आंध्र प्रदेशातील सत्तांतर आणि जगनची जादू

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |


मे २०१९ मध्ये झालेल्या सतराव्या लोकसभा निवडणुकांत भाजपने मिळवलेल्या अभूतपूर्व विजयाच्या झगमटात लोकसभेबरोबर आंध्र प्रदेशात झालेल्या विधानसभा निवडणुकांची तितकीशी चर्चा झाली नाही. आंध्र प्रदेशातील जनतेने एका बाजूला चंद्राबाबू नायडू, भाजप व कॉंग्रेससारख्या राष्ट्रीय पक्षांनासुद्धा नाकारले आणि तेथील जनतेने जगनमोहन रेड्डी या तरुण नेत्याच्या पक्षाला भरभरून यश दिले.

 

जगनमोहन ऊर्फ जगन रेड्डी म्हणजे आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री व कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते वाय. एस. राजशेखर रेड्डी यांचे सुपुत्र. मुख्यमंत्रिपदी असलेल्या राजशेखर रेड्डी यांचे ९ सप्टेंबर, २००९ रोजी अपघाती निधन झाले होते. वडिलांच्या मृत्यूनंतर मुख्यमंत्रिपद आपल्याला मिळावे, ही जगन रेड्डींची मागणी कॉंग्रेस हायकमांडने नाकारली. शेवटी जगनने ’वाय.एस.आर. कॉंग्रेस’ हा स्वतंत्र पक्ष स्थापन केला. राजशेखर रेड्डी यांच्या मृत्यूनंतर कॉंग्रेसचे आंध्रात पतन झाले व चंद्राबाबू नायडू मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. आता त्याच नायडूंच्या तेलुगू देसमचा दारूण पराभव करत जगन रेड्डींनी दिमाखात सत्ता मिळवली आहे.

 

आंध्र प्रदेशच्या विधानसभेत एकूण १७५ जागा असतात. नुकत्याच झालेल्या निवडणुकांत जगन रेड्डीच्या पक्षाने तब्बल १५१ जागा जिंकल्या आहेत. २०११ साली झालेल्या विधानसभा निवडणुकांत जगन रेड्डीच्या पक्षाने ४४ जागा जिंकल्या होत्या. तेव्हा चंद्राबाबूंच्या पक्षाचे १२६ आमदार निवडून आले होते. आताच्या विधानसभेत त्यांच्या पक्षाचे फक्त २३ आमदार आहेत. याचाच अर्थ असा की, त्यांच्या पक्षाने शंभर मतदारसंघात पराभव पत्करला आहे. जगन रेड्डीच्या पक्षाने ४९.९ टक्के मते मिळवली आहेत. पवन कल्याण यांच्या ’जनसेना’ या पक्षाने एक जागा जिंकली आहे. भाजप व कॉंग्रेस या दोन्ही राष्ट्रीय पक्षांना एकही जागा जिंकता आलेली नाही.

 

जगन रेड्डींचे वडील राजशेखर रेड्डी २००४ ते २००९ या काळात मुख्यमंत्री होते. त्यांचा लोकसंपर्क दांडगा होता, प्रशासनावर पकड होती. त्यांच्या अपघाती निधनानंतर त्यांच्यासारखा नेता कॉंग्रेसमध्ये समोर आलाच नाही. त्या तुलनेत चंद्राबाबू नायडू हे अनुभवी नेते होते. परिणामी, जनतेने २०११ साली झालेल्या विधानसभा निवडणुकांत त्यांच्या तेलुगू देसम पक्षाला भरभरून यश दिले. आता त्याच पक्षावर दारूण पराभव सहन करण्याची वेळ आली आहे.

 

जगन रेड्डींनी २०१९ सालातील विधानसभा व त्याबरोबर झालेल्या लोकसभा निवडणुकांदरम्यान सर्व राज्य पिंजून काढले. २०१८-२०१९ दरम्यान त्यांनी २४१ दिवसांची ‘प्रजा संपर्क यात्रा’ काढली होती. त्यांनी राज्यांत ३६४७ किमी. प्रवास करताना एक कोटी जनतेशी संवाद साधला होेता. याच दरम्यान, त्यांना दर शुक्रवारी हैदराबादेतील विशेष न्यायालयात बेहिशोबी मालमत्तेबद्दलच्या खटल्यात हजेरी लावावी लागत असे. हा सर्व प्रचार जगन रेड्डींनी फार मन लावून केला. याचे त्यांना भरघोस बक्षीस मिळाले. आंध्र प्रदेशातून लोकसभेसाठी २५ खासदार निवडले जातात. यातील जगन रेड्डीच्या पक्षाने २२ जागा जिंकल्या आहेत!

 

एके काळी महाराष्ट्राप्रमाणेच आंध्र प्रदेशही कॉंग्रेसचा बालेकिल्ला होता. तेथे अनेक वर्षे कॉंग्रेसची एकहाती सत्ता होती. याला १९८०च्या दशकात घरघर लागली. हा काळ म्हणजे इंदिरा गांधींच्या पुनरागमनाचा काळ होता. जानेवारी १९८० मध्ये इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या. तेव्हा त्यांचे सुपुत्र आधी संजय गांधी व नंतर राजीव गांधी देशाच्या सत्तेकडे आपल्या वाडवडिलांची इस्टेट असल्यासारखे बघत असत. संजय गांधींच्या अपघाती मृत्युनंतर राजीव गांधींनी राजकारण प्रवेश केला व लवकरच उद्याचे पंतप्रधान म्हणून वावरू लागले. त्याकाळी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री टी. अंजैय्या होते.

 

ते राजीव गांधींना घ्यायला हैदराबाद विमानतळावर गेले. तेव्हा राजीव गांधींची चप्पल तुटली, तर अंजैय्या ती स्वतः हातात घेऊन चालू लागले. त्यांच्या दुर्दैवाने एका छायाचित्रकाराने हे दृश्य टिपले व प्रकाशित केले. या छायाचित्रामुळे सर्व आंध्र प्रदेशात संतापाची लाट उसळली. याचा फायदा सिनेनट एन. टी. रामाराव यांना मिळाला. त्यांनी स्थापन केलेल्या तेलुगू देसम पक्षाची लोकप्रियता शिगेला पोहोचली. एवढेच नव्हे, तर १९८३ साली झालेल्या विधानसभा निवडणुकांत तेलुगू देसम दणदणीत बहुमताने निवडून आला. त्यावेळी एकूण २९४ जागांपैकी तेलुगू देसमने २०१ जागा जिंकल्या होत्या. यामुळे तेथे असलेल्या काँग्रेसच्या मक्तेदारीला धक्का लागला तो कायमचा! आता तर कॉंग्रेसचा एकही आमदार निवडून आलेला नाही.

 

तसे पाहिले तर चंद्राबाबू नायडू अनुभवी नेते आहेत. त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात हैदराबाद म्हणजे देशाचे ’सायबर कॅपिटल’ ओळखले जात होते. अलीकडे त्यांचे भाजपशी वाद झाले ते राज्याला विशेष दर्जा देण्याच्या मुद्द्यावरून. यामुळे नायडू भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडले व भाजपच्या विरोधात जोरदार प्रचार करू लागले. एका टप्प्यावर तर त्यांनी ’बिगर भाजप बिगर कॉंग्रेस’ आघाडी उभी करण्याचे जोरदार प्रयत्न केले. नायडूंच्या प्रयत्नांचा काहीही उपयोग झाला नाही. एवढेच नव्हे तर त्यांच्या हातातून राज्याची सत्ता गेलेली आहे.

 

चंद्राबाबूंप्रमाणेच जगन रेड्डींचीसुद्धा आंध्र प्रदेशला विशेेष राज्याचा दर्जा मिळावा, अशी मागणी आहे. सत्तारूढ होताच जगन रेड्डींनी या मागणीचा पुनरूच्चार केला. विधानसभा निवडणुकांत नेत्रदीपक यश मिळाल्याबरोबर व मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याअगोदर ते दिल्लीत जाऊन मोदीजींना भेटले. ज्या दिवशी त्यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, त्याच दिवशी मोदींनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. आज अशी स्थिती आहे की, भाजपने स्वबळावरच ३०३ खासदार निवडून आणल्यामुळे त्यांना कोणाच्या पाठिंब्याची गरजच नाही. परिणामी आतापासून राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील घटक पक्षांत चुळबूळ सुरू झाली आहे. अशा स्थितीत जगन रेड्डीसारख्या तरुण मुख्यमंत्र्याचे काय स्थान आहे, हे लवकरच दिसेल.

 

भारतीय व्यवस्थेत होत असलेले हे बदल दूरगामी परिणाम करणारे आहेत. या बदलांच्या संदर्भात काही निरीक्षणं नोंदवणे गरजेचे आहे. तामिळनाडूप्रमाणेच आता आंध्र प्रदेशातही प्रादेशिक पक्षांचे राजकारण स्थिरावले आहे. तेथे आता एका बाजूला चंद्राबाबू नायडू आहेेत, तर दुसरीकडे जगन रेड्डी आहेत. यात भाजप काय किंवा कॉंग्रेस, या दोन्ही राष्ट्रीय पक्षांना काहीही स्थान नाही. त्याचप्रमाणे जसे तामिळनाडूत सूडाचे राजकारण जोरात असते, तसेच आता आंध्र प्रदेशात आकाराला येत आहे. जगन रेड्डींनी सत्ता स्वीकारल्याबरोबर नायडू मुख्यमंत्री असताना दिलेल्या मोठमोठ्या कंत्राटांची चौकशी केली जाईल, असे जाहीर केले आहे. जगन रेड्डींनी नायडू सरकारातील भ्रष्टाचाराची चौकशी करायला सीबीआयला परवानगी दिली आहे. आता नायडूंच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागेल, यात शंका नाही.

 

आज जरी चंद्राबाबू नायडू मागे पडलेले दिसत असले, तरी तसे ते राहणार नाही. राजकारणातले, त्यातही निवडणुकांतले यश पाहिले तर तात्पुरते असते. चंद्राबाबूंचा पक्ष लवकरच या धक्क्यातून बाहेर पडेल, असे विधान कॉंग्रेसबद्दल करता येत नाही. हा पक्ष म्हणजे लकवा मारलेल्या व्यक्तीसारखा आहे. कॉंग्रेसचे पुनरुज्जीवन एवढ्यात होईल, असे वाटत नाही.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@