कोकण किनारपट्टीवर सागरी कासवे अंडी देण्य़ासाठी दाखल !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Dec-2019   
Total Views |
tiger_1  H x W:

(छाया - मोहन उपाध्ये) 

 

दापोलीतील केळशी आणि वेळास समुद्रकिनाऱ्यावर आढळली अंडी


मुंबई (अक्षय मांडवकर) - यंदाच्या मोसमातील समुद्री कासवांच्या विणीच्या हंगामाला कोकण किनारपट्टीवर सुरुवात झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील केळशी आणि वेळासच्या किनाऱ्यावर ‘ऑलिव्ह रिडले’ प्रजातीच्या मादी कासवाने अंडी दिली आहेत. या दोन्ही किनाऱ्यांवर आढळलेल्या अंडय़ांची संख्या २४६ आहे. यामुळे पर्यटकांचे आकर्षण ठरणाऱ्या 'कासव महोत्सवा'ची घोषणाही लवकरच होणार आहे. 

 

tiger_1  H x W: 
 
 

महाराष्ट्राला तब्बल ७२० किलोमीटरची किनारपट्टी लाभली आहे. या किनारपट्टीवरील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन सागरी जिल्ह्यांमधील काही किनाऱ्यांवर दरवर्षी समुद्री कासवांमधील 'आॅलिव्ह रिडले' प्रजातीच्या माद्या अंडी घालण्यासाठी येतात. यामध्ये रायगड जिल्ह्यातील ४, रत्नागिरीमधील १३ आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किनाऱ्यांच्या समावेश आहे. नोव्हेंबर ते मार्च हा प्रामुख्याने सागरी कासवांचा विणीचा हंगाम आहे. सागरी कासवांच्या माद्या किनाऱ्यांवर खोल खड्डा करुन म्हणजेच घरटे तयार करुन त्यामध्ये अंडी घालतात. साधारण एक मादी कासव १०० ते १५० अंडी घालते. ४५ ते ५५ दिवसांमध्ये या अंडय़ांमधून पिल्ले बाहेर पडतात. २०१८-१९ मधील विणीच्या हंगामात राज्यातील तीन सागरी जिल्ह्यांमध्ये कासवांची १९६ घरटी आढळून आली होती. तर यंदाच्या विणीच्या हंगामातील पहिली दोन घरटी दापोली तालुक्यातील केळशी आणि वेळासच्या किनाऱ्यावर आढळून आल्याची माहिती दापोलीचे वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव बोराटे यांनी दै. 'मुंबई तरुण भारत'शी बोलताना दिली.

 

tiger_1  H x W: 
 
 

समुद्र कासव विणीच्या यंदाच्या मौसमातील पहिले घरटे केळशीच्या समुद्रकिनाऱ्यावर २४ नोव्हेंबर रोजी झाल्याची माहिती येथील कासवमित्र लहू धोपावकर यांनी दिली. यामध्ये १०८ अंडी सापडली. तर १८ डिसेंबर रोजी कासव विणीसाठी प्रसिद्ध असलेल्या वेळासच्या किनाऱ्यावर दुसरे घरटे झाले आहे. त्यामध्ये कासवमित्रांना १३८ अंडी सापडली. गेल्या काही वर्षांमध्ये सागरी कासवांचा विणीचा हंगाम जानेवारी-फेब्रुवारी माहिन्यात सरकल्याचे आमच्या निदर्शनास आले असून पूर्वी नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यामध्ये कासवांची सर्वाधिक घरटी होत असल्याची माहिती तज्ज्ञ कासवमित्र मोहन उपाध्ये यांनी दिली. तसेच अंडी दिल्यानंतरही तापमानात चढ-उतार होत असल्याने विहीत कालावधीत ती परिपक्व होत नसल्याचे निरीक्षण नोंदवल्याचेही त्यांनी सांगितले.

 
 

नोव्हेंबर-डिसेंबर-जानेवारी या थंडीच्या महिन्यांमध्ये झालेल्या सागरी कासवांच्या घरट्यांची अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. कारण, यामधून नर कासवांची पैदास होण्याची शक्यता असते. मात्र, गेल्या दोन ते तीन वर्षांमध्ये सर्वाधिक घरटी ही फेब्रुवारी महिन्यात झाली आहेत. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर झालेल्या घरट्यांमधून मादी कासवांची पैदास होते. साधारण घरट्यामध्ये ३१.५ सेल्सियस तापमान राहिल्यास अंड्यांमध्ये मादी कासवांचे भ्रूण विकसित होते. - सुमेधा कोरगांवकर, पश्चिम किनारपट्टीवरील समुद्री कासवांच्या अभ्यासिका

 

अंडी व घरटय़ांची जपणूक

समुद्राच्या भरतीमुळे कासवांनी वाळूमध्ये तयार केलेल्या घरटय़ांना धोका उद्भवतो. त्यामुळे अंडी देऊन मादी कासव परतल्यानंतर कासवमित्रांकडून ही अंडी सुरक्षितरीत्या घरट्याबाहेर काढली जातात. त्यानंतर भरतीरेषेपासून दूर कृत्रिम घरटय़ांची निर्मिती केली जाते. त्या जागेला 'हॅचरी' म्हणतात. या हॅचरीत मादी कासवाने केलेल्या खडय़ाप्रमाणेच कृत्रिम खड्डा तयार केला जातो. त्याचा आकार मूळ आकारएवढाच ठेवला जातो. त्यामध्ये ही अंडी ठेवून त्यावर वाळू टाकून खड्डा भरला जातो. यावेळी मूळ खड्यातील काही वाळू कृत्रिम खड्यात टाकण्यात येते. त्याभोवती कुंपण तयार केले जाते. अंडय़ांमधून बाहेर पडलेली पिल्ले इतस्तत भटकू नयेत म्हणून जाळीदार टोपले ठेवले जाते.

@@AUTHORINFO_V1@@