शत्रुच्या उरात धडकी भरवणार ‘आयबीजी’

    19-Jun-2019
Total Views | 54



नवी दिल्ली : भारताने पाकिस्तानात घुसून केलेल्या बालाकोट एअर स्ट्राइकनंतर आता त्या देशासमोरील अडचणीत आणखी वाढ होणार आहे. आगामी काही महिन्यात आपल्या पश्चिम सीमेवरील सुरक्षा अधिक कडक करण्याचे धोरण भारताने स्वीकारले असून त्यामुळे पाकिस्तानला चांगलाच झटका बसणार आहे. भारतीय लष्कराने आता पाकिस्तानी सीमेवर तीन नवीन इंटिग्रेटेड बॅटल ग्रुप म्हणजेच आयबीजी तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. आयबीजी युद्धजन्य परिस्थितीमध्ये जलद हालचाली करत शत्रुवर प्रहार करण्यात, शत्रुच्या उरात धडकी भरवण्यात सक्षम असेल.

 

लष्कराने आपल्या इंटिग्रेटेड बॅटल ग्रुपचा सरावाचा युद्धाभ्यास नुकताच यशस्वीपणे पूर्ण केला. हवाई शक्ती, पायदळासह युद्धासाठी आवश्यक सर्वप्रकारच्या ताकदीने आयबीजी सज्ज असणार आहे. सोबतच आयबीजीमध्ये लष्करातील अन्य विभागही सामिल होणार आहेत. लष्करातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय लष्कराने इंटिग्रेटेड बॅटल ग्रुपचे यशस्वी परिक्षण केले असून आयबीजी आपल्या मारक क्षमतेसह काम करायला सक्षम असेल. यंदाच्याच ऑक्टोबर महिन्यामध्ये आयबीजीला सीमेवर तैनात केले जाईल. मिळालेल्या माहितीनुसार दीर्घ चर्चेअंती यासंबंधीच्या प्रस्तावाला लष्कर मुख्यालयाने मंजुरी दिली आहे. आता अंतिम मंजुरीसाठी सदर प्रस्ताव संरक्षण मंत्रालयाकडे पाठवण्यात आला आहे. दरम्यान, पाकिस्तान सीमेवरील यशस्वी तैनातीनंतर आयबीजीला चीन सीमेवरही तैनात करण्यात येणार आहे.

 

दरम्यान, दि. १५ जानेवारीला सैन्यदिनाच्या आधी पत्रकार परिषदेत लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत म्हणाले होते की, आयबीजीची चाचणी मेच्या युद्धाभ्यासादरम्यान होईल. नंतर आयबीजी कार्यरत होईल, तसेच याचा उद्देश लष्कराच्या मारक क्षमतेत वाढ करण्याचा आहे.

 

कसे असेल आयबीजी?

 

युद्धजन्य स्थितीत शत्रुसीमेवर लष्करी तुकड्यांना वेगाने पाठवण्यासाठी तसेच कठोर कारवाईच्या उद्देशाने इंटिग्रेटेड बॅटल ग्रुपची स्थापना करण्यात आली आहे. आयबीजी इतक्या वेगाने कारवाई करेल की, शत्रुला सावरण्याचाही वेळ मिळणार नाही. आयबीजीतील सदस्यसंख्या कमी असली तर युद्धासाठी आवश्यक सर्वच हत्यारांनी आणि जवानांनी सज्ज असेल. सोबतच हवाई शक्ती, पायदळ, चिलखती गाड्यांचाही त्यात समावेश असेल. आयबीजीकडे स्वतःच्या ८ ते १० ब्रिगेड असतील. प्रत्येक ब्रिगेडमध्ये ३ ते ४ बटालियन असतील आणि प्रत्येक बटालियनमध्ये ८०० जवान असतील.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121