नवी दिल्ली : देशात अनेक दिवसांपासून एक देश, एक निवडणूक या मुद्द्यावर चर्चा सुरू आहे. याच विषयावर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय प्रमुख नेत्यांना चर्चेसाठी निमंत्रण दिले आहे. बैठकीत राष्ट्रीय पक्ष, प्रादेशिक पक्षाचे अध्यक्ष उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
दुपारी तीन वाजता संसद भवनाच्या ग्रंथालयात ही बैठक पार पडणार आहे. या बैठकीला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, तेलुगू देसम पार्टीचे चंद्राबाबू नायडू उपस्थित राहणार नसल्याचे समजते. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान एक देश एक निवडणूक हा मुद्दा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उचलून धरला होता. त्यामुळे या विषयावर चर्चा करण्यासाठी पंतप्रधानांनी एक पाऊल पुढे जात बैठक बोलविली आहे.
बैठकीला प्रमुख राजकीय पक्षांच्या अध्यक्षांना निमंत्रण देण्यात आले आहे. विरोधी पक्षांमध्ये या बैठकीत उपस्थित राहण्याबाबत एकवाक्यता नाही. ममता बॅनर्जी, चंद्राबाबू नायडू उपस्थित राहणार नाहीत हे स्पष्ट असलं तरी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी उपस्थित राहणार की नाही, याबद्दल अद्याप माहीती देण्यात आलेली नाही.
एक देश, एक निवडणूक यावर विरोधी पक्षांची भूमिका स्पष्ट नसल्याने विरोधी पक्ष या प्रस्तावाला विरोध करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ज्या पक्षाचे लोकसभा, राज्यसभा सदस्य आहेत त्यांना बैठकीचे निमंत्रण दिले आहे. काँग्रेस नेत्यांची आज सकाळी या मुद्द्यावरुन बैठक होणार आहे, या बैठकीत पंतप्रधानांच्या बैठकीला जायचे की नाही यावर निर्णय घेण्यात येणार आहे.
पंतप्रधानांनी बोलविलेल्या या सर्वपक्षीय बैठकीत एक देश, एक निवडणूक याव्यतिरिक्त २०२२ मध्ये भारताचा ७५ वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्याबाबत, तसेच महात्मा गांधी यांची १५०वी जयंती साजरी करण्याबाबतही चर्चा केली जाणार आहे. सन १९५२ ते १९६७ पर्यंत लोकसभा व विधानसभा निवडणुका एकत्रच होत होत्या. मात्र त्यानंतर काही राज्यांच्या विधानसभा मुदतीआधीच बरखास्त झाल्या व हे चक्र बदलले आहे.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat