नागपूरमध्ये उभारणार हेलिकॉप्टर निर्मिती कारखाना! ८ हजार कोटींची गुंतवणूक; २ हजार रोजगार निर्मिती
13-Jun-2025
Total Views |
मुंबई : नागपूरमध्ये ८ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक असलेला हेलिकॉप्टर निर्मिती कारखाना उभारण्यात येणार असून त्यातून २ हजार रोजगार निर्मिती होणार आहे. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या 'एक्स' अकाऊंटवर पोस्ट करत याबाबतची माहिती दिली.
शुक्रवार, १३ जून रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीतीत 'मॅक्स एरोस्पेस’ आणि उद्योग विभागात सामंजस्य करार करण्यात आला. नागपुर येथे सुमारे ८ हजार कोटी रुपये गुंतवणुकीचा हेलिकॉप्टर उत्पादन निर्मिती कारखाना उभारण्यात येणार आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेस अँड एव्हिएशन प्रा. लि. आणि महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागात नागपूरमध्ये हेलिकॉप्टर उत्पादन कारखाना उभारण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला.
निर्मितीचे प्रत्यक्ष काम २०२६ पासून सुरू होणार असून या प्रकल्पामध्ये प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष सुमारे दोन हजार रोजगार निर्मिती होईल. प्रकल्पात आठ वर्षांमध्ये सुमारे ८ हजार कोटींची गुंतवणूक होणार असल्याची माहिती मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. तसेच यासाठी त्यांनी नागपूरचे पालकमंत्री या नात्याने मुख्यमंत्र्यांचे आभारही मानले. "मॅक्स एरोस्पेसने हेलिकॉप्टर उत्पादनासाठी महाराष्ट्र विशेषतः नागपूरची निवड केल्याने आनंद झाला. नागपूरच्या औद्योगिक क्षेत्रासह संरक्षण क्षेत्रात होणाऱ्या या निर्मितीमुळे भविष्यात आकाश कवेत घेण्याची संधी निर्माण होईल," अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.