मुंबई : रविवारी रात्री पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या गोळीबारात कोल्हापूर जिल्ह्यातील महागावचे सुपुत्र ज्योतिबा चौघुले शहीद झाले. काश्मीरच्या गुजर सेक्टरमध्ये पाक सैन्यासोबत झालेल्या चकमकीत त्यांना वीरमरण आले आहे.
चौघुले मूळचे गडहिंग्लज तालुक्यातील महागाव गावचे राहणारे आहेत. २००९ साली चौघुले सैन्यदलात दाखल झाले होते. ६ मराठा बटालियनमध्ये ते कार्यरत होते. हेलिकॉप्टरमधून त्यांचा मृतदेह श्रीनगर येथे आणण्यात आला आहे. मंगळवारी दुपारी महागाव गावात त्यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत.
रविवारी रात्री रात्री ९.३०च्या सुमारास गोळीबार करत पाकिस्तानने पुन्हा एकदा युद्धबंदीचे उल्लंघन करण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानने उत्तर काश्मीरमधील बांदीपोरा जिल्ह्यातील गुजर सेक्टरमधील निवासी भागात लष्कराच्या चौक्यांना लक्ष्य केले आणि गोळीबार केला. दुपारनंतर नियंत्रण रेषेला लागून आसलेल्या बखतूर भागात पाकिस्तानी सैनिकांनी गोळीबार करण्यास सुरुवात केली. पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेवर वारंवार होणाऱ्या गोळीबारामुळे नियंत्रण रेषेवर तणावाची स्थिती निर्माण झाली आहे.