नेमबाजीचे एक ‘यशस्वी’लक्ष्य...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Dec-2019
Total Views |

manasa_1  H x W


ज्या वयात मुले मोबाईलमधील गेम्स खेळण्यात दंग असतात, त्याच वयात राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत पदक जिंकत एक नवा विक्रम आपल्या नावावर रचणार्‍या यशस्वी जोशीच्या आयुष्याविषयी...


आज २१ व्या शतकात विविध क्षेत्रांमध्ये प्रगतीचा एक वेगळा ठसा उमटविणार्‍या भारताने विश्वात आपला एक वेगळा दबदबा निर्माण केला आहे
. माहिती-तंत्रज्ञान, कृषी, इलेक्ट्रॉनिक्स, वाहननिर्मिती आदींसह अनेक प्रकारांमध्ये भारताने आपले एक वेगळे अस्तित्व निर्माण करण्यात यश मिळविले. या सर्व क्षेत्रांसोबतच जागतिक दर्जाच्या क्रीडा प्रकारांमध्येही भारतीय खेळाडूंची नावे सातासमुद्रापार प्रसिद्ध आहेत. ‘क्रिकेटवेडा देश’ म्हणून भारताची ओळख असली तरी, अन्य क्रीडा प्रकारांमध्येही भारतीय खेळाडूंनी जगासमोर आपली एक वेगळी छाप पाडली असून त्यांचे कौतुक करावे तितके कमीच. ऑलिम्पिक, कॉमनवेल्थ यांसह विविध जागतिक स्पर्धांमध्ये पदके पटकावून त्यांनीही भारताची मान जगभरात अभिमानाने उंचावली आहे. त्यामुळे ‘क्रिकेटवेडा देश’ म्हणवणार्‍या भारतात असे खेळाडूही घडतात याचेच संपूर्ण विश्वाला नवल वाटते.


भारतातील अनेक खेळाडू जागतिक क्रीडा स्पर्धांमध्ये पदक तर पटकावितातच; मात्र या पदक विजेत्या खेळाडूंप्रमाणेच स्वतःला घडविण्यासाठी जीवापाड मेहनत करणारेही अल्पवयातच अनेक विक्रम स्वतःच्यानावावर रचतात. १३ वर्षीय महिला नेमबाज यशस्वी जोशी ही त्यांपैकीच एक म्हटले तर वावगे ठरणार नाही. ज्या वयात अनेक मुले मोबाईलमधील विविध गेम्स खेळण्यातच दंग असतात, त्याच वयात यशस्वीने राष्ट्रीय पदावरील स्पर्धेत पदक जिंकत एक नवा विक्रम आपल्या नावावर रचला आणि जगापुढे आपली एक ओळख निर्माण केली. अगदी अल्पावधीत तिने केलेला हा पराक्रम खरोखरच कौतुकास पात्र असून येथपर्यंत पोहोचण्यास तिने जीवापड मेहनत केली आहे.


यशस्वी जोशी ही मूळची उत्तराखंडची. येथील पिथौरगढ जिल्ह्यात ती आपल्या कुटुंबीयांसोबत वास्तवास आहे. चीन आणि भारत या दोन्ही देशांच्या सीमेवर असणारे तिचे गाव असून या राष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभाग घेणारी ती आपल्या गावातील पहिली मुलगी ठरली आहे. सीमेवरील गाव असल्यामुळे आत्तापर्यंत तेथे अनेक सोयी-सुविधांचा अभाव असून इतरांना सहजरित्या उपलब्ध होणार्‍या साधनांसाठीही येथे संघर्ष करावा लागतो. डोंगराळ प्रदेश असल्यामुळे मोबाईलचे नेटवर्क न मिळणे, इंटरनेट वापरण्यात अडचणी यांसारख्या गैरसोयी येथे नित्याच्याच आहेत. अशा प्रतिकूल परिस्थितीतही यशस्वी जोशीने लहानपणापासूनच नेमबाज होण्याचे स्वप्न बाळगले आणि ते आपल्या जोरावर पूर्णही केले. त्यामुळे तिचे हे कर्तृत्व कौतुकास पात्र असून देशभरात तिच्यावर कौतुकवर्षाव होत आहे.


यशस्वी हिचे वडील मनोज जोशी हे स्वतः एक अभियंते आहेत. ‘एअर पिस्टल’च्या (नेमबाजी) या खेळात त्यांना आधीपासूनच रस होता. नोकरीतून मिळणार्‍या फावल्या वेळात ते यासाठी सराव करत आपला छंद जोपासायचे. यासाठी त्यांनी एक विशेष अकादमी सुरू करत अनेकांना प्रशिक्षणही देण्याची सुरुवात केली. वडील मनोज यांच्याप्रमाणेच यशस्वी हिलाही या खेळाची आवड होती. वयाच्या आठव्या वर्षापासूनच तिने यासाठी सराव करण्यास सुरुवात केली. शालेय शिक्षणातून यासाठी ती आधी स्वतंत्र वेळ देत नेमबाजीचा सराव करू लागली. वडील मनोज यांनीही तिला यासाठी प्रोत्साहन देत नेमबाजीमध्ये करिअर घडविण्याकडे लक्ष्य केंद्रित करण्याचा सल्ला दिला. वडिलांच्या म्हणण्याप्रमाणे, ती यासाठी कसून सराव करू लागली. नेमबाजीच्या सरावादरम्यान शालेय अभ्यासासाठी वेळ मिळत नसल्याने ती भल्या पहाटे ४ वाजता उठून अभ्यास करायची.


दुपारी शाळेतून आल्यानंतर अंधार होईपर्यंतचा सर्व वेळ ती नेमबाजासीठी देत. अशाप्रकारे सलग पाच वर्षे करत तिने या क्षेत्रात आपले करिअर घडविण्यास सुरुवात केली. १० मीटर ‘एअर पिस्टल फायरिंगराष्ट्रीय स्पर्धेत आत्तापर्यंत चार वेळा कांस्यपदक जिंकण्याचा विक्रम केला आहे. राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये सहा वेळा सुवर्णपदके जिंकण्यात ती ‘यशस्वी’ झाली असून तिच्या नावावर बालवयातच विविध विक्रमांची नोंद झाली आहे. नेमबाजीच्या प्रकारात घवघवीत यश मिळविताना तिने शालेय शिक्षणामध्येही उत्कृष्ट कामगिरी केली असून तिचे कौतुक करावे तेवढे कमीच. बालवयातच नेमबाजी स्पर्धेत मोलाची कामगिरी बजावत स्वतःलासिद्ध करणार्‍या या यशस्वीला आता प्रतीक्षा आहे, ती मुख्य भारतीय संघात प्रवेश करण्याची. यासाठी ती पुन्हा प्रयत्नशील असून ऑलिम्पिक स्पर्धेत भारतासाठी सुवर्णपदक पटकाविण्याचे ध्येय तिने निश्चित केले आहे. दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून ‘यशस्वी’ला यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा...!

- रामचंद्र नाईक

@@AUTHORINFO_V1@@