जागतिक धम्म परिषद

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Dec-2019   
Total Views |
page 8 8 _1  H


दि. २२ नोव्हेंबर ते २४ नोव्हेंबर रोजी पीईएस मिलिंद कॉलेज स्टेडियम, नागसेनवन, औरंगाबाद येथे जागतिक धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी परिषदेचे उद्घाटन श्रीलंकेचे बुद्ध धर्मगुरू महानायक थेरो यांच्या हस्ते झाले, तर परिषदेला विशेष उपस्थिती आणि आशीर्वाद लाभला तो जागतिक बौद्ध धर्मगुरू दलाई लामा यांचा. ही परिषद शेकडो धम्म उपासकांच्या सहकार्याने सनदी अधिकारी डॉ. हर्षदीप कांबळे आणि धम्मउपासिका रोजना व्हॅनीच कांबळे यांनी आयोजित केली हेाती. या धम्म परिषदेचा हा इतिवृत्तांत...

 

अहिंसा, प्रज्ञा, शील, करूणा आणि मैत्री हे बुद्धाचे तत्त्वज्ञान आज सर्व जग मान्य करीत आहे. संपूर्ण आशिया खंडात बौद्ध धम्म झपाट्याने रूजला असून बुद्ध म्हणजे 'आशिया खंडाचा प्रकाश' असे म्हटले जाते, ते उगीच नाही. तुम्ही आधी स्वत: धम्माची पारख करा. परस्परांविषयी प्रेम बाळगा. सर्वधर्मसमभावानुसार आपण चालले पाहिजे. भारत देश याचे एक उत्तम उदाहरण आहे. आपण २१व्या शतकातील बौद्ध बनले पाहिजे. दोन प्रकारचे धम्म अनुयायी असतात. एक 'श्रद्धा अनुयायी' आणि एक 'प्रज्ञा अनुयायी.' 'श्रद्धा अनुयायां'मुळे 'बुद्धशासन' फार काळ चालणार नाही. मात्र, 'प्रज्ञा अनुयायां'मुळे ते चिरकाल टिकेल. मी सांगतो म्हणून धम्माचे अनुयायी बनू नका.

 

सोनार ज्या प्रकारे सोन्याची परीक्षा करतो, त्याप्रमाणे धम्माचीही अगोदर परीक्षा घ्या व मगच तो स्वीकारा. श्रद्धेपोटी धम्म मानू नका. ज्ञानाच्या आधारावर धम्माचे अनुकरण करा. जेव्हा तुम्ही बुद्धांसमोर नतमस्तक होता, त्यांचे दर्शन घेता, तेव्हा बुद्धांना शिक्षकाच्या रूपात बघा. त्यांनी दिलेल्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करा. २४ नोव्हेंबरला सकाळी १० ते ११.३० या दरम्यान दलाई लामा यांचे बुद्धांनी दिलेल्या प्रेम, शांती, प्रज्ञा, शील, करुणा, अहिंसा, सामाजिक बंधुभाव या सर्वोच्च जीवनमूल्यांवर आधारित प्रवचन झाले. त्या प्रवचनामध्ये त्यांचे अमृतविचार ऐकायला मिळाले. नागसेनवनातल्या मिलिंद महाविद्यालयाच्या भव्य मैदानामध्ये लोकांची इतकी गर्दी की मुंगी शिरायलाही वाव नाही. समोर जगभरातील बौद्ध धर्मगुरू व्यासपीठावर आणि त्यामध्ये सुवर्णकांती असलेले जागतिक बुद्ध धर्मगुरू दलाई लामा. रणरणत्या उन्हात लामांचे शब्द, त्यांचे विचार, शीतल चांदण्यांचा समानच भासत होते.
 

परिषद होती नागसेनवनात. मात्र, परिषदेच्या निमित्ताने आपल्या घरी कार्य असल्यासारखे सगळे औरंगाबाद उत्साहात. पोलीस प्रशासन, वाहतूक व्यवस्था, शहराची स्वच्छता पाहणारा विभाग सगळे अगदी 'अप टू डेट' होते. या परिषदेची प्रसिद्धी इतकी की, औरंगाबाद बस आगार किंवा रेल्वे स्थानकावर उतरल्या उतरल्या प्रत्येक रिक्षावाला अगत्याने येऊन विचारे, 'धम्म परिषद जाना क्या?' शहरात धम्म परिषद आहे आणि त्यानिमित्ताने भव्य आयोजन केलेले आहे, हे शहरातील सर्वांनाच माहिती होते. त्या परिषदेला जाणार्‍यांना काही त्रास होऊ नये म्हणून औरंगाबादकर एक दिलाने एकत्र आले होते.

 

ही परिषद औरंगाबाद शहरातच का भरवली गेली? याबाबत या परिषदेचे आयोजक सनदी अधिकारी हर्षदीप कांबळे म्हणाले की, "औरंगाबाद हे ऐतिहासिकदृष्ट्या 'बुद्धिस्ट' शहर राहिलेले आहे. वाकाटक, सातवाहनाच्या काळापासून धम्माच्या संबंधित गोष्टी या परिसरात आढळून येतात. पैठणलादेखील याचे इतिहासकालीन पुरावे मिळतात. औरंगाबाद परिसरात बुद्ध धम्माचे प्रशिक्षण केंद्र होते. आता 'लोकुत्तरा' हे प्रशिक्षण केंद्र आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची औरंगाबाद ही कर्मभूमी राहिलेली आहे. त्यांनी मिलिंद महाविद्यालयाची स्थापना सर्वांसाठी केली. औरंगाबाद शहर हे आंतरराष्ट्रीयस्तरावरदेखील प्रसिद्ध शहर आहे. बुद्धांचे विचार व औरंगाबाद याचे नाते आहे. बुद्धांचे विचार हे मानव जातीच्या कल्याणाचे विचार आहेत. त्यामुळे अखिल भारतीय भिक्खू संघाबरोबर चर्चा करूनच जागतिक परिषदेसाठी औरंगाबादची निवड केली.

 

एक महिन्यापासून नियोजन सुरू होते. प्रत्येक विहारात संपर्क केला गेला होता, सर्व संबंधितांशी चर्चा केली. या परिषदेसाठी एक हजार महिला धम्मसेविकांनी काम केले. परिषदेसाठी बाहेरगावहून मोठ्या प्रमाणात लोक आले. त्यांची व्यवस्था औरंगाबादमधील सामाजिक, राजकीय क्षेत्रात काम करणार्‍या व्यक्तींनी केली. याच व्यक्तींच्या माध्यमातून ६० गाड्यांची व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे वाहन व्यवस्था बाहेरून उभी करण्याची गरज पडली नाही. बाहेरून येणार्‍या भिक्खूंची निवास व्यवस्था शहरातील १८ विहारांमध्ये करण्यात आली हेाती. परिषदेच्या तयारीसाठी दीड हजार जणांच्या चमूने अहोरात्र मेहनत घेतली. परिषदेच्या सुरक्षा व्यवस्थेसाठी तरुणाईने सेवेची आणि शिस्तीची पराकाष्ठा केली. अत्यंत प्रसन्न हास्य चेहर्‍यावर ठेवत ही तरुणाई सुरक्षा व्यवस्थेत, सेवा व्यवस्थेत गर्क होती.

 

व्यासपीठासमोरील मैदान खचून भरले होते. मुंगी शिरायलाही वाव नव्हता. पण, समोर बसलेले लाखो बांधव शांत आणि एकाग्र. कुठेही गोंधळ नाही की गडबड नाही. याचेही श्रेय या सुरक्षा रक्षकांनाच. मध्येच एखादा गट प्रतिबंधित ठिकाणी जाण्याचा तुफान प्रयत्न करत होता. त्यावेळी हे तरुण-तरुणी त्यांना हात जोडून थांबवत. अत्यंत मधाळ आवाजात नम्रपणे म्हणत, "तुम्हाला त्रास होतोय समजते आहे, पण माफ करा. आपण नाही जाऊ शकत तिकडे." पुढे जाण्यासाठी हमरीतुमरीवर येणारा किंवा काकुळतीने बोलणारा तो गट मग शांतच होई आणि मागे जाई. तळपत्या उन्हात उत्साहात उभे राहून इतकी शांतता, नम्रता बाळगणारे तरुण-तरुणी दया, शांती, करूणा, संदेश देणार्‍या बुद्धाच्या धम्म परिषदेमध्येच होती, हेसुद्धा या परिषदेचे फलित.

 

त्यापैकी काही युवांशी संवाद साधला. हे तरुण-तरुणी शहरातील महाविद्यालयातील विद्यार्थी. शहरामध्ये जागतिक बौद्ध धम्मगुरू दलाई लामा येणार, तसेच जागतिक धम्म परिषद होणार ही अपूर्वाई होती. या अपूर्वाईचे साक्षीदार होण्यासाठी, दलाई लामांना 'याची देही याची डोळा' पाहण्यासाठी हे सारे जण आले होते. त्यांचे म्हणणे हेसुद्धा धम्माचे काम आहे. कारण, परिषदेला जनसागर उसळणार. त्यांच्या येण्याजाण्याची व्यवस्था, गर्दीमुळे काही वावगे होऊ नये याची काळजी शहरातील तरुण म्हणून आम्ही घेतली. या परिषदेच्या आयोजकांनी शहरातील महाविद्यालयांशी संपर्क साधला होता. परिषदेसंबंधी माहिती दिली होती. ज्यांना स्वेच्छेने या परिषदेमध्ये सेवाकार्य सहभाग करायचा असेल, त्यांना आमंत्रित केले होते. आनंदाची गोष्ट म्हणजे शहरातील महाविद्यालयातील अनेक तरुणतरुणींनी सहभाग घेतला.

 

एकंदर परिषद यशस्वी झाली होती. याबद्दल परिषदेच्या आयोजनामध्ये सहभागी असलेले डॉ. अरविंद गायकवाड म्हणतात की, "असंख्य नकारात्मक प्रश्नांवर आणि मानसिक सुखापासून ते जगाच्या एकूणच कल्याणासाठी धम्मचिंतनाशिवाय पर्याय नाही आणि भगवान गौतम बुद्धांच्या धम्माचे चिंतन रुजवण्यासाठी व धम्मचिंतनाच्या व्यापक प्रचार-प्रसारासाठीच शहरात आंतरराष्ट्रीय धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. मुळात धम्मचिंतन हे कोण्या एका समुदायासाठी किंवा ठराविक वर्गासाठी नसून ते वैश्विक आहे आणि त्यामुळेच ही परिषदही कोणत्याही ठराविक वर्गासाठी नाही. ज्यांना ज्यांना विश्वाचे कल्याण व्हावे वाटते, शांतता नांदावी वाटते, अशा सर्वांसाठी ही परिषद होती आणि त्यामुळेच या परिषदेत सर्व उत्स्फूर्तपणे सहभागी झाले आणि परिषद यशस्वी झाली."

 

या परिषदेचे आयोजक हर्षदीप कांबळे यांच्या मते, "गौतम बुद्धांचे विचार खूप अवघड आहेत असे वाटते. हे विचार समजून सांगण्यासाठी विदेशातून दहा विचारवंत आले. बुद्धांचे विचार समजून घेऊन ते आचरणात आणले पाहिजेत, यावर परिषदेने भर दिला. या परिषदेला धर्मगुरू दलाई लामांचे मार्गदर्शन लाभले, आशीर्वाद मिळाले ही खूप मोठी गोष्ट आहे. दलाई लामांनी जे मार्गदर्शन केले, त्यामुळे बुद्धांचा विचार समजलेला व्यक्ती प्रबुद्ध होईल, तो आपला परिवार प्रबुद्ध घडवेल. परिवार प्रबुद्ध झाल्यावर भारत प्रबुद्ध घडेल. चांगल्या आचरणाची सुरुवात झाली तरी या परिषदेला यश मिळाले असे मी मानतो. चांगल्या आचरणाचा संदेशच अभिप्रेत आहे." अजिंठा महामार्गावर थायलंड येथील धम्मउपासिका रोजना व्हॅनीच व डॉ. हर्षदीप कांबळे यांच्या दानातून निर्माण करण्यात आलेल्या भारतातील पहिल्या लोकुत्तरा भिक्खू प्रशिक्षण केंद्राला दलाई लामा व सर्व भिक्खूगणांनी यावेळी भेट दिली.
 

जागतिक धम्म परिषदेतील विषय

धम्मसेना आधुनिक जगात बौद्ध धम्माची प्रासंगिकता, बौद्ध संस्कृती आणि जीवनशैली, बौद्ध धर्माची मानसिकता आणि अभ्यास, बौद्ध धम्माचे पुनरूज्जीवन आणि मजबुतीकरणात आमची भूमिका, ध्यानसाधना आणि मानसिकता, जागतिक बौद्धांचा समन्वय, धम्माच्या चक्राची गती वाढवण्यासाठी रूपरेषा इत्यादी विषयावर या परिषदेमध्ये मार्गदर्शन केले गेले.



page 8 8 yogita salavi _1

 

@@AUTHORINFO_V1@@