आम्हाला मेट्रो हवी!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Sep-2019
Total Views |



मुंबई : मुंबई मेट्रो ३ प्रकल्पात आरे कॉलनीतील प्रस्तावित कारशेडवरून सर्वत्र वादंग सुरू असताना शुक्रवारी या प्रकरणाला वेगळीच दिशा मिळाली. मेट्रो कारशेडच्या विरोधात काही पर्यावरणवादी शुक्रवारी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या कार्यालयासमोर निदर्शन करणार होते, पण प्रत्यक्षात तिथे विरोधकांसोबतच समर्थन करणारेही उपस्थित झाले. त्यामुळे विरोध होण्याआधीच याबाबत आता समर्थनही होऊ लागल्याचे चित्र पाहायला मिळाले.

 

शुक्रवारी या प्रकारानंतर मेट्रोविषयी सकारात्मक विचार करणारे मुंबईकर हळूहळू रस्त्यावर उतरू लागल्याचे चित्र आहे. त्यामुळे आरेचा मुद्दा आता एकतर्फी राहिला नसून त्यावर दोन्ही बाजूंनी चळवळीने जोर धरला आहे. मेट्रो प्रकल्प पूर्णत्वास जाण्यास आरे कारशेडला केल्या जाणार्या विरोधामुळे विलंब होत आहे. आरेमध्ये कारशेड उभारल्यास पर्यावरणाचे नुकसान होईल, असा दावा गेल्या काही दिवसांपासून केला जात आहे. या निदर्शन मालिकेचाच भाग म्हणून आरे बचाव मोहिमेसाठी काही मुंबईकर एमएमआरसीएलच्या कार्यालयावर निदर्शने करणार होते. पण, शुक्रवारी एमएमआरसीएल कार्यालयाबाहेर आरे बचाव समितीचे लोक पोहोचण्याआधीच मेट्रोच्या समर्थनार्थ रेल्वे प्रवासी संघटनांचे पदाधिकारी, सर्वसामान्य मुंबईकर व सकारात्मक पर्यावरण कार्यकर्ते दाखल झाले. भरदुपारी एमएमआरसीएलच्या कार्यालयाबाहेर मेट्रो समर्थनार्थ मुंबईकरांची गर्दी जमू लागली. सायंकाळी चारनंतर तेथे आरे बचाव समितीचे लोकही दाखल झाले. अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलीस प्रशासनाने दोन्ही गटांना एकमेकांपासून साधारणतः २०० मीटर अंतरावर ठेवले होते.

 

दरम्यान, जमलेल्या रेल्वे प्रवाशांनी मेट्रो समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली. “मेट्रो प्रकल्प झालाच पाहिजे, मेट्रोचे काम लवकरात लवकर पूर्ण झालेच पाहिजे,” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. आरे कारशेडला विरोध करणार्यांपैकी अनेकांनी प्रवासी संघटना, मुंबईकरांच्या गटात शिरण्याचा प्रयत्न केला. पर्यावरणाच्या नावाखाली विकासकामांना विरोध केला जातो, याविषयी उपस्थितांनी असंतोष व्यक्त केला. सुदैवाने, पोलिसांनी दाखविलेल्या सावधगिरीमुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.

 

"मी एक पर्यावरणप्रेमी आहे. आम्ही मुंबईत आजवर २० हजारहून अधिक वृक्षारोपण केले आहे. आम्ही पन्नास हजार वृक्ष लावण्याची व जगवण्याची प्रतिज्ञा करतो."

 

-विशाल टिबरेवाल, माय ग्रीन

 

"संपूर्ण आरेतील फक्त टिकलीइतकी जागा मेट्रोसाठी लागणार आहे. पण त्या टिकलीएवढ्या जागेने हजारो जणांचे प्राण वाचतील."

 

- भटू सावंत, सदस्य, जागृत भारत मंच

 

"जीव मुठीत घेऊन मुंबईकर रोज प्रवास करतात. अनेक लोक पेट्रोल जाळून चारचाकी गाड्यांनी प्रवास करतात. मेट्रोमुळे वाहनांतून होणार्या प्रदूषणाचे प्रमाण कमी होईल."

 

- कैलास वर्मा, सदस्य, रेल्वे प्रवासी संघटना

 

"चांगल्या शहरासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था गरजेची असते. लोकलची क्षमता ३५ लाख आहे पण दररोज ८० लाख नागरिक प्रवास करतात. सामान्य मुंबईकराला चांगल्या प्रवासव्यवस्थेपासून वंचित का ठेवता?"

 

- भूषण मर्दे, मंथन संस्था, दादर

 

"पर्यावरणप्रेमींनी समजून घ्यावे. आम्हालाही पर्यावरणाची काळजी आहे. आज मुंबईला पर्यायी वाहतूक व्यवस्थेची गरज आहे. दररोज दहा ते पंधरा प्रवाशांचा रेल्वेतून पडून मृत्यू होतो. आम्ही एमएमआरसीएलच्या पाठीशी आहोत."

 

- मधु कोटियन, अध्यक्ष, रेल्वे प्रवासी संघटना

@@AUTHORINFO_V1@@