जनप्रतिनिधी कसा असावा, याचे उत्तम उदाहरण म्हणजे प्रा. रामभाऊ कापसे! : राम नाईक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Nov-2019
Total Views |


 


डोंबिवली : "जनप्रतिनिधी कसा असावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे प्रा. रामभाऊ कापसे. लोकप्रतिनिधी म्हणून तुमच्या पायाला चक्र, तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ असणे गरजेचे आहे," असे प्रतिपादन उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक यांनी केले. सुभेदार वाडा कट्टाच्या माध्यमातून कल्याणमध्ये प्रा. रामभाऊ कापसे स्मृती व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. या व्याख्यानमालेचे प्रथम पुष्प माजी राज्यपाल राम नाईक यांनी गुंफले. त्यांनी आदर्श जनप्रतिनिधीच्या मूल्यांवर उपस्थितांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला माजी राज्यपाल राम नाईक, खा. कपिल पाटील, ठाण्याचे आमदार संजय केळकर, माजी मंत्री जगन्नाथ पाटील आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

 

यावेळी राम नाईक यांनी प्रा. रामभाऊ कापसे यांच्या आठवणींनाही उजाळा दिला. तसेच लोकप्रतिनिधींच्या कर्तव्यांविषयी बहुमूल्य मार्गदर्शनही केले. ते पुढे म्हणाले की, "लोकप्रतिनिधींनो, महाराष्ट्राच्या विकासाची काळजी घ्या. खासदार-आमदार निधींचा योग्य तो वापर टक्के व दलाली यात न फसता नागरिकांसाठी करा. जनप्रतिनिधी सत्ताधारी पक्षाचा असो वा विरोधी पक्षाचा, धोरणात्मक काम होणे गरजेचे आहे. जनप्रतिनिधीची वाणी आणि देहबोली हेदेखील त्याच्या कार्याचे उत्तम प्रगतीपुस्तक असते. त्याची सकारात्मकता आणि नकारात्मकता त्याच्या प्रगतीसाठी महत्त्वाची असते." दरम्यान, "लोकप्रतिनिधी कसा नसावा, यावर मी बोलणार नाही," असेही ते म्हणाले.

 

दि. २४ ऑक्टोबरपासून, महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल घोषित झाल्याच्या दुसऱ्या दिवसापासून अगदी कालपर्यंत दूरचित्रवाणी व वृत्तपत्रे यातून जे काही दिसले-वाचले, त्यावरून जनप्रतिनिधी कसा नसावा, या विषयावर ज्ञानकोषच महाराष्ट्राला मिळाला असल्याचे सूचक वक्तव्य त्यांनी केले. आपल्या भाषणात बोलताना ते पुढे म्हणाले की, "२०१९च्या विधानसभा निवडणुकीत भाजप-सेनेच्या महायुतीला जनादेश मिळाला होता. पण, त्याची नैतिकता जपली गेली नाही. तसेच काल विरोधात बसणारे पक्ष आज सत्तारूढ झाले. त्यामुळे आता झालेल्या गोष्टींवर चर्चा करण्यात काही अर्थ नाही." पण, शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी गोव्याच्या सत्ता समीकरणाबद्दल नुकत्याच केलेल्या विधानावर मात्र राम नाईक यांनी, "राऊत यांनी मर्यादेत बोलावे. ते त्यांच्या पक्षाच्या हिताचे ठरेल," असा जोरदार टोला लगावला.

 

या व्याख्यानमालेदरम्यान वीज गेल्याने राम नाईक यांनी अंधारातच आपले भाषण करीत श्रोत्यांची मने जिंकली. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देताना राम नाईक यांनी,"शिवसेनेने भाजपशी चर्चा करणे अपेक्षित होते," असे मत व्यक्त केले. यावेळी बोलताना आ. संजय केळकर म्हणाले की, ‘’प्रा. रामभाऊ कापसे, रामभाऊ म्हाळगी व राम नाईक ही अशी व्यक्तिमत्त्वे आहेत, ज्यांनी कार्यकर्त्यांसमोर काम कसे करावे, याचे मापदंड प्रस्थापित केले आहेत. त्यामुळे अशा नेत्यांच्या नावाने एखादी व्याख्यानमाला सुरू करावी," असे मनोगत त्यांनी व्यक्त केले. यावेळी खा. कपिल पाटील यांनीदेखील रामभाऊ म्हाळगी, रामभाऊ कापसे व राम नाईक यांच्या आठवणींना उजाळा देत, या व्याख्यानमालेला शुभेच्छा दिल्या.

 

शनिवारचे व्याख्यान

 

शनिवार, दि. ३० नोव्हेंबर रोजी सायं. ७.३० वाजता सुरेश हावरे (अध्यक्ष: साई संस्थान, शिर्डी) ‘मंदिर व्यवस्थापन कसे असावे’ या विषयावर मार्गदर्शन करतील.

@@AUTHORINFO_V1@@