चिनी ड्रॅगन आणि तैवानचे स्वातंत्र्य

    17-Jan-2020   
Total Views | 106


china taiwan_1  


नेपाळ, पाकिस्तान आणि श्रीलंकाही या देशाच्या धूर्त जाळ्यात फसत चालले आहेत. या देशाने पूर्व तुर्कस्थान, मंगोलचा अंतर्गत भाग, तिबेटवरही आपला हक्क सांगितला आहे. हाँगकाँगचे गृहयुद्ध तर सगळे जग पाहत आहे. छोट्या देशांना गिळू पाहणारा हा देश आहे, हिंदी चिनी भाई भाई म्हणत भारतावर पद्धतशीरपणे आक्रमण करणारा चीन.



जागतिक पारतंत्र्य म्हटले की
, आपल्या डोळ्यासमोर ते इंग्रज, पोर्तुगीज, डच वगैरे वगैरे येतात, पण जगामधील इतर देशांवर पारतंत्र्य लादणारे काय केवळ हेच देश आहेत? नाही, आपल्या आशिया खंडाचा विचार केला तर आपल्याकडेही दुसर्‍या देशावर या ना त्या कारणाने पारतंत्र्य लादणारा, त्या देशांचे स्वत्व, स्वातंत्र्य शोषणारा एक खुनशी देश आहे. अतिविस्तारवादी देशाने स्वतःची क्रूरता लपवण्यासाठी वेगळीच युक्ती वापरली आहे. हा देश आजूबाजूच्या छोट्या देशांना मदत करतो. इतकी मदत करतो की, त्या ओझ्याने तो चिमुकला देश दबून जातो. मग हळूहळू तो स्वतंत्र देशही या बलाढ्य देशाची भाषा बोलू लागतो. नेपाळ, पाकिस्तान आणि श्रीलंकाही या देशाच्या धूर्त जाळ्यात फसत चालले आहेत. या देशाने पूर्व तुर्कस्थान, मंगोलचा अंतर्गत भाग, तिबेटवरही आपला हक्क सांगितला आहे. हाँगकाँगचे गृहयुद्ध तर सगळे जग पाहत आहे. छोट्या देशांना गिळू पाहणारा हा देश आहे, हिंदी चिनी भाई भाई म्हणत भारतावर पद्धतशीरपणे आक्रमण करणारा चीन.



आज चीन जागतिक स्तरावर सांगतो की
, ‘वन चायना’ किंवा ‘एक चीन’ या संकल्पनेनुसार तैवान हा चीनचा एक हिस्सा आहे. चीनने तैवानला चिनी गणराज्य मानले आहे. मात्र, तैवान स्वतःला चिनी गणराज्य मानत नाही. तैवानमध्ये नुकत्याच निवडणुका झाल्या आणि त्साय इंग वेन या राष्ट्रपती झाल्या. त्यांचे म्हणणे, ‘तैवानला स्वातंत्र्य द्या,’ असे म्हणायचे कारणच नाही. कारण, तैवान पूर्वीपासून स्वतंत्रच आहे. चीनने तैवानशी आदराने वागावे, तसेच चीनने धमकी देऊ नये. वेन यांच्या बोलण्यावर चीनचे म्हणणे आहे की, हा फुटीरतावाद असून पुढची १० हजार वर्षे जरी फुटीरतावादी वेगळा तैवान म्हणून कारवाई करत राहिले, तरी तैवान चीनचाच हिस्सा आहे. मात्र, इतिहासात डोकावले तर दिसते की, तैवान हा कधीही चीनमध्ये सामील नव्हता. चीनने या देशावर पारतंत्र्य लादले होते. इ.स. १३६८ साली मिंग वंशाच्या काळात चीनमधले निर्वासित तैवानमध्ये गेले. तैवानच्या सीमाभागातील वनवासी लोकांवर अत्याचार करून ते तिथे राहू लागले. पुढे १५१७ मध्ये तिथे पोर्तुगिजांची सत्ता आली. त्यानंतर डचांनी इथे अधिपत्य केले. या काळात चिन्यांनी डचांशी संधी केली आणि हळूहळू डावपेच खेळत चीनने पूर्ण तैवानवर पुन्हा कब्जा केला. मात्र, १८९५ साली चीन आणि जपानचे युद्ध झाले आणि जपानने तैवानला ताब्यात घेतले.



मात्र
, दुसर्‍या महायुद्धाच्या समाप्तीनंतर जपानची दुर्दशा झाली. १९४५ साली तैवानवर पुन्हा चीनने अधिपत्य गाजवायला सुरुवात केली. मात्र, तैवानी जनतेला हे मान्य नव्हते. त्यामुळे तैवानमध्ये चीनविरोधात भीषण गृहयुद्धच सुरू झाले. २८ फेब्रुवारी, १९४७ रोजी चीनने या तैवानांच्या आंदोलनाला दडपण्यासाठी किमान १०हजार तैवानी आंदोलकांना मारून टाकले. पुढे सॅनफ्रॅन्सिस्को संधीनुसार जपानने तैवानवरील आपला हक्क मागे घेतल्याची घोषणा केली. त्यानंतर चीन आणि जपानची तैवानसंदर्भातली विशेष बैठकही झाली. मात्र, यात चीनला तैवानवर अधिकार आहेत, असे कोणतेही स्पष्ट संकेत दिले गेले नाहीत. असो. मात्र, आज इतक्या वर्षांनीही तैवानने चीनचे अधिपत्य मानले नाही, आपले स्वतंत्र राष्ट्र होते आणि आहे, यावरचा त्यांचा विश्वास तीळभरही ढळला नाही. मातृभूमीच्या स्वातंत्र्याची सर्वोच्च भावना तैवानी जनतेमध्ये आणि नवनिर्वाचित सरकारमध्येही आहे. याचे कारण तैवानमध्ये ८०टक्के जनता ही मूळची तैवानीच आहे आणि केवळ १५ टक्के चिनी आहेत, तर ५ टक्के इतर आहेत. तैवान चीनला एक रुपयाही टॅक्स देत नाही. तैवानचा स्वतंत्र कारभार आहे.



चीनमध्ये युआनच्या स्वरूपात आर्थिक व्यव्हार चालतात तर तैवानचेही स्वतंत्र चलन आहे
, त्याचे नाव आहे न्यू तैवान डॉलर. तैवान कोणत्याही बाबतीत चीनवर अवलंबून नाही. तरीही चीन स्वत:चे घोडे दामटवत आहे की, तैवान चीनचाच भाग आहे. असे जरी असले, तरी त्साय इंग वेन यांना जगाने तैवानचे राष्ट्रपती म्हणून स्वीकारले आहे. अमेरिकेने तर त्साय इंग वेन यांचे राष्ट्रपती झाल्याबद्दल अभिनंदनही केले. मुख्य मुद्दा असा की, आज जग एक खेडे झाले आहे. स्वातंत्र्याची अभिलाषा त्याचे महत्त्व जगाने प्रथम दर्जाचे मानले आहे. अशा परिस्थितीत चीन बळे बळे तैवानवर पारतंत्र्य लादत असताना जग शांत बसेल का? नाहीच, त्यामुळे त्साय इंग वेन यांनीही ताकदीने चीनला आवाहन दिले आहे की, तैवानकडे वाकड्या नजरेने पाहायची हिंमत करू नका. त्साय इंग वेन पर्यायाने तैवानचे आवाहन खरेच स्वातंत्र्याचे गीत गात आहे.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121