डाव्यांची तळी उचलणारी शिवसेना!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Jan-2020
Total Views |

ag_1  H x W: 0



कोणे एकेकाळी मुंबईत डाव्या पक्ष-संघटनांचा मोठाच दबदबा होता. त्याच काळात शिवसेनेची स्थापना झाली व तिने डाव्यांशी दोन हात केले. नंतर मुंबईतल्या कम्युनिस्टांना संपवण्याच्या बढायाही शिवसेनेने अनेकवेळा मारल्या. परंतु, उद्धव ठाकरेंनी शिवसेनेने आतापर्यंत केलेल्या कामगिरीवर पाणी फिरवले नि ‘टुकडे टुकडे गँग’वाल्या डाव्यांचीच तळी उचलण्याचा उद्योग केला.



हिंदूंच्या पाठीत खंजीर खुपसून हिंदूद्रोही काँग्रेस
-राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर सत्तेची हौस भागवणार्‍या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी अफलातून विधान केले. जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील मारहाण ही मुंबईवरील २६/११च्या दहशतवादी हल्ल्याच्या तोडीसतोड असल्याचे ठाकरे म्हणाले. नंतर शिवसेनेचे ‘राहुल गांधी’ आणि नाजूक प्रकृतीच्या उद्धवरावांना खंबीर साथ देण्यासाठी कॅबिनेट मंत्री झालेले ‘बलदंड’ आदित्य ठाकरेही त्याच भाषेत बोलू लागले. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे या पिता-पुत्रांच्या जोडीने अशी रोखठोक भूमिका घेतल्याबद्दल खरेतर त्यांचे अभिनंदनच केले पाहिजे! कारण, जेएनयुतील हिंसाचारानंतर तो कोणी केला, याबद्दल रविवारच्या मध्यरात्रीपासूनच सत्य व तथ्याधारित माहिती उजेडात येत गेली. विविध व्हॉट्सअ‍ॅप समूहांतील संभाषणे, व्हायरल होणार्‍या ध्वनिचित्रफिती आणि पोलिसांनी केलेल्या अटकेनंतर जेएनयुतील रक्तपाताचे षड्यंत्र डाव्या संघटनांनीच रचल्याचे स्पष्ट झाले. मात्र, उद्धव ठाकरे यांच्याकडे ‘संजया’ची दिव्यदृष्टी असल्याने त्यांना या सच्चाईचे ज्ञान फार लवकर झाले. त्या ज्ञानातूनच उद्धवरावांनी सत्रांत परीक्षोत्सुकांना आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांना पीडित ठरवण्यासाठी डाव्या मुखवटाधारींना मुंबईवर हल्ला करणार्‍या कसाब टोळीतील पाकिस्तानी दहशतवादी घोषित करून टाकले.


इथे लक्षात घेण्यासारखा मुद्दा म्हणजे
, उद्धव ठाकरेंच्या विधानांबरहुकूम जेएनयुतील हाणामारीची तुलना २६/११च्या दहशतवादी हल्ल्याशी केल्यास जेएनयुतील हल्लेखोर ‘दहशतवादी’ व पीडित विद्यार्थी सर्वसामान्य भारतीय जनता असल्याचे स्पष्ट होते. इतकेच नव्हे तर कोणताही दहशतवादी हल्ला हा भारताविरोधात पुकारलेले युद्धच असते, म्हणूनच ठाकरेंच्या वक्तव्यानुसार जेएनयुत हिंसाचार करून डाव्या विद्यार्थी संघटनांनी देशाविरोधात युद्ध छेडल्याचे म्हणता येते. उल्लेखनीय म्हणजे, ज्या पक्षाच्या काळात २६/११चा दहशतवादी हल्ला झाला, त्या काँग्रेसच्या अशोक चव्हाणांनीही उद्धव ठाकरेंचीच री ओढली. मात्र, जेएनयुतील डाव्यांबरोबर काँग्रेसी कार्यकर्त्यांनी मारामारीत सक्रिय सहभाग घेतला होता व चव्हाणांच्या बोलण्यावरून डाव्या कार्यकर्त्यांबरोबर काँग्रेसी कार्यकर्तेही कसाबचेच साथीदार ठरतात. म्हणूनच यापुढे कोणी अशा देशविरोधी, देशविघातक पक्षावर बंदीची मागणी केली तर ते वावगे ठरणार नाही. परंतु, ‘मॅडम’चे काय? उद्धव ठाकरेंनी वापरलेल्या शब्दांचा असा अर्थ काढल्यास सोनिया गांधींची खप्पामर्जी झाल्याशिवाय राहणार नाही आणि तेव्हा सत्ता राखण्यासाठी उद्धव ठाकरे व शिवसेनेने मारलेल्या कोलांटउड्या पाहताना जनतेला हसू आवरणार नाही!


अर्थात हा झाला एक भाग
, मात्र उद्धव ठाकरेंनी केलेले विधान वरीलप्रमाणे बिलकुल नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या रिमोटवर चालणार्‍या-बोलणार्‍या ठाकरेंनी जेएनयु व २६/११ची तुलना अगदी निराळ्या संदर्भाने केलेली आहे. सूडाच्या भावनेने पेटलेल्या शिवसेनेकडे सध्या केवळ भाजपविरोधाचा, भाजपद्वेषाचा मुद्दा उरलेला आहे. परिणामी, दख्खन जिंकायला आलेल्या औरंगजेबाला ज्याप्रमाणे सर्वत्र संताजी-धनाजी दिसत असत, त्याप्रमाणे उद्धव ठाकरेंनाही आता जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी मोदी आणि शाहच दिसतात. म्हणूनच पंतप्रधान व गृहमंत्र्यांवर निशाणा साधण्यासाठी ठाकरेंनी जेएनयुतील मारझोडकांडाला ‘२६/११चा दहशतवादी हल्ला’ म्हटले. काँग्रेसच्या टेकूवर तगलेले सत्तासिंहासन डळमळीत होऊ नये, यासाठी उद्धव ठाकरेंनी सोनिया गांधींना खुश करण्यासाठी अशी तुलना केली. लाचारांची अवस्था अशीच असते म्हणा, कारण मालकाने जरा डोळे वटारले, तर रोजच्या तुकड्यालाही मोताद व्हावे, अशी शिवसेनेची सध्याची परिस्थिती. त्यामुळे जेवढा लाळघोटेपणा करता येईल, तेवढा ती ‘करून दाखवते’, हा त्यातलाच एक प्रकार. मात्र, कोणे एकेकाळी मुंबईत डाव्या पक्ष-संघटनांचा मोठाच दबदबा होता. त्याच काळात शिवसेनेची स्थापना झाली व तिने डाव्यांशी दोन हात केले. नंतर मुंबईतल्या कम्युनिस्टांना संपवण्याच्या बढायाही शिवसेनेने अनेकवेळा मारल्या. परंतु, उद्धव ठाकरेंनी शिवसेनेने आतापर्यंत केलेल्या कामगिरीवर पाणी फिरवले नि ‘टुकडे टुकडे गँग’वाल्या डाव्यांचीच तळी उचलण्याचा उद्योग केला.


तसे करताना मोदी
-शाह व भाजपविरोधाने मुक्या-आंधळ्या-बहिर्‍या झालेल्या ठाकरेंना जेएनयुतील डाव्या विद्यार्थी संघटनांची देशविघातक कृत्ये दिसली नाहीत. स्वामी विवेकानंदांचा पुतळा तोडून, ‘अफझल हम शर्मिंदा है, तेरे कातिल जिंदा है’, ‘हम छिन के लेंगे आजादी’, ‘भारत तेरे टुकडे होंगे, इन्शाअल्लाह इन्शाअल्लाह’, ‘हिंदुत्व की कब्र खोदेंगे’, अशा घोषणा ज्या संघटनांच्या म्होरक्यांनी दिल्या, त्या डाव्या विचारांसाठी उद्धव ठाकरेंना प्रेमाचे उमाळे दाटून आले. यावरूनच हिंदुत्वाला व राष्ट्रवादालाच नव्हे, तर बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांना तिलांजली देण्याचे काम शिवसेना पक्षप्रमुखांनी केल्याचे स्पष्ट होते. हिंदू धर्मात तिलांजली एखाद्याच्या मृत्यूनंतरच दिली जाते व म्हणूनच शिवसेनेसाठी तरी हिंदुत्वाचा व राष्ट्रवादाचा मुद्दा मृतप्राय झाल्याचे यातून दिसते. मात्र, शिवसेनेच्या हिंदूद्रोही व राष्ट्रविरोधी कारनाम्याचे हे एकच एक उदाहरण नव्हे! गेल्याच महिन्यात उद्धव ठाकरेंनी असलाच एक नमुना पेश करून दाखवला होता. नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध म्हणून हिंसाचार, दगडफेक व जाळपोळ करणार्‍या जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर पोलिसांनी कायद्याच्या अधीन राहून कारवाई केली, तेव्हाही ‘१०, जनपथ’च्या चरणी बुद्धी गहाण टाकलेल्या उद्धव ठाकरेंनी त्याची तुलना थेट जालियनवाला बागेतील क्रांतिकारक देशभक्तांवर ब्रिटिशांनी केलेल्या गोळीबाराशी केली होती. खरे म्हणजे उद्धवरावांचे हे विधान ऐकून थडग्यात बंदिस्त झालेल्या जनरल डायरलाही स्वतःची लाज वाटली असेल! पण, हे पडले सत्तेला चटावलेले ठाकरे, सोनियांचे पायधरू, त्यांना कसली शरम आणि कसले देशप्रेम? नंतर तर शिवसेना खासदार व प्रवक्ते संजय राऊत जमात-ए-इस्लामीसारख्या कट्टर धर्मांध संघटनेच्या मंचावर बरळून आले. इथे गेल्यावर राऊतांच्या बडबडीला धुमारे फुटले नि त्यांनी जमात-ए-इस्लामीला देशभक्तीचे प्रमाणपत्रही देऊन टाकले! अर्थात सत्तेच्या धुंदीचा गांजा मारला की असेच होणार म्हणा!


दरम्यान
, जेएनयुतील हाणामारीनंतर मुंबईत त्याच्या विरोधात जे आंदोलन केले, त्यात शिवसेनेच्या नाकावर टिच्चून काश्मीरच्या ‘आझादी’चे बॅनर झळकवले गेले. त्यावरही संजय राऊत यांच्यासह आदित्य ठाकरेंनी बालिश प्रतिक्रिया दिली. ‘आझाद काश्मीर’चा अर्थ इंटरनेट, वायफाय वगैरे सेवा सुरू करा, असा होता, असे वक्तव्य या दोघांनी केले. परंतु, बोळ्याने दूध पिणारेदेखील राऊत व ठाकरेंच्या या विधानावर विश्वास ठेवणार नाहीत, इतके ते मजेशीर व संतापजनकही होते. दुसरीकडे काही महिन्यांपूर्वी उद्धव ठाकरे व शिवसेनेने जम्मू-काश्मीर, कलम ३७० व कलम ३५ ए चा महाराष्ट्राशी, इथल्या जनतेशी काय संबंध म्हणून गोंधळ घातला होता. देशाच्या एकता-अखंडतेला अबाधित ठेवणारा निर्णय केंद्र सरकारने घेतला, तेव्हा त्याच्या विरोधात असली बडबड ठाकरेसेनेने केली होती. परंतु, गेल्या दोन महिन्यांपासून कोण किती खाणार यावरून ज्यांनी मंत्रिमंडळ विस्तार व खातेवाटपाचा घोळ घातला, राज्यातले प्रशासकीय कामकाज बंद ठेवले, ज्यांच्या मला मिळते की तुला मिळते, या वृत्तीपायी ३०० शेतकर्‍यांनी याच काळात आत्महत्या केल्या, त्या महाराष्ट्राचा व इथल्या मुख्यमंत्र्यांचा जेएनयुशी कसला संबंध होता? की उद्धव ठाकरेंचे मंत्रिमंडळ जेएनयुला अनुदान देऊन पोसत होते म्हणून त्यांनी जेएनयुतील हिंसाचारावर तोंड उघडले? असे प्रश्न पडतात व त्याचे मूळ शिवसेनेच्या मोदी, शाह व भाजपद्वेषातच सापडते, दुसर्‍या कशातही नाही. मात्र, आगामी निवडणुकांत राज्यातली देशभक्त जनता शिवसेनेच्या या द्वेषबुद्धीला उखडल्याशिवाय राहणार नाही.

@@AUTHORINFO_V1@@