सरकारने नुसत्या घोषणा करण्यापूर्वी राज्याच्या तिजोरीत पाहावे : नारायण राणे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Jan-2020
Total Views |

TJSB _1  H x W:





ठाणे : शेतकर्‍यांच्या दोन लाखांपर्यंत कर्जमाफीच्या घोषणेवरून राज्यसभा खासदार नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर शनिवारी कडाडून टीका केली. मराठी माणसाच्या नावावर मते मागणार्‍या शिवसेनेने याबाबत घेतलेला एक महत्त्वाचा निर्णय सांगावा, असे खुले आव्हान त्यांनी दिले. ठाण्यात ‘उन्नती गार्डन’ येथे सुरू असलेल्या ‘मालवणी महोत्सवा’त ते उपस्थित होते. यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार प्रहार केला.


ते म्हणाले, “मुंबईच्या आर्थिक उलाढालीत आपली कोकणी माणसाचे योगदान किती आहे याचे आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. मुंबईच्या दादर-परळ भागातील माणूस आज कल्याण-डोंबिवलीत फेकला गेला. ही वेळ कोणामुळे आली याचा विचार व्हायला हवा. कोकणी माणसाचे मुंबईतील स्थान १८ टक्क्यांवर आले आहे. याला जबाबदार कोण? दोन-चार प्रमुख कोकणी उद्योजकांची नावे आपल्याला सांगता येतात का? मराठी माणसांच्या हक्कांसाठी लढणारी शिवसेना काय करते आहे, राज्यात सत्तांतर झाले. महाविकास आघाडीचे सरकार आले. मात्र, अद्याप मंत्र्यांना कारभार सुरू करता आला नाही. आता सत्तेत असलेल्या सरकारने आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गेल्या दीड महिन्यात घेतलेला एक ठोस निर्णय सांगावा, सातबारा कोरा करणार, अशी घोषणा केली तो झाला का? सातबारा कोरा करण्यासाठी ५४ हजार कोटींची गरज आहे. २ लाख कर्जमाफीसाठी २६ हजार कोटींची गरज आहे. उद्धव ठाकरे यांनी सांगावे राज्यातील तिजोरीत तेवढा पैसा आहे का, हे पाहावा,” असा घणाघात त्यांनी मुख्यमंत्र्यांवर केला. “मंत्रिमंडळात आयात केलेल्या मंत्र्यांशिवाय केवळ दोन शिवसैनिकांनाच स्थान मिळू शकले, उर्वरित मंत्रिपद मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्याच मुलाला दिले,” असे सांगत “राज्य अधोगतीकडे नेण्याचे काम हे सरकार करत आहे,” असा आरोप त्यांनी केला. “हे सरकार जास्त दिवस राहणार नाही. राज्यात सत्ताबदल अटळ आहे,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.



ठाणेकरांनी आणली मालवणी महोत्सवाला रंगत

सांस्कृतिक शहर अशी ओळख असलेल्या ठाणे शहरात कोकण ग्राम विकास मंडळ आणि भाजप यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मालवणी महोत्सव’ दि. ३ ते १२ जानेवारी दरम्यान ‘उन्नती गार्डन’ मैदान पोखरण रोड येथे सुरू आहे. महाराष्ट्र राज्य सहकार परिषद सदस्य, भाजप राष्ट्रीय परिषद सदस्य आणि कोकण ग्रामविकास मंडळ अध्यक्ष सीताराम राणे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या महोत्सवाला शेकडो नागरिकांनी उपस्थिती दर्शवली. सलग सात दिवस सुरू असलेल्या या महोत्सवात कोकणातील सुका मेवा, कोंबडी-वडे, चिकन-मटण, घावणे, सुकी मासळी, सौंदर्य प्रसाधने, छायाचित्र प्रदर्शन आदींचे स्टॉल्स गजबजून गेले होते. शनिवारी या संमेलनात ‘बाबा’ या विषयावर कविता वाचन स्पर्धा पार पडली. शनिवारी सुट्टीचा दिवस असल्याने अनेक खवय्यांनी कोकणातील या मेजवानीचा आस्वाद घेतला. मिताली साळगावकर आणि अर्चना परब यांच्य ’मायेकरणीची गजाली’ या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला.

@@AUTHORINFO_V1@@