॅम्युअल पॅटीने मोहम्मद पैगंबराचा अपमान-अवमान केल्याचे लिहिलेल्या पोस्टस सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्या आणि त्यानंतर १६ऑक्टोबरला शिक्षकाचा शिरच्छेद केला गेला. नंतर पोलिसांनी सॅम्युअल पॅटीची हत्या करणार्‍या व आत्मसमर्पणाला तयार नसलेल्या, शरीरावर आत्मघाती स्फोटके लावलेल्या विद्यार्थ्याचाही खात्मा केला. परंतु, धर्मांध दहशतवाद्याला मारले तरी त्याने मागे सोडलेले प्रश्न जसेच्या तसेच आहेत आणि ते कधी संपतील, हा आणखी एक प्रश्न आहे.


मागील काही वर्षांत जगातील बहुतेक सर्वच देशांना इस्लामी कट्टरतावादाने आपल्या क्रौर्याने आणि हिंसाचाराने हादरवले. अगदी अमेरिकेसारख्या महाशक्तीशाली देशातही धर्मांध दहशतवाद्यांनी हल्ला केला आणि शेकडोंचा बळी घेतला. आपल्या धर्माच्या नावाखाली जीवंत माणसे मारणे, हा तर कट्टर इस्लामी दहशतवाद्यांचा आवडता खेळ झाला. अल-कायदा, लष्कर-ए-तोयबा, तालिबान, इसिस वगैरेसारख्या दहशतवादी संघटनांच्या माध्यमातून जिहाद्यांचे काम आतापर्यंत चालत होते. मात्र, युरोपातील फ्रान्ससह अन्य देशांत झालेल्या हल्ल्यांतून आता दहशतवाद्यांना कोणत्याही संघटनेची गरज नसल्याचे व ते वैयक्तिकक्षरीत्या दहशत माजवण्यासाठी सज्ज असल्याचे दिसते. फ्रान्समधील सॅम्युअल पॅटी यांचा जीव घेणार्‍या विद्यार्थ्यालाही दहशतच निर्माण करायची होती. ‘कोणी आमच्या धर्माविरोधात शब्दही उच्चारला, कुंचलाही चालवला तरी आम्ही त्याला मारुन टाकू,’ हेच तर त्याला सांगायचे होते. इस्लामी कट्टरतावादाचा हाच खराखुरा चेहरा आहे आणि त्यानेच आज अवघे जग ग्रासलेले आहे. पण फ्रान्समधली ही काही पहिलीच घटना नाही, तर २०१५साली ‘शार्ली हेब्दो’ने मोहम्मद पैगंबराचे व्यंगचित्र प्रकाशित केले, तेव्हाही असेच झाले होते. आम्हाला सर्वप्रकारचे अभिव्यक्तिस्वातंत्र्य हवे आहे, पण तुम्ही आमच्या मोहम्मद पैगंबराचे व्यंगचित्र काढले तर ते चालणार नाही, असे म्हणत ‘शार्ली हेब्दो’च्या कार्यालयावर कट्टर इस्लामी दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. त्यावेळी झालेल्या बॉम्बस्फोटात सुमारे १३०लोकांचा मृत्यू झाला होता आणि तेव्हापासून झालेल्या अशाप्रकारच्या हल्ल्यांत एकूण २५० लोकांचा बळी गेला. हे फक्त फ्रान्समध्ये झाले नाही, तर आजूबाजूच्या अन्य युरोपीय देशांतही जिहाद्यांनी कित्येकांना ठार मारले होते व त्या हल्लेखोरांत शरणार्थ्यांचा मोठा समावेश आहे.


इराक, सीरिया आदी इस्लामी देशातील अंतर्गत युद्धामुळे तिथल्या नागरिकांनी जवळच्या कोणत्याही मुस्लीम देशात न जाता फ्रान्स, जर्मनी, ब्रिटन, इटलीसारख्या युरोपीय देशात आश्रय घेतला. उदारमतवाद आणि मानवाधिकार-मानवतावादाची झिंग चढलेल्या युरोपीय देशांनी इस्लामी शरणार्थ्यांसाठी देशाच्या सीमा खुल्या केल्या. मात्र, आपण ज्यांना आज निवारा देतोय, तेच उद्या उलटतील, आपल्या इतिहास, संस्कृती, वारसा, धर्मावर वार करतील, याची त्यांना पुसटशी कल्पनाही नव्हती. तिथल्या राष्ट्रप्रमुखांना तर जगभरात स्वतःचे पुढारपण, नेतृत्व मिरवायचे होते, पण त्यामुळे भविष्य बदलत नसते, बदलणार नव्हते आणि बदलले नाही. ज्या मुस्लीम शरणार्थ्यांना आसरा दिला, त्यांनी फ्रान्ससह अन्य देशांतील मूळच्या नागरिकांना शरिया किंवा कुराणनुसार वर्तन न करण्यावरुन त्रास द्यायला सुरुवात केली. ख्रिश्चन धर्मीयांच्या सण-उत्सवांवर हल्ले केले, मुली-महिलांवर अत्याचार केले, कोणाला ट्रकखाली चिरडले, तर कोणाला बंदुकीच्या गोळ्या घातल्या. हे सर्व कशासाठी, तर त्याच त्या कथित ‘सच्चा इस्लाम’साठी! मात्र, इस्लामी कट्टरतावाद्यांचा हिंस्रपणा पाहून युरोपीय देशांतून त्याला विरोध करणारे नेतृत्व, संघटना, पक्षही उदयास आले.

फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनीसुद्धा धर्मांध इस्लामींविरोधात कठोर भूमिका घेतली. सॅम्युअल पॅटी यांच्या खुनाच्या घटनेला त्यांनी ‘इस्लामी दहशतवादी हल्ला’ म्हटले. इस्लामी कट्टरतावादाच्या समूळ उच्चाटनासाठी आपण काम करणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. मात्र, त्यांनी या घटनेआधीही इस्लामी कट्टरतेविरोधात निर्णय घेतले होतेच, नाही असे नाही. पण, त्या उपायांचा कितपत परिणाम झाला, हा संशोधनाचा विषय ठरावा, कारण तसे झाले असते तर शिक्षकावर हल्ला करण्याची हिंमतच झाली नसती. म्हणजेच इस्लामी धर्मांधता फ्रान्सच्या गल्लोगल्ली पसरल्याचे आणि त्यावर रामबाण इलाजाची आवश्यकता असल्याचे स्पष्ट होते. मात्र, या सगळ्यात भारतासह जगभरातल्या पुरोगामी, डाव्या गोटात भयाण शांतता आहे. त्यापैकी कोणीही इस्लामी दहशतवादाचा उल्लेख करताना दिसत नाही. सर्वांच्याच तोंडाला कुलुप लागले आहे आणि जरी तोंड उघडले तरी त्यातून हल्लेखोराच्याच मासुमियतचे कौतुक बाहेर पडेल. त्यामुळे त्यांच्याकडे पाहण्यापेक्षा जगाने स्वतःच या प्रश्नाचे उत्तर शोधले पाहिजे, कृती केली पाहिजे.

@@AUTHORINFO_V1@@