गिरीभ्रमण आणि गिर्यारोहणाला नियमनाची गरज - वसंत वसंत लिमये

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Jul-2019   
Total Views |

 

पावसाची चाहूल लागली की साधारणतः साहसी खेळांच्या शोधात असलेली मंडळी आपल्याला पाहायला मिळतात मग त्यामध्ये पर्यटक, गिर्यारोहक अशा अनेकांचा समावेश असतो. या साहसी उपक्रमांमध्ये सहभागी होण्याकरिता वयोमर्यादा नसल्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच याविषयी प्रचंड आकर्षण असते. गिर्यारोहण, स्काय डायव्हिंग, पॅरासेलिंग इत्यादी साहसी खेळांचे आयोजन करण्याऱ्या कित्येक संस्था सध्या महाराष्ट्रात कार्यरत आहेत. मात्र 'साहस' म्हटले की त्यामध्ये अनिश्चितता आणि धोक्याची शक्यता आलीच. त्यामुळेच पर्यावरण आणि सहभागी सदस्य यांना असणारा संभाव्य धोका लक्षात घेता, यावर्षी 'महा ऍडव्हेंचर कौन्सिल' या संस्थेची स्थापना करण्यात आली. याचे औचित्य साधून 'मुंबई तरुण भारत' ने 'महा ऍडव्हेंचर कौन्सिल' चे अध्यक्ष वसंत वसंत लिमये यांच्या मुलाखतीतून या संस्थेविषयी, त्यांच्या कार्याविषयी आणि उद्दिष्टांविषयी अधिक जाणून घेतले.

. 'महा ऍडव्हेंचर कौन्सिल' म्हणजेच MAC ची सुरुवात करावी असे आपल्याला का वाटले?

२०१४ साली मार्गदर्शक तत्वांच्या संदर्भातील पहिला शासनाचा जीआर आला, याची पार्श्वभूमी म्हणजे २०१२ मध्ये पालकांनी या साहसी खेळांच्या संदर्भात महाराष्ट्र सरकारच्या विरोधात जनहित याचिका दाखल केली. या याचिकेमध्ये साहसी खेळांसाठी काही मार्गदर्शक तत्वे आहेत का? आणि नसतील तर का नाहीत? असे प्रश्न उपस्थित करण्यात आले आणि त्याला अनुसरून मार्गदर्शक तत्वांचा शासन निर्णय काढण्यात आला. मात्र ऍडव्हेंचर क्षेत्रातील काही अनुभवी मंडळी आणि अन्य काही तज्ज्ञ मंडळींना शासनाच्या जीआर मध्ये काही त्रुटी आढळल्या. त्यामुळे ऍडव्हेंचर क्षेत्रातील - मंडळींनी मिळून हा जीआर पुन्हा बनवावा यासाठी WRIT पिटीशन दाखल केले. त्यानंतर २०१८ साली जुलैमध्ये तयार करण्यात आलेल्या जीआरमध्ये देखील एकांगीपणा आणि त्रुटी असल्यामुळे, फक्त विरोधासाठी नसून काहीतरी सकारात्मक घडावे आणि सुरक्षितता असावी यासाठी एक संघटित मार्गदर्शक संस्था या जमीन, पाणी आणि हवा या क्षेत्राशी निगडित ऍडव्हेंचर स्पोर्ट्सच्या पाठीमागे असावी या उद्देशाने प्रयत्न सुरु झाले. त्यानंतर सर्वांच्या संमतीने ना नफा तत्वावर 'महा ऍडव्हेंचर कौन्सिल' या संस्थेची स्थापना करण्यात आली.

. गिर्यारोहणासंदर्भात असलेली मार्गदर्शक तत्त्वे काय आहेत? आणि त्याबाबत आपले मत काय?

आत्ताची जी मार्गदर्शक तत्त्वे आहेत, त्यासाठी २०१४ साली तज्ज्ञांची समिती स्थापन झाली होती. मात्र ती मार्गदर्शक तत्त्वे महाराष्ट्रात लागू करण्याच्या दृष्टीने बऱ्याच अडचणी होत्या. महाराष्ट्रात बरेच असे क्लब्स आणि व्यावसायिक संस्था मधल्या काळात तयार झाल्या मात्र त्यापैकी किती संस्थांमध्ये सेफ्टी गाईडलाईन्स पाळल्या जातात हा एक प्रश्न आहे. तर काही वेळा हौशी लोक इंटरनेटवर मिळालेल्या माहितीच्या आधारे साहसी खेळांमध्ये सहभागी होतात. अशावेळी इंटरनेटवर मिळालेली माहिती पडताळून बघितली जात नाही किंवा कोणती माहिती चुकीची आहे कोणती बरोबर आहे याविषयी योग्य ते मार्गदर्शन देण्यास संस्था समोर येत नाहीत, त्यामुळे अपघात घडू शकतात. यासाठी सामान्य माणसाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य मार्गदर्शक तत्वे आखून देणे गरजेचे आहे. यासाठीच 'महा ऍडव्हेंचर संस्थेने' मार्गदर्शक तत्वांसाठीचे पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण केले असून दुसऱ्या टप्प्यातील काम लवकरच पूर्ण होईल.

. रस्त्यांचे सुधारणारे जाळे आणि त्यामुळे गिर्यारोहण किंवा साहसी खेळांसाठी दुर्गम भागात पोहोचण्याचा कल वाढत आहे आणि ही संख्या वाढतच राहील. यामुळे गिर्यारोहणाच्या क्षेत्रासमोर कोणती नवी आव्हाने निर्माण होतील?

रस्त्यांचे सुधारणारे जाळे आणि त्यामुळे दुर्गम भागात साहसी खेळ पोहोचणे ही एक चांगलीच गोष्ट आहे. यामुळे काही गोष्टी सुधारणार आहेत, सोप्या होणार आहेत. गिर्यारोहक किंवा ट्रेकरसाठी ही आनंदाची गोष्ट आहे. परंतु काही वेळा काही ठिकाणे खूप प्रसिद्ध होतात अशावेळी तिकडे जाणारे पर्यटक किंवा गिर्यारोही यांची संख्या अचानक वाढते, परंतु त्यांना त्या ठिकाणाची पुरेशी माहिती नसते आणि सगळाच गोंधळ होतो. पण यामागील चांगली गोष्ट अशी की, दुर्गम ठिकाणांविषयी असणारी माहिती त्यानिमित्ताने अधिक लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत होते. फक्त गरज आहे ती अशा ठिकाणी चांगली यंत्रणा सुरु करण्याची. हे एकट्या दुकट्याचे काम नसल्यामुळे यावर सरकारचे नियंत्रण आणणे गरजेचे वाटते. आणि त्यासाठी मोठे मनुष्यबळ देखील लागेल.

. हौशी आणि निपुण अशा दोन प्रकारच्या गिर्यारोहणाच्या श्रेणी सध्या आपल्याला पाहायला मिळतात, या दोन्ही श्रेणीसाठी कोणत्या प्रकारची औपचारिक व्यवस्था असावी असे आपल्याला वाटते?

 

क्लब्स आणि व्यावसायिक संस्था असे दोन प्रकार सध्या गिर्यारोहण संस्थांमध्ये उदयाला आले आहेत. या संस्थांनी सुरु केलेल्या साहसी खेळांच्या ऍक्टिव्हिटीमधील सहभागी ग्रुपची संख्या काय? एका ग्रुपमध्ये प्रशिक्षित प्रतिनिधी किंवा व्यक्ती बरोबर आहेत का? हे प्रमाण जर योग्य नसेल तर त्यामध्ये संतुलन साधणे ही एक महत्वाची बाब म्हणावी लागेल. त्यामुळे फक्त सहभागी व्यक्तींना नुसतेच ट्रेकवर घेऊन जाणे हे महत्वाचे नाही तर स्थानिक व्यक्तींनी केलेले मार्गदर्शन देखील तितकेच महत्वाचे आहे. या क्षेत्रात चांगले काम करणाऱ्या व्यक्ती अनेक आहेत, त्यांचे योग्य मार्गदर्शन घेणे हे प्रत्येक संस्थेचे कर्तव्य आहे. त्याच उद्देशाने मॅक (महा ऍडव्हेंचर कौन्सिल) काम करण्याच्या प्रयत्नात आहे.

. ही मार्गदर्शक तत्त्वांविषयीची माहिती सर्वांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. त्यामुळे तरुण गिर्यारोहकांना आणि साहसी खेळांमध्ये सहभागी व्यक्तींना काय आवाहन कराल?

काही वर्षांपूर्वी अनुभवी मंडळींकडून आपली संस्कृती म्हणून ऍडव्हेंचरशी संबंधित गोष्टी लहान मुलांना सांगितल्या जात असत. मग त्यामध्ये वेगवेगळ्या गडांची माहिती असेल, साहसी खेळांची माहिती असेल. सध्याच्या डिजिटल युगात आपल्याला इंटरनेटच्या माध्यमातून विविध प्रकारचे माहितीचे स्रोत उपलब्ध आहेत, परंतु त्या माहितीच्या महापुरात नेमकी आणि खरी माहिती देण्यासाठी अनुभवी, जाणकार व्यक्तींची जोड असणे अत्यावश्यक वाटते. त्यामुळे अशा साहसी उपक्रमांमध्ये सहभागी होण्यापूर्वी आयोजक आणि सहभागी व्यक्तींनी एकत्रितरित्या सुरक्षेच्या दृष्टीने मार्गदर्शक तत्वांचे पालन करणे उपयुक्त ठरेल. त्यासाठीमहा ऍडव्हेंचरही संस्था कायमच प्रयत्नशील राहील.

अधिक माहितीसाठी https://www.mahaadventurecouncil.org/

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 
@@AUTHORINFO_V1@@