'मेट्रो ३'च्या ६२ टक्के भुयारीकरणाची कामगिरी फत्ते

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Sep-2019
Total Views |



५५ किमी भुयारीकरणापैकी ३४ किमीचे भुयार पूर्ण

 

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : 'कुलाबा-वांद्रे-सीप्झ' या (मेट्रो-3) भारतातील पहिल्या पूर्णत: भुयारी मेट्रो प्रकल्पामधील  भुयारीकरणाचे ६२ टक्के काम पूर्ण झाले आहे. या मार्गिकेकरिता सुरू असलेल्या ५५ किमी भुयारीकरणाच्या प्रक्रियेपैकी ३४ किमीचे भुयार खणून तयार झाले आहे. हे काम दोन वर्षांमध्ये सुरक्षितरित्या पूर्ण करण्यास 'मुंबई मेट्रो रेल्वे काॅर्पोरेशन'ला (एमएमआरसीएल) यश मिळाले आहे.


शहरात सध्या मेट्रो मार्गिकांचे जाळे विणण्याचे काम वेगाने सुरू आहे. या मार्गिकांमध्ये वाहतूकीच्या दृष्टीने भविष्यात सर्वात वेगवान ठरणाऱ्या 'मेट्रो-३' मार्गिकेच्या निर्माणकार्याने वेग धरला आहे. या मार्गिकेच्या भुयारीकरणाच्या कामाला सप्टेंबर २०१७ मध्ये सुरुवात करण्यात आली होती. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत माहिमच्या नयानगर येथील विवरात 'टनल बोअरिंग मशीन' (टीबीएम) उतरवण्यात आले होते. या प्रकल्पाअंतर्गत भुयारीकरण करण्यासाठी एकूण १७ टीबीएम यंत्रे मुंबईच्या भूगर्भात कार्यरत आहेत. ही यंत्रे भूगर्भात उतरविण्यासाठी कफ परेड, इरॉस सिनेमा, आझाद मैदान, सायन्स म्युझियम,सिद्धिविनायक, नयानगर, बिकेसी, विद्यानगरी, पाली मैदान, सारिपुत नगर, सहार रोड आणि छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ टी २ येथे विवरे तयार करण्यात आली आहेत. या टीबीएम यंत्रांनी एकूण भुयारीकरण्याच्या ६२ टक्के भुयारीकरण पूर्ण केले. या प्रकल्पाकरिता ५४.६२ किमीची भुयारीकरण करायचे आहे. त्यापैकी आजतागायत ३३.७९ किमीचे भुयारीकरण पूर्ण झाल्याची माहिती एमएमआरसीएलच्या प्रवक्तांनी दिली. विशेष म्हणजे भुयारीकरणाची ही संपूर्ण प्रक्रिया अहोरात्र मुंबईच्या पोटात सुरक्षितपणे सुरू आहे.

 

 
 
 

या प्रकल्पाचे निर्माणकार्य एकूण सात पॅकेजमध्ये पूर्ण करण्यात येत आहे. सात पॅकेजपैकी भुयारीकरणाचा सर्वात मोठा टप्पा 'सिद्धिविनायक ते धारावी' या 'पॅकेज ' मध्ये आहे. या पॅकजेमधील ११.०२ किमीच्या भुयारीकरणापैकी ६.९६ किमीचे म्हणजेच ६३ टक्के भुयार खणून पूर्ण झाले आहे. तर सर्वात लहान असलेल्या 'कफ परेड ते सीएसटी' या पहिल्या पॅकेजमधील ५.८९ किमीपैकी ३.२१ किमीचे भुयारीकरणाचे काम फत्ते झाले आहे. या भुयारीकरणासाठी आवश्यक असणाऱ्या सेगमेंट रिंग्स मुंबईतील ६ कास्टिंग यार्ड मध्ये तयार होत आहेत. ज्यापैकी ४ कास्टिंग यार्ड वडाळ्यात आणि प्रत्येकी १ माहुल व जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड येथे आहे.

 
 

पॅकेज                      एकूण भुयारीकरण              पूर्ण झालेले भुयारीकरण           टक्केवारी

                             ( किमी मध्ये)                    ( किमी मध्ये)

कफ परेड - सीएसटी                ५.८९                          ३.२१                   ५१ %

सीएसटी - मुंबई सेंट्रल               ७.६३                          ६.०७                   ८० %

मुंबई सेंट्रल - सिद्धिविनायक           ८.०४                          २.३९                  ३० %

सिद्धिविनायक - धारावी              ११.०१                          ६.९६                  ६३ %

धारावी - आंतरदेशीय विमानतळ        ७.९८                          ५.३४                  ६७ %

आंतरदेशीय विमानतळ - मरोळ नाका    ६.९२                          ३.५८                 ५२ %

मरोळ नाका ते सीप्झ                 ७.१५                          ६.२४                  ८७ %

 
 
 
@@AUTHORINFO_V1@@