सद्गुरू लक्षण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-May-2019
Total Views |



 


सामान्य माणसे या भोंदूगुरूच्या संभाषण चातुर्याला फसतात आणि त्याला आध्यात्मिक गुरू समजू लागतात. याची समर्थांना कल्पना होती. त्यामुळे सद्गुरूची लक्षणे सांगण्याअगोदर गुरू कसा नसावा, हे समर्थांनी स्पष्ट केले आहे.

 

स्वधर्मकर्मी पूज्य ब्राह्मण’ ही समर्थकालीन लोकांची मानसिकता स्वामींनी सांगितली खरी, पण त्यापुढे स्पष्ट करून सांगितले की, असे असले तरी ब्रह्मज्ञान हे सद्गुरूवाचून मिळणे अशक्य आहे. ब्रह्मज्ञान देणे हे स्वधर्मकर्म करणाऱ्या ब्राह्मणाचे काम नाही. तसेच कार्तिकस्नानादी व्रते, जपजाप्य, तीर्थाटणे, उपास, यज्ञयाग करून ब्रह्मज्ञान प्राप्त होत नाही. अगदी 14 विद्यांचा अभ्यास कला, काही सिद्धी प्राप्त झाल्या तरी सद्गुरूकृपेशिवाय तुमचे हित होणार नाही, ब्रह्मज्ञानाची प्राप्ती होणार नाही. सद्गुरूच तुमचे हित जाणतो, दुसरा कोणी नाही, अशा शब्दांत समर्थांनी ‘गुरूनिश्चय’ सांगितला. तो आपण मागील लेखात पाहिला. आजच्या विज्ञानयुगात आपल्या मनात येते की, ग्रंथ, पुस्तके वाचून आपल्याला ब्रह्म समजू शकेल का? कदाचित असाच विचार स्वामींच्याही मनात आला असावा. म्हणून त्यांनी दासबोधात पुढे दशक 12 मध्ये सांगितले आहे की, नुसत्या पुस्तकीज्ञानाने ब्रह्मज्ञान होणार नाही. त्यासाठी सद्गुरू पाहिजे. ब्रह्मज्ञान हे प्रत्ययाचे ज्ञान आहे. ज्याला प्रचितीने हे ज्ञान प्राप्त झाले आहे, असा सद्गुरू परमात्म स्वरूपाचा अनुभव आपल्याला देऊ शकतो. पुस्तकीज्ञान हे फसवे असते. ते परमात्मस्वरूपाचा अनुभव देऊ शकत नाही.

 

पुस्तकज्ञाने निश्चये धरणें ।

तरी गुरू कासया करणें ।

याकारणें विवरणें ।

आपुल्या प्रत्यये ॥ (12.6.30)

 

समर्थांची भूमिका ही लोकशिक्षकाची असल्याने प्रत्येक गोष्ट बारकाव्यांनिशी कशी समजावून सांगायची, हे स्वामींना माहीत होते. समर्थ सांगतात, पूर्वीच्या काळी मोठमोठे संत, महात्मे, मुनिश्रेष्ठ होऊन गेले. पण, त्यांनाही आत्मज्ञानाचा विचार सद्गुरूकडून प्राप्त झाला. श्रीराम, श्रीकृष्ण वगैरे अवतारी पुरुष होऊन गेले. त्यांनीही मनापासून सद्गुरूंची सेवा केली आहे. हे विश्व चालवणारे ब्रह्मा, विष्णू, महेश हेसुद्धा सद्गुरूचरणी लीन होतात, तेथे ते आपले महत्त्व सांगत नाहीत.

 

सकळ सृष्टीचे चाळक । हरिहरब्रह्मादिक ।

तेही सद्गुरुपदी रंक । महत्त्वा न चढेती ॥ (दा. 5.1.43)

 

याप्रकारे ‘गुरूनिश्चय’ तर झाला, पण खऱ्या गुरूची, सद्गुरूची लक्षणे समजली, तर त्याला ओळखणे सोपे जाईल. सद्गुरूची लक्षणे सांगण्याअगोदर स्वामींनी ज्ञानाची महती सांगितली आहे.

 

ज्ञानाची उपासना सातत्याने चालू राहणे हे विकसित समाजाचे लक्षण आहे. ज्या समाजात ही ज्ञानाची परंपरा सांभाळली जाते तो समाज प्रगतिपथावर आहे, असे समजले जाते. गीतेतही भगवंतांनी ज्ञानाचे महत्त्व सांगितले आहे. ‘न हि ज्ञानेन पवित्रमिह विद्यते । (4.38)’ ज्ञानासारखे दुसरे पवित्र काही नाही. पाश्चात्य देशात विज्ञानाची, तर्क विचारांची ज्ञानोपासना करणारे वेगवेगळे वर्ग होते. तेथे ज्ञानाची उपासना सांघिकदृष्ट्या केली जात असे. त्यांना 'school of thoughts’ म्हणून ओळखले जाते. त्यातूनच सॉक्रेटिस, प्लुटो, अ‍ॅरिस्टॉटल, गॅलिलिओ यांच्यासारखे विचारवंत, शास्त्रज्ञ निर्माण झाले. वैचारिक ज्ञानाची परंपरा त्यांनी चालवली. आपल्याकडेही अशीच अध्यात्मज्ञानाची संघटित उपासना पूर्वापार चालत आलेली आहे. भारद्वाज, सत्यकाम, गार्ग्य इ. ऋषींनी एकत्र येऊन पिप्पलाद मुनींचे शिष्यत्व पत्करून त्यांच्याकडून ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेतले. असं म्हणतात की, गुरूंच्या सांगण्यावरून त्या शिष्यांनी वर्षभर ब्रह्मचर्य, तप, श्रद्धा यांचे आचरण केले. त्यानंतर पिप्पलाद मुनींनी त्यांना ब्रह्मज्ञान दिले. भारतीय तत्त्वज्ञानाची, ब्रह्मज्ञानाची परंपरा फार जुनी आहे. ब्रह्मज्ञान हे सूक्ष्मातिसूक्ष्म ज्ञान असल्याने जे ज्या गुरूपाशी आहे, त्याला ओळखणे फार कठीण काम आहे. लोकांनी सांगितले म्हणून नव्हे, तर आपल्याला गुरूची प्रचिती आली पाहिजे. पण, असे होत नाही. जमावाच्या मानसशास्त्रानुसार, एखाद्या गुरूकडे अनेक माणसे जात असतील, तर आपणही फारसा विचार न करता त्या गुरूकडे धाव घेतो. त्यामुळे अध्यात्मक्षेत्रात भोंदू गुरूंचे फावते. सामान्य माणसे या भोंदूगुरूच्या संभाषण चातुर्याला फसतात आणि त्याला आध्यात्मिक गुरू समजू लागतात. याची समर्थांना कल्पना होती. त्यामुळे सद्गुरूची लक्षणे सांगण्याअगोदर गुरू कसा नसावा, हे समर्थांनी स्पष्ट केले आहे.

 

साधारणपणे लोक अनेकांचा ‘गुरू’ म्हणून उल्लेख करतात. काही लोक अनेक करामती करतात. लोक त्यांना ‘गुरू’ म्हणतात. पण, ते मोक्षदाते ‘सद्गुरू’ होऊ शकत नाहीत. काही लोक संगीत, नृत्य इ. कलाक्षेत्रात शिष्यांना संगीत, रागज्ञान, ताळज्ञान, नृत्यप्रकार, वाद्य वाजवायला शिकवतात. त्यांना ‘गुरू’ म्हणण्याची प्रथा आहे. काही जातींचे व्यवसाय असतात. ती विद्या ते इतरांना शिकवतात, त्यांनाही ‘गुरू’ म्हणतात. पण, ते सद्गुरू नव्हेत. आपले आई-वडील गुरूस्थानी असतात. पण, ते मोक्षदाते ‘गुरू’ नव्हेत. हे सांगून झाल्यावर स्वामींनी ‘सद्गुरू’ कसे असतात, हे सांगायला सुरुवात केली. शिष्याचे पारमार्थिक अज्ञान नाहीसे करून त्याला ब्रह्मज्ञान देण्याचे सामर्थ्य सद्गुरूपाशी असते. ब्रह्मज्ञानाचा उपदेश करून शिष्याचा अज्ञान अंधकार नाहीसा करून त्याचे परमात्म्याशी ऐक्य घडवणे हे सद्गुरूचे प्रधान लक्षण आहे. मग त्या सद्गुरूच्या अंगी सिद्धी नसल्या तरी चालतील. एखाद्या माणसाजवळ सर्व सिद्धी असूनही तो शिष्याचे परमात्मस्वरूपाशी ऐक्य साधण्याचे ज्ञान देत नसेल, तर त्याला ‘सद्गुरू’ म्हणता येणार नाही. वेदांच्या अंतरंगात उपनिषिदांमध्ये जे ब्रह्मज्ञान मिसळून गेलेले आहे, त्यातील योग्य ते अर्थान्तरण काढून लहान मुलाला जसा एकेक घास भरवला जातो, तसे सद्गुरू शिष्याला हळूहळू ज्ञान देत असतात. या प्रक्रियेत सद्गुरू नेमके काय करतात, याचे सुंदर वर्णन स्वामींनी दासबोधात केले आहे. सामान्य माणसे मायेच्या जाळ्यात अडकलेली असतात. देहबुद्धीमुळे आपण अनेक ठिकाणी ममत्व ठेवतो व त्यातच गुंतत जातो. भोवतालच्या गोष्टींचे, नात्यांचे ममत्व सोडवत नाही. त्यामुळे अनेक प्रकारची दुःखेभोगावी लागतात, तरीही आपण ते सोडत नाही. अशावेळी सद्गुरू आपल्या मदतीला येतात. ते प्रपंच सोडायला सांगत नाहीत. चार लोक प्रपंचात वागतात, तसेच आपण वागायचे असते. परंतु, अंतरंगात खरे सार ओळखल्याने असार गोष्टींतून उत्पन्न होणारे दुःख आपण दूर ठेवू शकतो. ते दुःख अंतरंगात न पोहोचू देण्याची युक्ती सद्गुरू शिकवतात व त्याच्या उपासनेत साधनेत व्यत्यय येऊ न देता शिष्याला परमात्मस्वरूप ओळखण्यासाठी तयार करतात. सामान्य माणसे वासनारूपी नदीच्या महापुरात गटांगळ्या खात असतात. अगदी बुडण्याच्या बेतात ते वाचवण्यासाठी मदत मागतात. अशावेळी सद्गुरू त्या महापुरात उडी घालून शिष्याला वाचवतात.

 

वासनानदी माहांपुरीं ।

प्राणी बुडतां ग्लांती करी ।

तेथ उडी घालूनि तारी । तो सद्गुरू जाणावा ॥ (दा. 5.2.13)

 

शिष्याच्या मानसिक अवस्थेत बदल घडवून आणण्याचे सामर्थ्य सद्गुरूच्या शब्दांत असते. शिष्याच्या मनातील संशय सद्गुरू आपल्या शब्दांनी दूर करतात. खरा सद्गुरू आपल्या शिष्याला इंद्रिये ताब्यात ठेवून साधनात कसे राहावे, हे शिकवित असतो. स्वामी पुढे सांगतात की, आत्मज्ञान हे सूक्ष्मातिसूक्ष्म असल्याने अमूक एक लक्षण सद्गुरूचे आहे, असे सांगता येत नाही. याच गोष्टीचा फायदा आजच्या शतकातही भोंदू गुरू घेताना दिसतात. आताचे युग विज्ञाननिष्ठ व बुद्धिवादाचे असूनही गेल्या तीन-चार वर्षांत या भोंदू गुरूंची अनेक प्रकरणे उघडकीस आली आहेत. त्यापैकी काही गजाआड तुरुंगात जीवन कंठीत आहेत. त्यासाठी सद्गुरू निवडण्यापूर्वी तो काय करतो, त्याचे चारित्र्य कसे आहे, तो कशा प्रकारचा उपदेश करतो हे पाहणे महत्त्वाचे आहे. जर तो शिष्यांना इंद्रियदमन शिकवत नसेल, शिष्याला काही साधन लावून देत नसेल, तर असा गुरू काय कामाचा? फुकट मिळाला तरी करू नये.

 

शिष्यास न लाविती साधन ।

न करविती इंद्रिये दमन ।

ऐसे गुरू अडक्याचे तीन ।

मिळाले तरी त्यजावे ॥ (दा. 5.2.21)

 

असे द्रव्याने विकले गेलेले, शिष्यांच्याच आहारी गेलेले, शिष्यांना साधनेला न लावणारे दीडदमडीचे गुरू ओळखून त्यांच्यापासून दूर राहावे. शेवटी श्रोत्यांसाठी सद्गुरूचे थोडक्यात लक्षण स्वामींनी सांगितले आहे. ते त्यांच्याच शब्दांत पाहा-

 

मुख्य सद्गुरूचे लक्षण ।

आधी पाहिजे विमळ ज्ञान ।

निश्चयाचे समाधान ।

स्वरूपस्थिती ॥ (दा. 5.2.45)

म्हणोनि नवविधा भजन ।

जेथे प्रतिष्ठिले साधन ।

हे सद्गुरूचे लक्षण ।

श्रोती ओळखावे ॥ (दा. 5.2.49)

 
 - सुरेश जाखडी

7738778322 

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@