समाजकार्य करताना उपेक्षित, दुर्लक्षित, वनवासी बांधवांना आरोग्य, शिक्षणाच्या मूलभूत क्षेत्रात सर्वस्वी आधार देऊन त्यांच्या जीवनाला कलाटणी देणार्या प्रमोद नांदगावकर यांच्याविषयी...
‘मानवसेवा हीच ईश्वरसेवा’ हे ब्रीद मनाशी बाळगून समाजसेवेचे व्रत स्वीकारलेले प्रमोद नांदगावकर. त्यांच्या या समाजसेवेच्या निस्सीम कार्याचा विस्तार आज प्रचंड वाढला आहे. प्रमोद अतिशय सामान्य कुटुंबात जन्मलेले. त्यामुळे लहान वयातच परिस्थितीची जाणीव त्यांना मोठं करुन गेली. समाजसेवेचा वसाही त्यांना वडील धर्मा नांदगावकर यांच्याकडून मिळाला. त्यामुळे कायद्याच्या शिक्षणाबरोबरच सामाजिक कार्यासंबंधी पदवीही त्यांनी प्राप्त केली. अनेक अडीअडचणींचा सामना करत प्रमोद यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. प्रारंभीपासूनच समाजकार्याला जीवनध्येय म्हणून स्वीकारलेल्या प्रमोद यांनी तळागाळातील, आदिवासी, दुर्गम भागातील जनतेला चांगले आरोग्य, निरोगी जीवन लाभावे याकरिता विविध माध्यमातून, उपक्रमांद्वारे समाजकार्यात निरपेक्षपणे स्वत:ला वाहून घेतले.
या सामाजिक कार्यासाठीच त्यांनी ‘अथर्व मित्रमंडळ’ या संस्थेची स्थापना केली. या माध्यमातून त्यांनी गरजूंसाठी विविध नि:शुल्क आरोग्य शिबिरे, आरोग्य जनजागृती मोहिमा इत्यादी उपक्रम सातत्याने राबविण्यास सुरुवात केली. प्रमोद यांना या कामासाठी अनेक अडचणीही आल्या. अनेकवेळा लोकांचा अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने प्रमोद यांच्या पदरी निराशाही आली. मात्र, पुन्हा नवउमेदीने, नवप्रेरणेने त्यांनी आपल्या कामामध्ये अजिबात खंड पडू दिला नाही.
याच दरम्यान प्रमोद यांना आरोग्यजगतात नावाजलेल्या ’रेड स्वस्तिक सोसायटी’ या संस्थेच्या महाराष्ट्र राज्य जनसंपर्क संचालकपदी काम करण्याची संधी मिळाली. या संस्थेत काम करताना राज्याच्या कानाकोपर्यातील उपेक्षित व गरजवंतांना दर्जेदार व मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याचे सत्कार्य करण्याचे भाग्य त्यांना लाभले. खेड्यापाड्यात गरीब, सुविधांअभावी पिचलेल्यांना या संस्थेच्या माध्यमातून चांगल्या आरोग्यसेवा त्यांना प्रदान करता आल्या. याबरोबर गावागावात आरोग्य शिबिरे, अवयवदानाबद्दल मार्गदर्शन, जनजागृतीवरही संस्थेचा भर असतो. या उपक्रमातून अनेक रुग्ण रोगमुक्त झाले असून त्यांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. ग्रामीण व शहरी भागात गरजू रुग्णांसाठी रुग्णवाहिकाही संस्थेच्या मदतीने उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. याच दरम्यान, नाशिकच्या कुंभमेळ्यातील साधु-संतांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजनदेखील करण्यात आले होते. याशिवाय वारीला पंढरपूरमध्ये मोठ्या संख्येने दाखल होणार्या वारकर्यांसाठीही मोफत आरोग्य शिबीर, निःशुल्क औषध वाटप करण्याचे काम प्रमोद यांनी स्वतः केले आहे.
आरोग्य सेवेत काम करणार्या प्रमोद यांना कलाक्षेत्राचीही तितकीच आवड. ही आवड जोपासण्यासाठी त्यांनी ‘गंधर्व गुरू प्रतिष्ठान’ ही संस्था सुरू केली. नवीन कलाकारांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी राज्य नाट्यस्पर्धेत सहभाग आणि अभिवाचन कार्यशाळेची त्यांनी या माध्यमातून सुरुवात केली. त्यामुळे अनेक कलाकारांना आपली कला सादर करण्याचे एक हक्काचे व्यासपीठ मिळाले. विशेष म्हणजे, वनवासी कलाकारांनाही आपली पारंपरिक कला जोपासण्याची संधी मिळाली आहे.
राज्यातील ठिकठिकाणच्या वनवासी पाड्यांवर घेतल्या जाणार्या आरोग्य शिबिरांमुळे तेथील बिकट परिस्थिती त्यांच्यापासून लपून राहिली नव्हती. वनवासींच्या आरोग्याची होणारी हेळसांड पाहून प्रमोद नेहमीच अस्वस्थ होत. म्हणूनच शिबिरांच्या माध्यमातून आरोग्याचे महत्त्व त्यांनी वनवासींना पटवून दिले.
चांगल्या आरोग्याबरोबर चांगले शिक्षण मिळणे हासुद्धा येथील वनवासी मुला-मुलींचा प्राथमिक हक्क. पण, या दुर्गम वनवासी पाड्यांवर दोन वेळच्या खाण्यापिण्याची भ्रांत असताना शिक्षण तर आवाक्याबाहेरचे वाटावे. त्यामुळे वेळीच वनवासींच्या शिक्षणाची गरज ओळखून प्रमोद यांनी त्यांना शिक्षित करण्याचा वसा हाती घेतला. आपल्या संस्थेच्या माध्यमातून वनवासी मुलांसाठी शैक्षणिक सोयीसुविधा उपलब्ध करुन दिल्या. यामुळेच आज अनेक वनवासी पाड्यांवरील मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यामध्ये प्रमोद यांचा सिंहाचा वाटा आहे. यामध्ये खासकरुन मुलींच्या शिक्षणासंबंधी त्यांनी केलेले काम वाखाणण्यासारखे आहे.
प्रमोद सध्या महाराष्ट्र प्रदूषण मंडळात सहायक प्रशासकीय-लेखा अधिकारी पदावर कार्यरत आहेत. गेल्या १९ वर्षांपासून आपली नोकरी सांभाळून ते समाजसेवेत अग्रेसर आहेत. अनेक पुरस्कारांनी त्यांच्या समाजकार्याचा गौरव करण्यात आला आहे. यामध्ये २०१६ साली अमरावती येथे महाराष्ट्र पर्यटन सांस्कृतिक, कला, प्रतिभा व वित्तीय साक्षरता महासंमेलनात ‘स्वामी विवेकानंद राष्ट्रीय युवा पुरस्कार’, महाराष्ट्र शासन उपक्रम यवतमाळ जिल्हा प्रशासन पर्यटन सांस्कृतिक कला महोत्सव, स्व. कौसल्याबाई गो. भितकर बहुउद्देशीय शिक्षण संस्था, यवतमाळ यांचा आरोग्य क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवनगौरव पुरस्कार २०१९’, संकल्प प्रतिष्ठान आयोजित ‘टिटवाळा महेात्सव २०१९’ मध्ये सांस्कृतिक एकात्मता राखण्यासाठी अतिशय मौलिक योगदान देऊन टिटवाळा शहराचा नावलौकीक वाढविल्याबद्दल सन्मानपत्रानेही त्यांना गौरविण्यात आले. आयुष्याच्या अखेरच्या श्वासापर्यंत समाजकार्याचे व्रत प्रदीप यांनी हाती घेतले असून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी हीच दै. ‘मुंबई तरुण भारत’ कडून शुभेच्छा!
- कविता भोसले