मुंबई : कोणत्या मार्गाने जायचं हे १२ डिसेंबरला सांगणार अशी फेसबुक पोस्ट केल्यानंतर भाजप नेत्या व माजी मंत्री पंकजा मुंडे या शिवसेनेच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. परंतु, पंकजा मुंडे यांनी याविषयी पहिल्यांदाच माध्यमांसमोर येत स्पष्टीकरण दिले आहे.
पंकजा मुंडे म्हणाल्या, “मी १२ डिसेंबरला बोलेन असे मी सांगितले होते. मला आत्मचिंतनासाठी आणि स्वतःशी बोलण्यासाठी वेळ हवा आहे. तो वेळ मला दिला पाहिजे. याबाबत आत्ताच भाष्य करणे मला शक्य नाही. पण इतकेच सांगते की मी दरवर्षी १२ डिसेंबर ला गोपीनाथ गडावर मोठा कार्यक्रम घेते. त्यामुळे माझी भूमिका मी तेव्हाच स्पष्ट करेन. मी पक्ष सोडणार या चर्चेने मी खरंच खूप दुःखी आणि व्यथित आहे. मी पक्षाशी एकनिष्ठ आहे. सत्तेसाठी लाचार होणं माझ्या स्वभावात नाही, म्हणून पक्षबदल ही केवळ अफवा असून त्यात अजिबात तथ्य नाही.", असेही पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले.
१२ डिसेंबरला भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची जयंती आहे. भगवान गडावर गोपीनाथ मुंडे यांचे स्मारक आहे. तेथे आपण जमणार आहोत. आता काय करायचे, कोणता मार्ग स्वीकारायचा.. आपण लोकांना काय देऊ शकतो.. आपली ताकद काय आहे... पराभव मी स्वीकारला आहे... पण पुढे जायचे आहे.. अशा फेसबुक पोस्टने पंकजा मुंडे या भाजपला रामराम ठोकतील, आणि शिवसेनेत प्रवेश करतील, अशा चर्चाना राजकीय वर्तुळात आणि सोशल साईटवर उधाण आले होते. तर पंकजा मुंडे या भाजप सोडणार, या केवळ अफवा असून पंकजा मुंडे या कालही भाजपच्या नेत्या होत्या आजही आहेत आणि उद्याही असतील, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.