पिंपरी : शहराला पाणीपुरवठा करणार्या नद्यांचे अस्तित्व धोक्यात येऊ नये तसेच आपल्या नद्या प्रदूषणमुक्त राहाव्यात, या उद्देशाने रोटरी परिवारातील पाच क्लब एकत्र येऊन यावर्षीदेखील गणेशोत्सवात ’निर्माल्य दान करा, कंपोस्ट खत मिळवा’ हा नुकताच उपक्रम राबविणार आहेत.
रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाऊन, रोटरी क्लब ऑफ आकुर्डी, रोटरी क्लब ऑफ पिंपरी-चिंचवड इंडस्ट्रियल टाऊन, रोटरी क्लब ऑफ देहूगाव आणि रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी या पाच क्लब्सनी मिळून या वर्षी हा निर्माल्य संकलनाचा कार्यक्रम हाती घेतला आहे. रोटरी क्लबच्यावतीने आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. निर्माल्य संकलनासाठी वाहनव्यवस्था तसेच निर्माल्यापासून खतनिर्मिती करणार्या यंत्राची व्यवस्था सर्व रोटरी क्लब्सनी मिळून केली आहे. नागरिकांना नदीबद्दल जिव्हाळा वाढावा, या उद्देशाने हा प्रकल्प राबविण्यात येतो. शहराला पाणीपुरवठा करणार्या नद्यांचे अस्तित्व धोक्यात येऊ नये तसेच आपल्या नद्या प्रदूषणमुक्त राहाव्यात, या उद्देशाने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. गेल्या दोन वर्षांपासून रोटरी क्लब आणि इतर सामाजिक संस्था व लोकसहभागातून प्रायोगिक तत्त्वावर हा उपक्रम यशस्वी केला आहे, तब्बल आठ टन निर्माल्य गोळा करून नदीमध्ये जाण्यापासून अडविले गेले, अशी माहिती रोटरी क्लबच्यावतीने देण्यात आली. आपण संस्कृती जपण्याबरोबरच पर्यावरणाचा समतोल राखला पाहिजे, आदर राखला पाहिजे, असे आग्रही मत रोटरी क्लबच्या पदाधिकार्यांनी व्यक्त केले.
सांगली, कोल्हापूरमधील पूरस्थिती, ब्राझीलमध्ये जळत असलेले भले मोठे अमेझॉन जंगल, जमिनीतील घटत चाललेली भूजल पातळी, जैवविविधेतेतील नष्ट होत चाललेले प्राणी, पक्षी या सर्वांचा आपल्या जीवनावर दूरगामी परिणाम होत असतो, कदाचित आपली पिढी ही एकमेव आहे जिला आतापर्यंत केलेल्या चुकांची दुरुस्ती करण्याची एकमेव संधी आहे. कारण, आपण असेच निसर्गाप्रति वागत राहिलो तर दुरुस्ती करण्याची संधी परत नाही, याकडे संयोजकांनी लक्ष वेधले. पिंपरी-चिंचवड शहर व परिसरातील सर्व शाळा, महाविद्यालये आणि रहिवासी सोसायटी यांच्यामार्फत निर्माल्य संकलन करण्याचा प्रयत्न या सर्व क्लबच्यावतीने करण्यात येणार आहे. तरी सर्वांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाऊनचे अध्यक्ष बाळासाहेब उर्हे, रोटरी क्लब ऑफ आकुर्डीचे अध्यक्ष जिग्नेश आगरवाल, रोटरी क्लब ऑफ पिंपरी-चिंचवड इंडस्ट्रिअल टाऊनचे अध्यक्ष जसविंदर सोखी, रोटरी क्लब ऑफ देहूगावचे अध्यक्ष दत्तात्रय कारके, रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीचे अध्यक्ष अॅड. सोमनाथ हारपुडे यांनी पत्रकार परिषदेत केले.