धक्कादायक ! साताऱ्यात विष दिल्याने बिबट्याचा मृत्यू ?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Oct-2019   
Total Views |


 
 

वनाअधिकाऱ्यांकडून तपास सुरू

 

मुंबई ( अक्षय मांडवकर ) - सातारा जिल्ह्यातील तुळसण (कोळेवाडी) गावात बुधवारी सायंकाळच्या सुमारास अडीज ते तीन वर्षांची मादी बिबट्या मृतप्राय अवस्थेत आढळला. वन विभागाने या बिबट्याला ताब्यात घेतल्यानंतर उपचारादरम्यान त्याच्या मृत्यू झाला. शवविच्छेदन अहवालातून विषबाधेमुळे बिबट्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून बिबट्याच्या दर्शनाने गावकरी त्रस्त होते. त्यामुळे बिबट्याला नेमके विष देऊन मारण्यात आले वा अनावधनाने त्याच्या मृत्यू झाला, यासंदर्भात वनाधिकारी अधिक तपास करत आहेत.

 

 

कऱ्हाड तालुक्यातील तुळसण गावातील ग्रामस्थांना बुधवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास शिवारात एक बिबट्या मरणासन्न अवस्थेत आढळला. गावातील निलेश वीर या युवकाला बेलमळी नावाच्या शिवरात हा बिबट्या मोठ्याने आवाज करुन तडफताना दिसला. त्याने त्वरित ही माहिती संरपंचांना कळवली. तसेच १९२६ या 'हॅलो फाॅरेस्ट' क्रमांकावर संपर्क साधून तक्रार दाखल केली. तक्रार दाखल झाल्यावर लागलीच वन विभागाचा चमू वन्यजीव तज्ज्ञांसह घटनास्थळी दाखल झाला. घटनास्थळी दाखल झाल्यावर बिबट्याच्या तोंडातून रक्त येण्याबरोबरच तो मोठ्याने आचके देत असल्याचे निदर्शनास आले, अशी माहिती कऱ्हाडचे मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांनी दै. 'मुंबई तरुण भारत'ला दिली. त्यामुळे तातडीने त्याला उपचाराकरिता कऱ्हाडला हलवून पशुसंवर्धन अधिकारी डॉ. संजय हिंगमीरे यांना पाचारण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मात्र उपचारादरम्यान रात्री १० वाजता बिबट्याचा मृत्यू झाला.

 
 
 

आज सकाळी ८ वाजता या बिबट्याचे शवविच्छेदन पार पाडले. या अहवालामधून बिबट्याचा मृत्यू विषबाधेमुळे झाल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून या बिबट्याचा तुळसण गावात वावर वाढला होता. त्याने काही पाळीव प्राण्यावर हल्ला करुन ठार केले होते. त्यामुळे गावात या बिबट्याविषयी संतापाचे वातावरण असल्याची माहिती दै. 'मुंबई तरुण भारत'ला मिळाली. दरम्यान एका ग्रामस्थाने बिबट्याचा मृत्यू झाल्यानंतर संशयास्पद लिखाण समाजमाध्यमावर केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे बिबट्याच्या मृत्यूच्या नेमक्या कारणाविषयी संशयाची पाल चुकचुकली आहे. बिबट्याचा मृत्यू नेमका विषबाधेमुळे झाला वा त्याला विष देण्यात आले, यासंदर्भात सखोल चौकशी सुरु असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी विलास काळे यांनी दिली.


@@AUTHORINFO_V1@@