अमेरिका-इराण संघर्षाला नवे वळण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Apr-2019   
Total Views |



जगाने महायुद्धे तसेच शीतयुद्धे अनुभवली आहेत. त्यामध्ये अमेरिका आणि इराणचा संघर्ष हा कोणत्या वळणावर जगाला नेईल, हा चिंतेचा विषय आहे.

 

जग कुटुंबाच्या भूमिकेत आहे. त्यामुळे कुणीही कुणाला त्रास देऊ नये, कुणीही कुणावर हुकूमत गाजवू नये, यासाठी जगभर सर्वच देश सातत्याने चर्चा-संवाद आणि करार करत असतात. त्या अनुषंगाने देशादेशातील सीमा, दहशतवाद, पर्यावरण, प्रदूषण आणि मानवी हक्क हे विषय सातत्याने केंद्रस्थानी असतात. मात्र, तरीही याच विषयांवरून मतभेद होऊन गटतट पडून जगाचे विभाजन होत आहे. त्यातच आता ‘इस्लामिक रिव्हॉल्युशनरी गार्ड कॉर्प्स’ या इराणच्या सैन्य बलाच्या शाखेला अमेरिकेने ‘दहशतवादी संघटना’ म्हणून घोषित केले. अर्थात, इराणनेही यावर आक्रमक भूमिका घेत अमेरिकेला ‘दहशतवाद माजविणारा देश’ म्हणून घोषित केले आहे. त्याचबरोबर अमेरिकेच्या सैन्य दलालाही ‘दहशतवादी संघटना’ घोषित केले आहे. अमेरिकेशी कोणत्याही तुलनेत समानता नसतानाही इराणने अमेरिकेला आव्हानच दिले आहे.

 

अमेरिकेने इराणच्या ‘इस्लामिक रिव्हॉल्युशनरी गार्ड कॉर्प्स’ला दहशतवादी का ठरवले असेल? आणि त्याला तसेच प्रत्युत्तर इराणनेही कसे दिले, यालाही अनेक कारणे आहेत. इराणी क्रांतीनंतर १९७९ सालच्या एप्रिलमध्ये अयातुल्ला खोमेनी यांनी इराणमध्येइस्लामिक रिव्हॉल्युशनरी गार्ड कॉर्प्स’ या संघटनेची निर्मिती केली. ही संघटना इराणी सैन्य दलाचा एक सर्वोच्च भाग आहे. अर्थात, सैन्य दलाचा भाग असला तरी या ‘गार्ड कॉर्प्स’वर इराणी धर्मगुरूही अंमल राखून आहेत. जगाच्या नकाशावर ‘इसिस’च्या दहशतीची काळी छाया आहे. इराणनेही ‘इसिस’च्या दहशतवादाची क्रूरता अनुभवली आहे. ‘इसिस’च्या अतिरेक्यांनी २0१७ साली इराणच्या संसदेवर हल्ला केला होता. त्याला प्रत्युत्तर म्हणून इराणच्या ‘इस्लामिक रिव्हॉल्युशनरी गार्ड कॉर्प्स’ने सीरियामध्ये ‘इसिस’च्या दहशतवादी तळावर थेट मिसाईल टाकले होते. त्यावेळी मोठ्या प्रमाणातदहशतवादी मृत्यू पावले, असेही इराणने घोषित केले होते. नेमके याचवेळी अमेरिकाही ‘इसिस’च्या तळावर हल्ले करत होती. त्यातच इराणनेही आपले शौर्य दाखवत ‘इसिस’ने इराणवर केलेल्या हल्ल्याचा बदला घेतला. इतकेच नव्हे, तर इराणने स्पष्ट केले की, यापुढे ‘इसिस’ असू दे की, आणखी कोणी जे इराण आणि इराणी नागरिकांना त्रास देतील, त्यांना अशाच प्रकारे मृत्यू दिला जाईल. ही तर सुरुवात होती. या प्रकरणाने अमेरिका आणि इराण एकमेकांसमोर उभे ठाकले.

 

पण, त्याही आधी इराण आणि अमेरिकेमध्ये धुसफूस सुरूच होती. त्याला कारण होते, अमेरिकेचे निर्बंध धुडकावत २0१६ साली इराणच्या ‘इस्लामिक रिव्हॉल्युशनरी गार्ड कॉर्प्स’ने बॅलिस्टिक मिसाईलची चाचणी केली. अमेरिकेच्या मते, इराणने या मिसाईलची चाचणी करून संयुक्त राष्ट्रसंघाचा परमाणू करार मोडला. इराणने नियमाचे उल्लंघन केले, तर यावर इराणचे म्हणणे होते की, कोणत्याही नियमाचे उल्लंघन करण्यासाठी नाही, तर इराण हा देशही स्वतःचे रक्षण करण्यास सिद्ध आहे, हे पाहण्यासाठी ही चाचणी करण्यात आली. मात्र, या घटनेनंतर सातत्याने अमेरिका आणि इराणमध्ये आंतरिक संघर्ष वाढत होता. सीरिया, बहारीन, सौदी अरेबिया, इस्रायल वगैरे देशांमध्ये इराणमुळे तणाव वाढत असून दहशतवादाचा खात्मा करण्याच्या नावाने इराण या देशांमध्ये असुरक्षितता निर्माण करतो, असे अमेरिकेचे मत आहे. इतकेच नव्हे, तर इराण या सर्व कारवायांसाठी ‘इस्लामिक रिव्हॉल्युशनरी गार्ड कॉर्प्स’ची मदत घेतो. ही संघटना दहशतवादाला खतपाणी घालते, आर्थिक रसद पुरवते, असेही आरोप अमेरिकेने केले आहेत. आपल्या बोलण्याला पुष्टी देण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प म्हणाले, “आयआयजीएस’ असे लघुनाम लावणारी ‘इस्लामिक रिव्हॉल्युशनरी गार्ड कॉर्प्स’ म्हणजे प्रत्यक्षात ‘इम्प्लिमेंटिंग इट्स ग्लोबल टेररिस्ट कॅम्पेन’ आहे असे म्हटले, तर अमेरिकेच्या विदेश मंत्री माईक पॉम्पिओ यांनी स्पष्ट धमकीवजा सूचना दिली आहे की, “जगभरातील बँकांनी आपले व्यवहार करताना लक्षात ठेवावे की, त्यांचे व्यवहार अशा कोणत्याही संघटना, संस्था वा व्यक्तीशी नसावेत, जे दुरूनही ‘इस्लामिक रिव्हॉल्युशनरी गार्ड कॉर्प्स’शी संबंधित असतील. तसे असेल तर त्याचे परिणाम भोगावे लागतील. जगभरात अमेरिका आणि इराण या दोन्ही देशांनी घेतलेल्या भूमिकेमुळे जगभर अस्वस्थता पसरली आहे. कारण, जगाने महायुद्धे तसेच शीतयुद्धे अनुभवली आहेत. त्यामध्ये अमेरिका आणि इराणचा संघर्ष हा कोणत्या वळणावर जगाला नेईल, हा चिंतेचा विषय आहे.



माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@