शिष्य लक्षणे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-May-2019
Total Views |



शिष्य जर अनधिकारी असेल, तर गुरूने केलेला उपदेश वाया जातो. सद्गुरूप्रमाणे शिष्यही सत्शिष्य असेल, तरच पारमार्थिक ज्ञान दिले-घेतले जाईल. गुरूच्या आत्मज्ञानाचा उपदेश पचनी पडण्यासाठी शिष्याने साधन सोडता उपयोगाचे नाही. या ज्ञानाच्या जोडीला ‘सदुपासना सत्कर्म। सत्क्रिया आणि स्वधर्म। सत्संग आणि नित्यनेम।’ हे शिष्याच्या ठिकाणी असतील, तरच आत्मज्ञानाची प्रचिती येईल, नाहीतर शिष्यवर्गात पाखंडीपणा येऊन ढोंगीपणा माजेल.


गुरुबाजी करीत असताना शिष्यांना साधनेस न लावणारे आणि स्वत: विषयलंपट असलेले गुरू अडक्याला तीन मिळाले तरी त्यांना सोडून द्यावे,” असे तुच्छतादर्शक उद्गार समर्थांनी भोंदू गुरूंविषयी काढले आहेत, हे आपण मागील लेखात पाहिले. आत्मप्रचिती, शास्त्रप्रचिती, गुरुप्रचिती यांची खूण जो पटवतो, तो खरा ‘सद्गुरू’ होय. त्यातील आत्मप्रचितीला समर्थ महत्त्व देतात. समर्थांनी दासबोधात साधूची लक्षणे सांगितली आहेत. त्यात त्यांचा उद्देश असा की, त्यावरून श्रोत्यांना सद्गुरूंची ओळख पटावी व योग्य गुरूंची निवड करता यावी. साधूंच्या, सज्जनांच्या संगतीने स्वरूप स्थिती साधते. त्यातून सज्जनांची लक्षणे आपल्या अंगी येऊ लागतात. यासाठी सत्संगतीला महत्त्व आहे. सद्गुरू थोर योग्यतेचा असला पाहिजे हे सांगून झाले. पण, शिष्यही सत्शिष्य असला पाहिजे, हे या समासात (५.३) सांगायचे आहे. येथे स्वामींनी सत्शिष्याचे सविस्तर विवरण केले आहे. शिष्य जर अनधिकारी असेल, तर गुरूने केलेला उपदेश वाया जातो. सद्गुरूप्रमाणे शिष्यही सत्शिष्य असेल, तरच पारमार्थिक ज्ञान दिले-घेतले जाईल. गुरूच्या आत्मज्ञानाचा उपदेश पचनी पडण्यासाठी शिष्याने साधन सोडता उपयोगाचे नाही. या ज्ञानाच्या जोडीला ‘सदुपासना सत्कर्म। सत्क्रिया आणि स्वधर्म। सत्संग आणि नित्यनेम।हे शिष्याच्या ठिकाणी असतील, तरच आत्मज्ञानाची प्रचिती येईल, नाहीतर शिष्यवर्गात पाखंडीपणा येऊन ढोंगीपणा माजेल. असे असले तरी सद्गुरू हा शिष्याच्या अंगी असलेले अवगुण पालटू शकतो. पण, शिष्य चांगला असेल, तर तो वाईट गुरूंचे अवगुण पालटू शकत नाही. त्यामुळे सद्गुरूंवर मोठी जबाबदारी असते. शिष्याला प्रारंभीच्या काळात सत्कर्माकडे वळवणे, त्याला सत्संग, नित्यनेम यांचे महत्त्व पटवून देणे, ही जबाबदारी सद्गुरूंवर असते. अनेक शिष्यांतून ‘लायक शिष्य’ सद्गुरू तयार करतात. ‘लायक शिष्य’ कसा असला पाहिजे, याची अनेक लक्षणे स्वामींनी या समासात सांगितली आहेत. तथापि, सुरुवातीस त्यापैकी दोन प्रमुख लक्षणे सांगितली आहेत. सद्गुरूंची प्रचिती आल्यावर सद्गुरूवचनावर पूर्ण विश्वास आणि सद्गुरूंच्या ठिकाणी पूर्ण शरणागती ही ती दोन लक्षणे होत.

 

मुख्य सच्छिष्याचें लक्षण ।

सद्गुरुवचनीं विश्वास पूर्ण ।

अनन्यभावें शरण । त्या नाव सच्छिष्य ॥

 

शिष्य हा निर्मळ मनाचा, आचारशील, विरक्त, निष्ठावंत असला पाहिजे. त्याचे आचरण पवित्र असले पाहिजे. तो सर्वप्रकारे नियमाने वागणारा असावा. शिष्य हा सततोद्योगी, दक्ष, धैर्यवान, परमार्थाविषयी तत्पर असा असला पाहिजे. तसेच शिष्य हा परोपकारी, निर्मत्सरी असावा. त्याने ग्रंथांचा अभ्यास करताना शब्दाच्या अर्थातील अंतरंगात शिरले पाहिजे. ग्रंथकर्त्याच्या मनातील आशय जाणून त्याचे आकलन त्याने केले पाहिजे. अर्थ न समजता नुसते ग्रंथ वाचणारे आपला वेळ फुकट घालवतात. एखाद्या ग्रंथाच्या आशयाचे आकलन न होता तो ग्रंथ पवित्र आहे, या श्रद्धेने पारायण करणारे शिष्य समर्थांना मान्य नाहीत. शिष्य अतिशय सावध, अतिशय शुद्ध आणि सर्व गुणांनी संपन्न असला पाहिजे. शिष्याच्या अंगी स्वतंत्र विचार करण्याची पात्रता हवी. तसेच तो प्रेमळ भक्त असला पाहिजे. त्याने नीतिमर्यादांचे सदैव पालन केले पाहिजे. शिष्य बुद्धिमान, धाडसी, निश्चयपूर्वक व्रते सांभाळणारा आणि पुण्यशील असला पाहिजे. तो सात्त्विक, भगवंताला भजणारा आणि खरा साधक असला पाहिजे. शिष्य अविवेकी असून चालणार नाही. तसेच तो गर्भश्रीमंत नसावा. कारण, श्रीमंतीत जन्मलेला शिष्य लाडात वाढलेला असतो. कष्टाची त्याला सवय नसते. त्यामुळे आपले सुखासीन जीवन सोडून मायेपलीकडील दिव्य जीवनाची कल्पना करणे त्याला जड जाते. संसारात सुख मानणारा शिष्य नसावा, असे स्वामींनी सांगितले आहे. संसारातील दुःखे ज्याने अनुभवली आहेत, तो परमार्थाकडे लवकर वळतो आणि सद्गुरूंची सेवा करणे त्याला कष्टप्रद वाटत नाही. संसारदुःख अनुभवल्यामुळे त्याच्या अंगी वैराग्य निर्माण होते. तो सद्गुरूला सोडत नाही. सद्गुरूंनी सांगितलेले साधन मनोभावे केल्याने त्याला परमार्थ लवकर साधतो. सद्गुरूंच्या केवळ बाह्यरूपाकडे पाहणाऱ्या शिष्याला सद्गुरूंचे आंतरिक सामर्थ्य समजत नाही. भौतिक वैभव मिळावे या अपेक्षेने जो सद्गुरूंकडे पाहतो, त्याला स्वामींनी ‘करंटा’ म्हटले आहे. वैभवाची इच्छा असल्याने त्याला देव मोठा वाटतो. त्याला वाटत असते की, देवाकडून आपल्याला सांपत्तिक वैभव प्राप्त होईल. देव हा सद्गुरूंपेक्षा श्रेष्ठ आहे, असे तो मानतो. स्वामींच्या मते, हे करंटेपणाचे लक्षण आहे.

 

सद्गुरुहून देव मोठा ।

जयास वाटे तो करंटा ।

सुटला वैभवाचा फाटा । सामर्थ्यपिसे ॥

 

वैभवाचे, सामर्थ्याचे वेड लागल्याने त्याला सद्गुरूंचे महत्त्व समजत नाही. खरं म्हटलं, तर देव आणि सद्गुरू यांची अशी तुलना करणे बरोबर नाही. स्वामींच्या मते, जो त्यांची बरोबरी दाखवण्याचा प्रयत्न करतो, त्या शिष्याला समजले नाही असे म्हणता येईल. सद्गुरूंचे महत्त्व, श्रेष्ठत्व स्वामींनी तार्किक पद्धतीने सिद्ध करून दाखवले आहे. तसे पाहिले, तर माणूस आपल्या कल्पनेने देव तयार करतो. आपल्याला आवडतात तशी वस्त्रे, दागिने, हार कल्पनेने देवाच्या ठिकाणी पाहतो. त्यानंतर मंत्रांच्या सामर्थ्याने त्याला देवपण येते. परंतु, त्या देवालासुद्धा सद्गुरूंची कल्पना करता येत नाही. त्यामुळे सद्गुरू हे देवापेक्षा ‘कोटीगुणे’ श्रेष्ठ आहे. सद्गुरूंचे कल्पनातित स्वरूप वर्णन करताना वेदांमध्येसुद्धा भांडणे लागली आहेत.

 

म्हणोनि सद्गुरु पूर्णपणे ।

देवाहून अधिक कोटीगुणे ।

जयासि वर्णितां भांडणे ।

वेदशास्त्रीं लागलीं ॥ (५.३.४५)

 

देव आणि हा सारा विश्वाचा पसारा मायेत येतो. तथापि सद्गुरूंचे स्वरूप मायातीत म्हणजे मायेच्या पलीकडे असते. सद्गुरूस्वरूपाला मायेचा स्पर्श होत नाही. ‘हरिहरादी देव कल्पान्ती’ नाहीसे होणारे आहेत. परंतु, सद्गुरू हा परब्रह्मस्वरूपाने नित्य असतो. यानंतर समर्थांनी ‘असत्शिष्या’चेही वर्णन केले आहे. स्वामींची भूमिका लोकशिक्षकाची असल्याचे मागे सांगितले आहे. त्यामुळे एखाद्या विषयाच्या दोन्ही बाजू शिक्षक जसा विद्यार्थ्यांना समजावून सांगतो, तसे स्वामींचे विवेचन असते. मागे ‘सत्शिष्या’ची लक्षणे सांगितली. आता ‘असत्शिष्य’ कसा असतो ते ऐका. ज्याच्या ठिकाणी गुरूंविषयी सद्भाव नाही, तो ढोंगी आणि वेषधारी ‘असत्शिष्य’ आहे, असे स्वामी म्हणतात. ‘शिष्य’ म्हणवून घेणाऱ्या या लोकांना मनातून विषयाची आसक्ती असते. पण, लौकिकासाठी ते आपण परमार्थी असल्याचे ‘ढोंग’ करीत असतात. हे पढतमूर्ख वरवर सद्गुरूंना साष्टांग नमस्कार घालून त्याला शरण गेल्याचा देखावा लोकांना दाखवण्यासाठी करतात. परंतु, त्यांच्या ठिकाणी वैषयिकवृत्ती पुरेपूर भरलेली असते. संसारात ते पूर्णपणे अडकलेले असतात. अशांचा परमार्थ वैषयिकवृत्तीमुळे मलीन झालेला असतो. अशा ‘कुटुंबकाबाडी’ असलेल्यांचा परमार्थ दिखाऊ स्वरूपाचा असतो. त्यांचे खरे सुखप्रपंचात असल्याने परमार्थ हा त्यांच्या दृष्टीने विनोद होतो. केवळ करमणुकीसाठी स्वत:चे महत्त्व वाढविण्यासाठी ते परमार्थ करतात. स्वामींना अशा ढोंगी लोकांचा तिटकारा आहे. स्वामी पुढे सांगतात, “अशा पढतमूर्ख भोंदू शिष्यांना परमार्थ सांगणे म्हणजे उकिरड्यात लोळणाऱ्या गाढवाला सुगंधी परिमळ द्रव्ये द्यावी किंवा डुकराला सुगंधी लेप लावावा अथवा रेड्याला चंदनाचा लेप लावण्यासारखे आहे. यांना परमार्थ गोडी काय कळणार? कुत्र्याला जसे तोंड वर करून हाडे चघळण्यात आनंद वाटतो, तसा या इंद्रियाधीन माणसांना इंद्रियभोग एवढाच आनंद असतो. इंद्रियसुखासाठी ते बेचैन असतात. असा इंद्रियासक्त माणूस वाटेल ते ज्ञान म्हणून बडबडत असतो.”

 

काखे घेऊनिया दारा ।

म्हणे मन संन्यासी करा ।

तैसा विषयी सैरावैरा । ज्ञान बडबडी ॥

 

अशा या ‘असत्शिष्यां’ना ‘सत्शिष्य’ होता येईल का? त्यासाठी काही उपाय आहे का? हो! आहे त्यावर उपाय आहे. त्यांनी पश्चाताप दग्ध होऊन आपल्या गुरूंना मनापासून शरण जावे. अशावेळी गुरू कृपा करतात. या ‘असत्शिष्यां’तही पालट होऊन ते परमार्थ ज्ञानासाठी तयार होतात. सामान्य माणसांना स्वामी संसार सोडायला सांगत नाहीत. स्वामी सांगतात, “प्रपंच सुखाने करावा हे खरे, पण त्याचबरोबर परमार्थाविषयी काहीतरी विचार केला पाहिजे. परमार्थ पूर्णपणे सोडून द्यावा, हे मात्र चुकीचे आहे.”

 

प्रपंच सुखे करावा ।

परी कांहीं परमार्थ वाढवावा ।

परमार्थ अवघाचि बुडवावा ।

हे विहित नव्हे ॥ (५.३.१०३)

 

- सुरेश जाखडी

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@